माधवी जोशी माहुलकर
“नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो…” सलील कुलकर्णींचे संगीत आणि संदीप खरेंचे शब्द. सगळंच अप्रतिम! ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी जीवनातल्या छोट्या छोट्या अनुभवांवर, प्रसंगांवर प्रकाश टाकला आहे. ‘जरा चुकीचे अन् जरा बरोबर बोलू काही’ म्हणत सामान्य लोकांच्या भावभावनेला हात घातला आहे, त्यातीलच मला आवडलेली कविता, “नसतेस घरी तू जेव्हा…” ही कविता ऐकली की खरंच जीव कासावीस होतो.
घरातील स्त्रीचे असणे किंवा नसणे दखलपात्र असतं, तिचे घरात असणंही तिच्या नसण्याइतकंच महत्त्वाचं असतं, जसा घरातील कर्तापुरुष हा त्या घराचा आधारवड असतो, तशी स्त्री ही त्या घराची आधारस्तंभ असते. प्रत्येक कुटुंबात एक तरी मुलगी असावी, तिचं घरभर वावरणं तुमच्या मनाला एक वेगळच समाधान देऊन जातं. म्हणजे, मुलं काही वेगळी असतात असं नाही; पण नैसर्गिक स्वभावविशेष हे पुरुष आणि स्त्री असा भेद असल्यामुळे, वेगळे असतात. लहानपणासून ती ज्या घरात माझं घर, माझी माणसं म्हणून मिरवते ती तिची कायमची नसतातच मुळी! लग्न होऊन सासरी आली की, तिची नाती बदलतात. आपलं हक्काचं माहेर सोडून ती नवऱ्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरात आणि आपल्या संसारात नवे पाऊल टाकते… तिचं तिथे तेव्हा येणं महत्त्वाचं असतं.
पुरुषाचे लग्न झाल्यानंतर नातेवाईक, घरदार आईवडील काहीच बदलत नाही, पण स्त्रीचे मात्र आईवडीलांपासून सगळीच नाती बदलतात. हा बदल स्वीकारणं, वाटतं तेवढं सोपं नसते. आपल्या माहेरची माणसं लग्नानंतर तिला एका दिवसात परकी होतात. पण ती हे आव्हान समर्थपणे पेलते. या नवीन घरामध्ये ती नवऱ्याच्या प्रेमाखातर सगळयांना आपलसं करून दुधात जशी साखर विरघळते, तशीच विरघळून जाते… त्या घराच्या सुखदुःखात सहभागी होत जाते. आपल्या लेकीला इतका समरसून संसार करताना पाहिले की, तिच्या आईवडिलांना आपले जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटते.
हेही वाचा – स्वेटर… जुन्या विणी गेल्या विस्मरणात!
मोठ्या हिकमतीने आपल्या संसाराचा गाडा हाकताना आपल्या स्त्रीत्वाची विविध रूपं ती सादर करत जाते, तिच्या घरातील तिचं अस्तित्व इतकं मोठं होऊन जातं की, तिच्या सासरच्या लोकांना ती नसली तर, काय होईल, ही कल्पनाही करवत नाही. तिलादेखील इतक्या वर्षांच्या सहवासाने आपल्या माहेरच्या लोकांचा हळूहळू विसर पडत चाललेला असतो, लग्नानंतर काही वर्षांनी माहेर फक्त प्रसंगापुरताच उरतं. इतक्या बदलांना आणि आयुष्यातील स्थित्यंतरांना फक्त एक स्त्रीच सहज स्वीकारत असते. तिच्या सहवासाची तिच्या नवऱ्याला, मुलांना आणि घरातील बाकी सगळ्यांना इतकी सवय झालेली असते की, एक दिवसही तिच्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. थोड्या वेळाकरिता जरी ती बाहेर गेली तर, ही मंडळी तिला ‘केव्हा येणार आहे?’ हा प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडतात! बरं, तिला देखील बाहेर जास्त रहायचं नसतं… घराची, मुलांची, नवऱ्याची काळजी सतत मागे लागलेली असतेच. नवीन सुनेच्या रूपात घरात आलेली ती तरुणी त्या घराची गृहिणी कधी होते, हे तिचं तिलाचं कळत नाही. सुखी संसाराचे तिने रेखलेले स्वप्न पूर्ण झालेले असते.
आयुष्य म्हटलं की, चढउतार हे राहणारच. जोडीदारांपैकी कोणीतरी एकजण आधी जाणारच… पण त्या बाबतीतही ती मनाने जास्त खंबीर असते. तिच्या जाण्याने किंवा नसण्याने तो जास्त खचतो, विशेषतः आयुष्याच्या अशा वळणावर ज्या वयात तिच्या सोबतीची त्याला जास्त गरज असते, त्यावेळेस ती जर अचानक त्याला जीवनाच्या प्रवासात अर्धवट वाटेवर सोडून गेली तर, तिचे या जगात नसणे त्याच्या पुढील आयुष्याकरिता त्रासदायक होतं. ती गेल्यावर नातेवाईक, मुलबाळं महिना- दोन महिन्यांत सावरतात आणि आपापल्या संसारात, कामात रममाण होतात. अशा वेळी एकाकीपणा त्याला खायला उठते. मित्रसुद्धा दिवसरात्र सोबत राहू शकत नाहीत. कोणाशी बोलायला जावे तर, “तू तिला विसरायचा प्रयत्न कर, भूतकाळात जास्त राहू नकोस…” असे सल्ले दिले जातात. तिच्या नसण्याने बाकीच्यांना फारसा फरक पडलेला नसतो, पण त्याचं मात्र सर्वस्व हरवलेलं असतं. परंतु याच्यातही त्याला मार्ग सुचवणारे अनेक असतात. मग कोणीतरी सांगितल्यावरून तो दुसऱ्या लग्नाचा विचारही करतो, नव्हे काहीजण तर ते करूनही घेतात! पण ती मात्र तो जर आधी गेला तर, असा विचार सहसा करत नाही… रमवून घेते स्वतःला मुलांच्या संसारात!
असं सगळयांच्या बाबतीत होतंच असं नाही… असे लोक क्वचितच असतात. पण तिचं अस्तित्व नसणं, हे प्रत्येकासाठी एक वेगळी पोकळी निर्माण करून जातं… एक आई म्हणून मुलांना, एक पत्नी म्हणून नवऱ्याला, एक सखी म्हणून मैत्रिणीला, एक सून म्हणुन सासू-सासऱ्यांना, एक वहिनी म्हणून दीर आणि नणंदेला, बहीण म्हणून भावंडांना, मुलगी म्हणून आईवडिलांना दु:खात टाकून जाते…. म्हणून तिच्या असण्यापेक्षा तिचं नसणं जास्त जाणवतं. प्रत्यक्षात ती असताना गृहीत धरली जाते, मात्र ती नसताना, अदृश्यात असलेली ती किती विशेष होती, हे कळतं!
आजकालच्या पिढीत तर ती आणि तो दोघेही समसमान असल्याने त्यांच्यात संघर्षच जास्त दिसतो. सामंजस्याची, एकमेकांप्रती समर्पणाची भावना फार कमी दिसते. थोड्या थोड्या कारणाने कुरबुरी वाढून भांडणे विकोपाला जातात. कोणीच कमीपणा घेऊन माघार घ्यायला तयार नसल्यामुळे त्याचे पर्यवसान घटस्फोटात होते. यामध्ये मुलांची ससेहोलपट होते. अशा परिस्थितीत एकमेकांमध्ये सलोखा होऊन कुटुंबाची आनंदी चौकट परत जुळून येण्याआधीच मोडते. एकंदरीतच त्यांचा संसार फुलण्याआधीच विस्कटतो. लग्न म्हणजे पोरखेळ नसून देवाब्राह्मणांच्या साक्षीने एकमेकांना आयुष्यभर साथ करण्याच दिलेले वचन असतं… दोघांनी मिळून सगळे निर्णय घ्यायचे असतात. एकमेकांशी सुसंवाद नेहमी साधला तर, टोकाचा निर्णय घेण्याची वेळच येणार नाही. एकाचाच कोणाचा तरी हट्ट किंवा हेकेखोरपणा चालत नाही. संसार म्हटला की, रुसवे-फुगवे आलेच; पण ते तेवढ्यापुरतेच हवेत.
पुरुष हा कुटुंबाचा कणा असतो, त्याला कमी लेखून चालणार नाहीच, पण प्रत्येक घरात तिच्याही मतांचा आदर केला गेला पाहिजे. पुष्कळदा तिच्या बाबतीत “तुला काय कळतंय? तू तुझं काम कर,” असे बोल नवऱ्याकडून, घरातील इतर लोकांकडून आणि पुढे जाऊन मुलांकडूनही तिला ऐकावे लागतात. हळूहळू सततच्या कोंडमाऱ्याने ती आतल्या आत कुढत जाते, आपल्या इच्छा-आकांक्षा मनातच दाबून ठेवते. तिचं कोणी ऐकत नसल्याने आपलं घरात काही महत्त्व नाही, ही भावना तिच्या मनात घर करून राहते. पण हे रोजच्या रामरगाड्यात कोणाच्याच लक्षात येत नाही. तिचं असण किंवा नसणं सारखंच वाटतं, पण ती किती महत्त्वाची व्यक्ती आहे / होती, हे तिच्या आयुष्याच्या शेवटी सगळ्यांना कळतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
ती घरात जेव्हा नसते, तेव्हा तिचं तिथे असणं किती अमूल्य असतं ते समजतं. संसाराची विस्कटलेली घडी सावरताना त्रास होतो… तो एकटेपणा, पोरकेपणा खायला उठतो… तिच्या नसण्याने घराचे घरपण हरवतं आणि मग घरातील प्रत्येक वस्तूत, आठवणीत तिचा शोध घेतला जातो, पण ती शोधूनही सापडत नाही. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहायला लागतो. तिच्या अस्तित्वासाठी तिचे रूप आठवण्यासाठी नानाविध उपाय केले जातात, पण उरतं फक्त शून्य, एक पोकळी! मग आपसुकच तिची उणीव जाणवत राहते, मनामध्ये “नसतेस घरी तू जेव्हा…” या ओळी घोळत राहतात. तिचं असणं आणि तिचं नसणं किती महत्त्वाचं आहे, ते डोळ्यांतील आसवं समजावत राहतात आणि वारंवार तिच्या आठवणींचा फेर धरत डोळ्यासमोर त्याच ओळी फिरत असतात-
नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो
नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते, अन् चंद्र पोरका होतो
येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो
तव मिठीत विरघळणार्या, मज स्मरती लाघववेळा
श्वासाविन हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो
तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा?
समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो
ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो!
नसतेस घरी तू जेव्हा…


