“मनू, अगं किती चिडचिड करशील? जरा शांत हो. बघ तुझ्या अशा वागण्यामुळे बाळ पण उठलं. तूच तर झोपली होतीस एवढा वेळ… आणि आता बाळ उठलं तर, बाळावर कशाला चिडतेयस? अशी काय करतेयस आजकाल?” असं म्हणतच सोहम बाळाला उचलून बाहेरच्या खोलीत गेला.
“उगी उगी, नको ग ललू माझी राणी. सोनं ग ते माझं. आईला केलं हं मी वा!” सोहम बाळाला जोजवत हॉलमध्ये घेऊन आला. तिकडे नंदाताई शेपूची भाजी निवडत बसल्या होत्या आणि त्याचे बाबा म्हणजेच राघवराव बारशाचं कसं करायचं, देणं-घेणं काय करायचं या सगळ्याची यादी बनवत होते. सोहमला असं बोलत आलेलं बघून नंदाताई म्हणाल्या, “कोण आहे ते आईला वा करतंय? आईला आराम हवाय, तो मिळूदेत तिला. चला, या आता माझ्याकडे. दोन मिनिटांत घेतेच आहे मी माझ्या राणीला. एवढी आईसाठीची भाजी निवडते आणि घेते…” असं नंदाताई म्हणताच सोहम बाळाला घेऊन स्वयंपाकघरातच आला…
“आई, तुला असं नाही का वाटत, की मनालीची आजकाल खूपच चिडचिड होते? तसा मी घरात कमीच असतो. पण तुला जास्त माहिती असेल ना? अशी नाहीये खरंतर ती. पण बाळ झाल्यापासून मी बघतोय, ती वेगळीच वागतेय. कधी पटकन ओरडते? कधी अशीच चिडते? कधी बाळाला एकदम छातीशी धरते… तर कधी ते रडत असलं तरी झोपून रहाते. काय विचित्र वागतेय!” नंदाताई काहीच बोलत नाहीत बघून तो पुन्हा म्हणाला, “तू काहीच का बोलत नाहीयेस. मी एकटाच बडबडतोय. मला एकट्यालाच वाटतंय का असं?”
नंदाताई एकदम वळून म्हणाल्या, “हे बघ मला आत्ता खूप कामं आहेत. त्यात आत्तातरी लुडबूड करायला येऊ नकोस… आणि बाळाला स्वयंपाकघरात आणू नकोस. तू बाहेर बस बरं. तुझ्याशी मी रात्री जरा निवांतपणा मिळाला तर बोलते.”
हेही वाचा – दृष्टिकोन…
नंदाताई कामावरून चटचट हात फिरवत होत्या. पण आता त्यांच्या मनात नुसती विचारांची गर्दी झाली होती. दोन महिन्यांपूर्वीची मनाली त्यांना आठवली. कित्ती खूश होतो आपण सगळेच आणि विशेषतः ती. घरात दुडूदूडू धावणारा इवलासा जीव साठ्यांच्या घरात 28 वर्षांनंतर येणार होता. सोहमनंतर तीनच वर्षांत समिधा झाली आणि त्यानंतर आता हे बाळ. मनालीचे दिवस आता भरत आले होते आणि आठवा संपतच आला होता. नववा महिना लागला की, कधीही डीलिव्हरी होऊ शकते माहीत होतं, तरीही नववा महिना लागेपर्यंत नोकरी करून मगच आईकडे जायचा मनालीचा निर्धार होता आणि तिने तो पूर्ण केला होता. मालिनीताई पण तिकडे लेकीची अगदी आतुरतेने वाट बघत होत्या. आपलाच जीव जरा वर-खाली होत होता. इतक्या शेवटपर्यंत नोकरी कशाला करायची? जरा आरामात रहायचं. शेवटचे दोन महिने आमच्यासोबत आनंदाने व्यतीत करायचे आणि इथेच डीलिव्हरी करायची, असं माझं म्हणणं होतं. पण मालिनीताईंनी ‘पहिलं बाळंतपण माहेरीच असतं आणि तसंच होऊदे,’ अशी आपल्याला गळ घातली. मग काय करणार? असो! काहीही झालं तरी दोघं बाळ-बाळंतीण छान राहूदेत इतकीच इच्छा होती की, आपली पण!
दोनच दिवसांनी मनाली निघणार आणि अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं. नंदाताई आणि राघवराव घरीच होते त्यामुळे त्यांनी गाडी काढली आणि इंटर्नल गुंतागुंत झाल्याने लगेचच सीझर करायला लागलं. किती घाबरली होती मनाली त्यावेळी. तिला धीर देता देता पुरेवाट झाली. तशी मनाची तयारी होतीच तिची. पण आता त्यात गुंतागुंतही झाली म्हणून मनाची चलबिचल झाली अगदी सगळ्यांच्याच. मात्र बाळाला सुखरूप पाहिल्यावर अगदी शांत झाली मनाली. किती धन्यता असते मातृत्व मिळण्यात हे या पुरुषांना काय कळणार? किती शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरं होतात ते बाईलाच कळतं…
या सगळ्या परिस्थितीत सोहमने मनालीला साथ द्यायलाच हवी. आजच आपण बोलूयात त्याच्याशी याबाबतीत. असं मनाशी पक्कं करून त्यांनी सगळी कामं आटोपली. रात्री राघवराव आणि सोहम बसलेले असताना नंदाताई बाळाला झोपवून हुश्श करत आल्या. त्यांना बघून सोहम म्हणाला, “आई तुझी किती ओढाताण होतेय. मनाली तिकडे गेली असती, तर एवढी धावपळ नसती झाली ना? सॉरी. सगळं तुझ्यावरच पडलं.”
त्यावर नंदाताई हसतंच म्हणाल्या, “अरे सोहम, मला काहीच वाटत नाहीये याचं! मला बाळाचं आणि मनालीचं सगळं करायचं होतं म्हणून तर मी तिला इथेच थांबवत होते. तेव्हा या सगळ्याची कल्पना होतीच मला… आणि मालिनीताई पण परोपरीने सगळं करतातच आहेत रे! असं म्हणून तू त्यांना उगीच कानकोंडं करू नकोस हं. ते सोड… आज मला तुझ्याशी याबाबतीतच बोलायचं आहे.”
“काय गं? अच्छा, मगासचच्या मला पडलेल्या कोड्याचं उत्तर देणार आहेस तर तू,” असं म्हणून सोहम हसला. नंदाताई स्मितहास्य करत म्हणाल्या, “हो. सोहम, मातृत्वाचा आनंद लुटणं, बाळासाठी दिवसरात्र हजर रहाणं हे सगळं जरी खरं असलं ना तरी, हेच आईपण त्या स्त्रीला किती शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारं आहे, हे कधीही बोललं जात नाही. शरीरात हार्मोन्समुळे होणारे सततचे बदल, डीलिव्हरीनंतरचा प्रचंड थकवा, त्यात सीझर असेल तर प्रचंड दुखणी खुपणी, स्वतःला उठता येत नाही तोच बाळाला दूध पाजण्याचं प्रचंड प्रेशर, बाळाला जमेल तसं, पण समाजमान्य दृष्टीने वाढविण्याची धडपड, झोपेचं सततचं बिनसलेलं ताळतंत्र, जवळजवळ अर्ध्याच शारिरीक ताकदीनं चाललेली घरातील सर्व कामं, त्यात नोकरीवर न गेल्याने नव्या नव्या गोष्टी शिकण्यात मागे पडण्याचं प्रचंड टेन्शन, नंतर सगळं सुरू झाल्यावर पाळणाघरात ठेवल्याने येणारं आभाळभर गिल्ट आणि बाळाकडे ओढ घेणारं घारीचं मन! हे आपण कुणी पहातच नाही रे… मी गेलेय या सगळ्यातून त्यामुळे मला कळूच शकतं तिचं अंतर्मन!
खरंतर, या सगळ्या तक्रारी नाहीत, तर ढळढळीत सत्य आहे. यातून प्रत्येक स्त्री कमी-जास्त प्रमाणातून जातेच. तरीही एक आई दुसऱ्या आईला क्रिटिसाइज (criticize) करून, न विचारता सल्ला देताना, नावं ठेवताना दिसते. असं नको व्हायला. पुरुषांनी देखील या अतिशय कष्ट आणि वेदनेच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या स्त्रीला समजून घेऊन, तिला पडेल ती आणि योग्य तेवढी मदत करायला हवी. Women’s Day, Mother’s Day नुसतेच साजरे नाही करायचे, तर निदान अशा प्रसंगी ते अनुसरणात आणावेत. आता तू म्हणशील, यात मी काय करू शकतो? बाईलाच दिल्यात या सगळ्या गोष्टी, मग आम्ही तरी काय करायचं? असं म्हणून झटकून नका देऊ रे. तिला बाकी काही नाही तरी तुमची sympathy हवी असते. तुमचं प्रेम हवं असतं आणि सगळ्यात जास्त तुमचा ‘मी आहे’ एवढाच विश्वासाचा हात पाठीवर हवा असतो… आणि यातच खरा पुरुषार्थ आहे.
प्रत्येक आई या संपूर्ण प्रक्रियेत आपलं सर्वस्व पणाला लावत असते, हे नवीन आईपण आपापल्या परीने निभावत असते. अशावेळी आजूबाजूच्या सर्वांनी तिला खंबीर पाठिंबा द्यायला हवा. तेव्हा आता तूही सारखं ‘तिचं वजन किती वाढलंय?’ किंवा ‘ही अशी काय चिडचिड करतेय?’, ‘नुसती झोपलीय काय ही?’, ‘बाळ किती रडतंय गं!’ या वाक्यांनी शब्दबंबाळ न करता तिला फक्त… ‘तू एक उत्तम आई आहेस आणि तू खूप छान करतेयस सगळं. मी तुझ्यासोबत कायम आहे’, एवढंच म्हण आणि मग तिच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरील गोड हसू याची सांगड फक्त बघत बसायची. शंभर हत्तींचं बळ येईल तिला.”
हेही वाचा – बेटर हाफ
आईच्या बोलण्याने सोहम सद्गतीत झाला. “आई, तू बरोबर बोलतेयस. मी गृहीत धरलं मनालीला. आता मी असं नाही म्हणणार. मी सर्वतोपरीने तिची मदत करेन. बरं झालं तू मला आत्ताच सांगितलंस, नाहीतर शाळेत मुलांना शिकवणाऱ्या मनालीने माझीच एक दिवस शाळा घेतली असती.” अशा त्याच्या म्हणण्यावर सगळेच हसले.
त्यावर राघवराव पण म्हणाले, ” माझ्या ही गोष्ट लक्षातच नव्हती आली हो! मी पण उद्यापासून मनाली आराम करत असताना बाळाला खेळवण्याची पूर्ण जबाबदारी घेतो राणीसरकार… आणि तुम्हालाही बारीक-सारीक मदत करतो. नाहीतर, या तुमच्या माँसाहेब आम्हाला सोडणार नाहीत…” असं म्हणून ते खळखळून हसले आणि “इश्श, काहीतरीच तुमचं बाई!” असं म्हणून नंदाताई उठल्या, ” चला, तुम्हाला काय? मला सकाळपासून भरपूर कामं असतात. लाडकी आणि एकुलती एक सून आणि नात आहे नं! मग पदर खोचायलाच हवा. त्यात बारसं पण तोंडावर आलंय. चला आपली छोटीशी परी झोपलीय, तोच झोपून घेऊयात. त्या कधी हलवून सोडतील सांगता येत नाही.” असं म्हणून सगळेच एका नव्या विचाराने आपल्या आपल्या खोलीत गेले, नव्या जोमाने बालराणीच्या तालावर नाचण्यासाठी…


