Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितअश्रू भरल्या डोळ्यांनी आईने केले टाटा...

अश्रू भरल्या डोळ्यांनी आईने केले टाटा…

दिप्ती चौधरी

घरातील माणसे 22 एप्रिलला निघणार होती, त्या आधीचे 20 आणि 21 हे दोन दिवस खूप गडबडीत आणि घाईत जाणार होते. प्रवासासाठी करावी लागणारी RTPCR चाचणीसाठी सकाळी लवकरची वेळ आगाऊ घेऊन ठेवली होती. पण तिथेही मोठी रांग लागली होती. आई घरी येऊन आम्हाला आणि दिदीला हॉटेलमध्ये सोडून परत घरी येणार होती, कारण अमेरिकेच्या सामानाची बांधाबांध करायला पॅकर येणार होते. चाचणीला इतका उशीर झाला की, पॅकर येऊन दाखल झाले तरी आम्ही घरी पोहोचलो नव्हतो! धावतपळत घरी पोहोचलो… बॅगा भरून ठेवल्या होत्या आणि कलोनजी येऊन थांबली होती, त्यामुळे आम्हाला पकडून आई हॉटेलमध्ये सोडणार होती.

आम्हाला दोघांना एकत्र कुठे घेऊन जायचे तर, ती भयंकर कठीण गोष्ट आहे. एक तर एकाला पिंजऱ्यात घालायचे तर, दोन माणसे लागतात. त्यामुळे एकाच वेळेला दोघांना पकडणं अशक्य. एकाला पकडलं की, तो लगेच दुसऱ्याला साद देतो “गोंद्या आला रे…” की दुसरा परागंदा! आता एकदम आणीबाणीची परिस्थिती होती. पॅकर वारंवार फोन करून घरात येऊ का काम सुरू करायला, विचारत होते आणि आम्ही घराबाहेर पडल्याशिवाय त्यांना आत घेता येत नाही.

हेही वाचा – …अन् आम्हीही आमची जबाबदारी उचलली

आई आणि दिदीने पहिला माझ्याकडे मोर्चा वळवला, कारण दनू आधीच कपटावरच्या बॅगांवर जाऊन बसला होता. तिथे पोहोचणं अवघडच होतं. पण मी पकडा-पकडीच्या खेळात एक नंबर आहे, त्यामुळे आई, दिदी आणि कलोंजीला पुरून उरलो. टेबल, खुर्ची यांच्या भोवती गोलगोल फिरून, सोफ्याच्या वरून-खालून… कट्ट्यावर… शोकेसवर असे सगळीकडे सफाईने धावून मी तिघींनाही पुरून उरलो. मस्त मजा येत होती मी पुढे आणि माझ्याभोवती गोल-गोल या तिघी! आई हैराण होती, कारण मधे-मधे पॅकर ‘येऊ का वरती’ म्हणून फोन करून भुणभूण लावत होते. बिल्डिंगची सिक्युरीटी फोन करून ‘तुमचे पॅकर घरात घ्या, त्यांचे सामान बाहेर पडलंय,’ असे ओरडत होती. ड्रायव्हर फोन करून हॉटेलसाठी कधी निघायचे विचारत होता… आणि मी घरभर धावत होतो… ही सगळी पकडा-पकडीची गंमत दनू कपाटावर बसून शांतपणे बघत होता! शेवटी अर्ध्या तासाने मी दमून स्वयंपाकघरातील कपाटावर चढलो आणि आई अन् दिदीने माझे मानगूट पकडले! नंतर आईने मोर्चा वळवला दनूकडे. ती आता एकदम मेटाकुटीला आली होती… तिने ज्या नजरेने पाहिले त्यात दनू काय ते समजून गेला… त्यामुळे उंच शिडीवर चढून बॅगा हलवून त्याला खाली उतरवले आणि मानगूट पकडून कोंबले… त्याने जास्त प्रतिकार केला नाही! कलोनजीला कुठले सामान पॅकरना दाखवायचे ते सांगून, आम्हाला घेऊन आईने हॉटेलकडे धूम ठोकली. हॉटेल प्राणीप्रेमी असल्याने तिथे काहीच अडचण आली नाही. आमचा चार्ज दिदीकडे देऊन ती घरी पळाली. आम्ही तसे ठीक होतो, पण जरा दबकत अंदाज घेत फिरत होतो.

रात्री मात्र आम्ही थोडावेळ खेळून झाल्यावर आता घरी चला म्हणून हट्ट धरला. मी तर दारासमोरच गाणी गात सत्याग्रह पुकारला. दुसऱ्या दिवशी गावाला पाठवायचे सामान बांधण्यासाठी वेगळे पॅकर येणार होते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आमचे कस्टम्समधले सोपास्कार पूर्ण करून आम्हाला डॉ. इरफान यांच्याकडे सुपूर्द करून दुपारी आई दिल्लीसाठी निघणार होती. पण कस्टममध्ये उशीर झाला तर, सगळंच वेळापत्रक कोलमडेल म्हणून तिने काही करून आमची कस्टमची भेट एक दिवस आधी करायची विनंती आमच्या relocation एजन्सीला केली आणि आम्हाला एक दिवस आधी सोडण्याची डॉक्टरांना विनंतीही केली.

हेही वाचा – अमेरिकेला तर जायचंय, पण कसं?

आज PMR पॅकर आमचे सामान जम्मूवरून बंगलोरला घेऊन आले होते, त्यामुळे त्यांनी हे काम खूप जिव्हाळ्याने घेतले. अगरवाल पॅकरचा अतिशय वाईट अनुभव होता आणि त्यांनी घातलेला गोंधळ निस्तरायला पपांच्या ऑफिसमधले तसेच, आमच्या बिल्डिंगमधेच राहणारे शर्मा आले होते. त्यांनी आजही मी जबाबदारी घेतो तुम्ही दुसरी कामे उरका असा मदतीचा हात दिला. आज आलेली पॅकरची टीम खरंच खूप उत्कृष्ट होती आणि त्यात काही अडलं तर शर्माजी होतेच, त्यामुळे त्यांच्यावर घर सोपवून आई आणि दिदी मला घेऊन प्रथम डॉक्टरकडे fit to fly प्रमाणपत्र घेण्यासाठी गेल्या. तिकडून कस्टम ऑफिसमध्ये कागदपत्र जमा करण्यासाठी आणि आमची मायक्रोचिप तपासण्यासाठी घेऊन गेल्या. आमच्या सोबत रेलोकेटर होतेच. त्यांनी आईला सांगितले, काळजी करू नका आम्ही यांना सुखरूप बसवून देऊ.

शेवटी आम्हाला डॉ. इरफान यांच्याकडे सुपूर्द केले. अश्रू भरल्या डोळ्यांनी आईने आम्हाला टाटा केले.

क्रमशः

(पिदू या मांजराची आत्मकथा)

diptichaudhari12@gmail.com

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर शब्दात समर्पक वाक्यात ही सगळी कहाणी वर्णन केली आहे. प्राणीमात्रावर निरातिशय प्रेम असणारी माणसेच मार्जारांसाठी एवढे कष्ट घेऊन त्यांना देशात परदेशात घेऊन जाण्याचा कोशिश करतील?तुमच्या या सर्व कष्टाला शेवटी यश आले. खूप छान मी संपूर्ण लेख वाचत असतो।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!