भाग – 1
घनदाट जंगलात एक प्रकारची रहस्यमय शांतता पसरलेली आहे. सूर्यकिरण झाडांच्या गर्द फांद्यांतून झिरपत जमिनीवर सोनेरी छटा निर्माण करत आहे. आजूबाजूला कुठेही मानवी हालचाल नाही… सर्वत्र निसर्गाचीच सत्ता. पानांमधून हवेच्या मंद झुळकीने हलकासा आवाज होतोय. पक्ष्यांचा किलबिलाट आणि अधूनमधून एखाद्या प्राण्याचा आवाज या शांततेला अजून जिवंत करतोय… कधी एखादा वानर टाळ्या वाजवतो, तर कधी एखादे हरण आवाज करून आपल्या टोळीला सावध करते… थोडे पुढे गेल्यावर नदीच्या खळखळाटाचा आवाज ऐकू येतो. त्याच नदीवर एक छोटा, पण सुंदर असा धबधबा कोसळतोय. पाण्याचे थेंब हवेत उडत असून त्या थेंबांमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगांची हलकीशी झलक दिसतेय.
संपूर्ण परिसर निर्मनुष्य असून, फक्त निसर्ग आणि त्याचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं, असं वाटत होते. कुठेही गोंधळ नाही, चिंता नाही… फक्त शांतता, निसर्ग आणि एक अनोखा अनुभव!
त्या घनदाट जंगलात शांततेचं साम्राज्य गडद झालेलं असतानाच… अचानक पानांमधून, ओलसर जमिनीवरून, काहीतरी वेगळाच आवाज ऐकू येतो… मानवी पावलांचा! पहिल्यांदा तो खूप मंद, पण सावध होता… जणू कुणीतरी आपलं अस्तित्व लपवत सावकाश पुढे येत होतं. पण काही क्षणांतच ही पावले अधिक जोरात, अधिक घाईघाईने पडत असल्याचे ऐकू येऊ लागले.
आता त्यांच्या मागोमाग आणखी काही धावणाऱ्या पावलांचा आवाज… धडधड, धपधप करत झाडांच्या फांद्या बाजूला सारत, ओलसर मातीवर ठसे उमटवत, ती माणसं जंगलात धावत होती. अचानक त्या निर्मनुष्यतेला चिरत, एक अज्ञात भीती वातावरणात पसरली. पक्षी दचकून उडाले, जवळच्या झुडपांत एखादा प्राणी हालचाल करत नजरेआड झाला. धबधब्याच्या खळखळाटामागूनही आता त्या धावणाऱ्या पावलांचा गोंधळ स्पष्ट ऐकू येत होता.
हे कोण होतं? कुणाच्या मागे कोण लागलं होतं? का हे पळणं? जंगलात अचानक माणसांची ही धडपड काहीतरी घडल्याचं सूचित करत होती. शांततेच्या कुशीत असलेल्या निसर्गाने जणू एक क्षणभर श्वास रोखून धरला होता… पुढे काय होणार याची वाट पाहत!
तो जीवाच्या आकांताने धावत होता… प्राण वाचवण्यासाठी चाललेली ती धडपड केवळ शरीराची नव्हती, ती त्याच्या अस्तित्वाची होती! जंगलाच्या पायवाटांवरून, काट्याकुट्यांमधून, गवताच्या उंच गालिच्यातून तो वाट मिळेल तिथे पळत होता… डोक्यावरची मळकटलेली पगडी घामाने ओली झालेली होती. छातीशी घट्ट कवटाळलेली एक छोटी बॅग… त्याच्या पाठीमागे येणाऱ्या माणसांचे पाय घणासारखे आदळत होते. काळे, उंच, भिन्न चेहऱ्याचे ते चार गुंड… जणू मृत्यूचं रूप घेऊन मागे लागले होते. त्यांच्या नजरेत करुणा नव्हती, फक्त मिळवण्याची भूक होती… ती बॅग, तो माणूस…
हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…
तो पळताना कुठे जातोय, कुठे वळतोय, याचं भान त्याला उरलेलं नव्हतं. धबधब्याजवळचा ओला दगडही त्याच्यासाठी सापळा बनू शकत होता! पण तरीही त्याचे पाय थांबत नव्हते. पानांमधून घुसत, काट्यांत अडकत, धडपडत… तो फक्त पळतच होता. आता फक्त दोन गोष्टी शिल्लक होत्या, धडधडतं हृदय आणि धोक्याने भरलेली पाठीमागची सावली!
घनदाट जंगल आता आणखी गडद झालं होतं, इतकं की सूर्यकिरणांचाही स्पर्श जमिनीवर होत नव्हता. त्या माणसाच्या थकलेल्या पावलांनी आता एका अशा भागात पाऊल टाकलं होतं, जिथे निसर्ग जरा अधिक रौद्र होता, अधिक गूढ होता. त्याच्या मागे पळणाऱ्या गुंडांच्या आणि त्याच्या मधलं अंतर कमी झालं होतं. त्याचा श्वास जोरजोरात सुरू होता, पण त्याने थांबण्याची हिम्मत केली नाही. झाडांच्या फांद्या त्याच्या शरीरावर ओरखडे उमटवत होत्या, पण त्याचं लक्ष फक्त सुटकेकडे होतं.
अचानक… त्या जंगलाच्या शांततेला चिरत एक आर्त किंकाळी आसमंतात घुमली. ती किंकाळी जशी लोप पावली, तशी ती माणसं त्या दिशेने पुढे सरसावली… ती आर्त किंकाळी कोणाची ते काहीच कळले नाही, पण आवाज तर एखाद्या स्त्रीचा जाणवला…
त्या आवाजाने मागे येणारे गुंड थबकले. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अनिश्चिततेचं सावट दिसलं! त्यांनी चारही दिशांना पाहिलं… कानोसा घेतला, श्वास रोखून काही ऐकायचा प्रयत्न केला…
तो एक शीख युवक होता… डोक्यावर घट्ट पगडी, डोळ्यांत निश्चयाची ज्वाळा, पण चेहऱ्यावर भीतीचा सावट. जंगलात जीवाच्या आकांताने धावत आलेला! त्याच्या मागे गुंड होते, हिंसेचे उपासक… पण आता, त्यांच्यासमोर तो नव्हता. एक क्षण असा आला की, जणू त्याला जमिनीने गिळंकृत केलं होतं किंवा आकाशाने? की झुडुपांनी त्याला आपल्यात सामावून घेतले?
गुंड सैरभैर झाले. एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत… त्या जंगलात ते पहिल्यांदाच गोंधळले होते… हिंस्र असून, आतून हादरलेले. त्यांच्या हाती असलेली शस्त्रं त्यांनी आवेशात उचलली. झुडूपं कापून बघितली… जमिनीवर वार करून पाहिलं… हवेतही एकेक वार करून बघितले…
त्यातील एकाने रागाने वार करताना, अचानक तलवार घेऊन पुढे झेप घेतली… आणि ती तलवार जमिनीत खूपसणार होता… पण दोन जणांच्या वर काही अंतरावर ती पात थांबली… कोणीही थांबवलं नव्हतं, तरी ती न हलता तशीच राहिली! त्यांच्या चेहऱ्यावर आता घामाच्या धारा वाहू लागल्या. हे काय? कोणतं अज्ञात बळ होतं? तो युवक कुठे गेला? आणि हे जंगल… हे खरंच जंगल होतं की काही वेगळंच?
झाडांची पानं जणू कुजबुजू लागली… जणू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. गुंडांच्या हिंसेला आता जिथं काही सापडत नव्हतं, तिथं भीतीने त्यांची गाळण उडाली होती! तेवढ्यात दूरवर झाडांमधून एक भला मोठा दगड घरंगळत जाताना दिसला… त्याच्या घरघराटीने आजूबाजचं सगळं काही क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. तो दगड जणू कुणीतरी मुद्दाम ढकलल्यासारखा वेगाने सरकला…
हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा
गुंडांपैकी एकाने नकळत पाय मागे घेतले. त्यांच्या भक्कम शरीरातही आता भीतीचा एक लहर पसरत होती… जंगल आता केवळ जंगल नव्हतं, ते एक जागं, सावध आणि काहीसं रक्षण करण्याच्या भूमिकेत होतं! सूर्य आता झाडांच्या टोकांआड झुकू लागला होता. आकाशात केशरी-रक्ती छटा पसरत होत्या… आणि जंगलातलं प्रकाशाचं अस्तित्व हळूहळू विरू लागलं… सगळीकडे एक गूढ, अनाकलनीय शांतता पसरू लागली होती. दिवसाचा अंत, पण या जंगलासाठी ते केवळ रात्रीची सुरुवात होती…
गुंड त्या शांततेत अधिक अस्वस्थ झाले. आता ना तो युवक दिसत होता, ना त्याच्या अस्तित्वाचा कुठलाही मागमूस. वरून झाकलेली झुडुपं, खोल दऱ्या आणि अज्ञात सावल्या… सगळं एक अंधाराच्या साम्राज्याप्रमाणे त्यांच्या भोवती गोळा होत होतं… त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कुणी काही बोललं नाही, पण चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलं होतं, इथे रात्र काढणं म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ! ज्या हिंसेच्या बळावर ते इथवर आले होते, ती हिंसा आता निरुपयोगी वाटत होती.
“बॉसला सांगायचं, तो दरीत पडला,” एकजण म्हणाला.
बाकी तिघांनी निमूट मान डोलावली. “आपल्याकडे साधनं नाहीत. खाली उतरणं शक्य नव्हतं,” असं सांगून मोकळं व्हायचं.
ते चौघे मागे फिरले. त्यांच्या पावलांमध्ये आता ती आधीची ताकद नव्हती. एक अनामिक ओझं त्यांच्या मनावर दाटलेलं होतं… केवळ त्या युवकाच्या गायब होण्याचं नव्हे, तर त्या जंगलाने त्यांना दाखवलेल्या पराभवाचं…
सूर्य पूर्ण मावळला. अंधार जंगलात उतरला… पण तो युवक मात्र कुठे तरी अजूनही होताच, त्या अंधाराचा भाग बनून…!
गुंड मागे फिरल्यानंतर जंगल पुन्हा आपल्या नैसर्गिक शांततेत परतलं, पण त्या शांततेमागे काहीतरी लपलेलं होतं… हालचाल, जिवंतपणा आणि एक नवं सत्य.
ती जागा… जिथे युवक गायब झाला होता, तिथे जमिनीवर काही वेळाने मऊ झुडुपं बाजूला सरकली. खाली एक अरुंद, पण सुरक्षित वाट असलेली गुहा उघडकीस आली. त्यातला अंधार खोल होता, पण त्यात एक विलक्षण शीतलता होती… घाबरवणारी नव्हे, तर ओढ लावणारी! त्या वाटेवर काळजीपूर्वक खाली खेचला गेलेला तो युवक आता एका छोट्याशा गुहेत पोहोचला होता!
पाला-पाचोळ्यावरून जाणाऱ्या पावलांचे आवाज जसजसे क्षीण होत गेले, तसतसे वातावरण पुन्हा त्या भेसूर शांततेच्या अधीन जाऊ लागलं. अखेरीस… आवाज पूर्णपणे थांबले. जंगल पुन्हा एकदा जणू थांबून गेले!
त्या क्षणात, गुहेच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात दाबून धरलेलं तोंड सोडलं गेलं. शीख युवक जोरात श्वास घेत काही क्षण नि:शब्द पडून राहिला. त्याच्या तोंडावरचा हात हळूच मागे घेतला गेला… तो हात मजबूत होता, पण त्यात हिंसा नव्हती… तर जागरूकता आणि इशारा होता!
“शांत… अजून काही क्षण थांब,” एक खोल, गंभीर आवाज कानात घुमला. तो स्वर नवखा होता, पण त्यात आश्वासन होतं… आणि थोडं गूढही.
युवकाने हळूच मान वळवून पाहिलं आणि त्याच्या नजरेस पडला एक तरुण, पण तेजस्वी चेहरा! दाट दाढी, डोळ्यात खोल शहाणपण, बलदंड शरीरयष्टी अंगावर साधं वस्त्र आणि संपूर्ण शरीरावर चिखलाच लेपन होतं.
त्या व्यक्ती ने इतका वेळ आपल्याला दाबून धरल्याचं त्याच्या लक्षात येताच तो धडपडत उठला. पण त्याच्या शरीरात आता तितकीशी ताकद नव्हती…
बाहेर आता केवळ झाडांची कुजबूज होती, पण त्या कुजबुजीतही काहीतरी बोललं जात होतं. जसं जंगल स्वतः काही सांगू पाहत होतं… त्याच्या छातीत धडधड अजूनही सुरूच होती… प्रत्येक श्वास खोल, घाईघाईचा… त्या अनोळखी, पण आश्वासक व्यक्तीने ते जाणलं… त्याने हळूहळू गुहेच्या प्रवेशद्वारावरचं मजबूत आच्छादन, जणू काळजीपूर्वक लपवलेला दरवाजा, अलगद बाजूला केला आणि गुहा उघडली… थोडासा बाहेरचा प्रकाश दिसला… पण आता तोही झपाट्याने कमी होत चालला होता. सूर्य मागे सरकून अंधार आपली चादर पसरण्यास सिद्ध झाला होता.
युवक पटकन उठून उभा राहिला. चेहरा विचारांमध्ये हरवलेला… तो बाहेर पडून थांबला, समोर फक्त काळोख आणि गूढ झाडांची रांग. जंगल आता दिवसाच्या ओळखीचं नव्हतं, ते परकं, पण जिवंत वाटणाऱ्या अस्तित्वाने व्यापलेले होते!
“आता काय? इथून निघणार कसं? …आणि जाऊ तरी कुठे?” चेहऱ्यावर प्रश्नचिन्हांची गर्दी झाली होती…
कशी वाटतेय कथेची सुरुवात सांगायला विसरू नका…


