स्नेहा सुतार
खरंतर, जोरात आपटल्यामुळे डोकं जाम दुखायला लागलेलं. टेंगुळ बिंगुळ नाही ना, तिने एकदा मोबाइलच्या कॅमेऱ्यात सेल्फी मोडवर बघून घेतलं. लालसर झालेलं दिसत होतं. गाडी मुळगावला पोहोचली, तेव्हा आता सगळं आवरून बसुया म्हणून तिने बॅगची चेन नीट बंद केली. इअरफोन काढून वरच्या कप्प्यात टाकले, त्याचीही चेन लावली. आता जरा ती सावरुन बसली. गार वारा चेहऱ्यावर येत होता. पाऊस पडून गेल्यामुळे सगळी झाडं निथळत थरथरत उभी होती. “सुशांत बार” कंडक्टर ओरडला. दोन माणसं पुढे सरसावली. त्यांचा स्टॉप आल्यामुळे गर्दी ढकलत, उकलत पुढे गेली आणि दाराकडल्या दांड्याला धरून उभी राहिली. “राव रे, सुशांत बार्र” पुढच्या माणसाने कंडक्टरला सांगितलं. कंडक्टरने मान हलवली आणि “राव रे, सुशांत बार” म्हणून त्याने ड्रायव्हरला ओरडून सांगितलं. जराच पुढे गेल्यावर बसने ब्रेक मारला. दार उघडलं गेलं. चार पावलं बाहेर रस्त्यावर उतरली. कंडक्टरने बसचं दार जोरात ओढलं. “देवळाकडे, देवळाकडे” पुढच्या स्टॉपची तयारी करायला लागला पण हा! पुन्हा चार डोकी हलली, पुन्हा गर्दी उकलून वाट काढत पुढे गेली. आता “गॅरेजिकडे बोड्डयां” ऐकू येईपर्यंत एकेका स्टॉपची नावं ऐकत बसायचं…
तिने एक दोनदा फोन चेक केला. कल्पना मावशी, सूर्यकांत, आई असे नोटिफिकेशन दिसले व्हॉट्सॲपचे. त्याचा नेहमीप्रमाणे नव्हताच! बाकी काय मावशी, ‘माणसे जपली, नाती जपली की जग सुखी राहतं आपलं’, ‘आयुष्य म्हणजे खेळ आहे आणि आपण त्यातले खेळाडू’, ‘काया वाचा मन शुद्ध असू द्यावे…’ असलेसे quotes पाठवत असणार. इमेजच होती काहीतरी. नोटिफिकेशनमधून बघितल्यामुळे दिसत नव्हती. सूर्यकांतने कसली link पाठवलेली. आईने? आईने नक्कीच ॲमेझॉन नाहीतर फ्लिपकार्ट किंवा मीशोवरची कुठल्यातरी प्रॉडक्टची link पाठवलेली असणार. आईला मोबाइलवर यासाठीच व्हॉट्सॲप दिलाय, असं वाटतं का कोण जाणे! आणि सकाळी सकाळी नातेवाईकांना सुप्रभातचे फोटो पाठवायला. नाती, सुंदर सकाळ, देव, भक्ती, आयुष्य, आनंद, मन…. असल्याच विषयांसह good morning नाहीतर सुप्रभात! प्रत्येकाची एकेक तऱ्हा. तो? Gm या एवढ्या दोन अक्षरांत सकाळ खुलवतो. पुरेसं असतंय एवढंच. ही पण एक गंम्मतच आहे नाही? आपल्या आवडत्या व्यक्तीचं एक टिम्ब जरी मिळालं ना मॅसेजवर तरी ती वेळ फुलासारखी खुलते. इथे गाणं आठवलं… “कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती… येती नि जाती… येती नि जाती…” ती हळू आवाजात गुणगुणू लागली. बाजूच्या म्हातारीने काहीसं तिरप्या नजरेने तिच्याकडे बघितलं तशी ती गप्प झाली. तिखट कानांची आहे म्हातारी!
हेही वाचा – बस सुटताना जोरदार पाऊस अन्…
“बोड्डया गॅरेज” आवाज ऐकल्यावर ती विचारातून भानावर आली. गर्दी असली तरी आता विरळ झालेली. तिच्या सीटच्या मागेच बसचं मागचं दार असल्यामुळे तिला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. बसच्या मागच्या दारातल्या पायऱ्यांच्या दांड्याला धरून ती उतरण्यासाठी म्हणून तयार राहिली. “राव आ” असं म्हणून तिने दांड्यावरची पकड घट्ट केली. बसने ब्रेक मारला. ” बाय सावकाश देव हा… ” क्लीनरने म्हटल्यावर ती हसली. “थँक यू” म्हणून तिने त्याला बघून मान लववली. हे काका कधीपासून असतील या कामावर ना? बसमधून उतरताच तिचे विचार सुरू झाले. काय असेल ना या लोकांचं लाइफ! सकाळी उठा, बसवर चला, गाडीत पेट्रोल टाका, साखळी ते पणजी, पणजी ते साखळी करा, दुपारी डबा खा, पुन्हा ये जा. रात्री घरी चला, जेवा, झोपा. किती दमत असतील ना बिचारे. त्यात दिवसभर ओरडत राहायचं. प्रत्येक स्टॉपचं, बस स्थानकाचं नाव घ्यायचं मोठमोठ्याने, बसमधली गर्दी आवरायची…
तिला आठवलं… वर्गात तिच्या बेंचकडून दोन बेंच सोडून मागे लीला बसायची. ही लीला म्हणजे वर्गातली आगाऊ मुलगी. तिच्या शेजारी पूजाला बसवलेलं. अगदी शांत, सोज्वळ पोरगी. लीलाने चिमटा जरी काढला तरी हाय हुय करून दाखवत नसायची. लीलाला सवय होती बोलता बोलता हळूच चिमटे काढायची. म्हणून कुणी जवळ जाऊन बोलत नसत तिच्या. तर, पूजा म्हाव्हळींगे गावातून बिचोलीला यायची शाळेत. बसचा प्रवास. पाचवीपासून ती सोबत होती एकाच वर्गात. अभ्यासात तशी सो सो. हुशार पण नाही आणि ढ पण नाही. गणितात मात्र चांगले गुण घ्यायची. कठीण वाटणारी गणिते सहज सोडवायची.
नववीत असताना गावातून येता जाता बसमधल्या कुणा कंडक्टरसोबत तिचं होतं, असं हिला कळलेलं. बापरे! हिला प्रचंड आश्चर्य वाटलं. पूजा असं करेल अशी सुतराम पण कल्पना नव्हती. यांचं सातवीपासून चालू होतं म्हणे. एकदा लीला आणि पूजाची चक्क भांडणं झाली, वर्गात मधल्या सुट्टीत. लीलाने पूजाला या गोष्टीवरूनच ट्रिगर केलं. पूजा आणि त्याच्यात काहीतरी तेव्हाच बिनसलेलं म्हणे, तर पूजा अचानक आक्रमक बनली. लीलाच्या वेण्या ओढून तिने तिला बोचकारलं सुद्धा नखांनी. हे सगळं इतकं सर्वांना अनपेक्षित होतं की, लीला सुद्धा शॉक होऊन तिला आ वासून बघतच राहिली… पूजाला आम्ही लीलापासून सोडवलं आणि पूजा हमसाहमशी रडायला लागली. डेस्कवरची वही पण तिने फाडली. शिक्षक वर्गात धावून आले एव्हाना. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मुख्याध्यापकांनी तिला आणि लीलाला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. तोवर पूर्ण शाळाभर हीच चर्चा सुरू झाली.
पूजा प्रिन्सिपल केबिनमधून परत आली ती एखाद्या भेदरलेल्या, वाट चुकलेल्या बछड्यासारखी. सर्वांच्या नजरा परक्या, बोलणं परकं… ती पुन्हा शांत झाली. इतकी शांत की नंतर ती शाळेत यायचीच बंद झाली. नंतर उडत्या बातम्या आल्या. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन दहावी झाल्यावर लग्न केलं त्याच्याशी. काही वर्षांनी समजलं तिला बाळ झालंय. काही वर्षांनी ‘ती’ कॉलेजमध्ये गेली.. तेव्हा तिला समजलं की, पूजाला पुन्हा दिवस गेलेयत. काय बाई एकेकाची स्टोरी…
हेही वाचा – स्वप्नं आणि प्रवास
विचार करता करता ती जिना चढून फ्लॅटच्या दाराबाहेर कधी येऊन पोहोचली, ते तिचं तिला कळलं नाही. खिडकीतून कुणी हॉलमध्ये दिसत नव्हतं म्हणजे आई आत किचनमध्ये असणार. बाबा अजून आले नसतील कामावरून. तिने अंदाज लावला आणि चपलांच्या रॅकमधल्या चपलांकडे बघितलं. ‘हं… बाबा आले नाहीयेत अजून तर…’ मनातल्या मनात म्हणून तिने दार वाजवलं. तिचा नियम होता. बेल नाही वाजवायची. हळूच दार खटखटवायचं. म्हणजे, आई दचकणार नाही आणि हीच आलीये हेही तिला कळणार. आईची चाहूल लागत नाहीशी बघून, काही वेळ थांबून पुन्हा तिने दार खटखटवलं. आतून काही पावलांचा आवाज येईना म्हणून हाताची घडी घालून गुणगुणू लागली…
मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो
क्रमश:


