डॉ. किशोर महाबळ
शिक्षण, शिक्षणाचा आशय, शिक्षणाची उद्दिष्टे, शिक्षणाकडून अपेक्षा, यश याबद्दल आईवडिलांची मते, विचार आणि दृष्टिकोन काय आहे, यावर ते आपल्या मुलांना कसे शिक्षण देतील, हे ठरते. शिक्षणातून काय साध्य व्हावे असे आजच्या पालकांना वाटते? काही अपवाद वगळता बहुसंख्य पालकांना आपल्या मुलाने फक्त डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावेसे वाटते. त्यांची ही इच्छा ते आपल्या मुलाच्या मनावर लहानपणापासूनच ठसविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. मुलांनाही हळूहळू तेच उत्तम वाटू लागते. चांगल्या वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे, हेच असंख्य मुलामुलींच्या शालेय शिक्षणाचे, मग एकमेव उद्दिष्ट होते.
या प्रवेशासाठी आवश्यक त्या परीक्षांमध्ये खूप गुण मिळविणे आवश्यक असते. त्यासाठी अशा परीक्षांमध्ये भरपूर गुण मिळवून देण्यात मदत करणारी शाळा आणि शिकवणी वर्ग यात प्रवेश मिळावा, यासाठी मुलाच्या लहानपणापासूनच पालक प्रयत्न करू लागतात. त्यानंतर आपल्या पाल्याला लहान वयातच, लवकरात लवकर, जास्तीत जास्त कसे शिकविता येईल, याची पालक तयारी करू लागतात. अगदी लहानपणी बालवाडीत घालण्यापासून याची सुरुवात होते. इतर मुलांच्या तुलनेत आपले मूल अधिक पुढे गेले पाहिजे, हा विचार तर असतोच असतो. यामुळेच ज्या वयात मातृभाषेतून अधिक चांगले शिक्षण होऊ शकते, त्या वयात मुद्दाम इंग्रजी शिकविण्याचा आग्रह धरला जातो. ज्या वयात ज्या स्तराचे शिक्षण घेणे योग्य असते, त्या वयात ते ते शिक्षण देण्याऐवजी, जे शिक्षण घेण्याची बौद्धिक क्षमता मुलात विकसितच झालेली नसते, ते शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू होतो. याशिवाय, मुलाने फक्त शिकणे पालकांना पुरेसे वाटत नाही. या विषयांत त्याने जास्तीत जास्त गुण मिळविले पाहिजेत, अशीही अपेक्षाही असते. यासाठी त्याच्यावर दबाव आणला जातो. छंद, कला, खेळ, सर्जनशील उपक्रमातील सहभाग अशा गोष्टी कमी महत्त्वाच्या ठरविल्या जातात. महत्त्व दिले जाते ते स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी तयारी करण्याला!
दरवर्षीच्या शालेय अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा नीट व्यवस्थित अभ्यास करण्यास प्रोत्साहन देण्याऐवजी विज्ञान आणि गणिताच्या अभ्यासाला जास्त महत्त्व दिले जाते. कारण याच विषयांवर आधारित परीक्षा पुढे आपल्या मुलाला द्यायची आहे. याची पालकांना पूर्ण जाणीव असते. परीक्षेत कोणत्या विषयाच्या कोणत्या भागावर जास्त प्रश्न येतात, हे बघून त्याच भागाचा जास्त अभ्यास करण्यास महत्त्व दिले जाते. अन्य भाग अभ्यासण्यात वेळ घालवू नको, असे पालक आणि अगदी शिक्षकही मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली सांगत असतात. एखादी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी हा सल्ला कधीकधी उपयुक्त ठरतोही; पण त्यामुळे विद्यार्थ्याना परीक्षेपुरताच काही विषयांवरच भर देणारा अभ्यास करण्याची सवय लागते. विषयाचे व्यापक ज्ञान मिळविण्यात रूची राहात नाही. यामुळे जिथे जिथे सखोल ज्ञानाची आवश्यकता असते, अशा क्षेत्रात या मुलांना काहीच भविष्य नसते. आपल्या मुलात व्यवसायांसाठी आवश्यक त्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे की नाही, त्याच्या आवडीचे विषय कोणते आहेत, याचा विचार पालक करीत नाहीत. याचे अत्यंत दूरगामी वाईट परिणाम होतात. अर्थात, ते जाणून घेण्याची पालकांना इच्छाच नसते. कारण त्यांना आपल्या मुलांद्वारे स्वत:ची इच्छा पूर्ण करायची असते ना!
डॉक्टर किंवा इंजिनीअर होण्यासाठी आवश्यक त्या परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठी शालेय स्तरापासून जे शिकायचे असते, ते म्हणजे शिक्षण! हीच व्याख्या… डॉक्टर किंवा इंजिनीअर होता येणे, हेच शिक्षणाचे उद्दीष्ट असते आणि हे साध्य करणे म्हणजे यश, अशा कल्पना मुलांच्या मनावर कळत नकळतपणे बिंबविल्या जातात. या शिकवणुकीचाही मुलांच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम होतो. विषयाचे सखोल ज्ञान असणे, हेच खरे तर सर्वात उपयुक्त ठरते. जी मुले डॉक्टर, इंजिनीअर होऊ शकत नाहीत, त्यांना हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे अपयश वाटू लागते, कारण आईवडिलांनाही ते आपल्या मुलांचे फार मोठे अपयश वाटते आणि अपेक्षाभंगाचे दुःख होते. समाजातील इतरांनाही हे अपयशच वाटते. डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याऐवजी शिक्षक किंवा अन्य काही व्यवसाय करावे लागले तर, ते कमीपणाचे वाटते! असे अपेक्षाभंगाचे दुःख अनुभवलेले असंख्य पालक आज आपल्याला दिसू लागले आहेत. असे का होत असावे?
हेही वाचा – कथालेखक आणि कथाकथनकारांचा शोध
मोठ्या पदाची नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने शिकणाऱ्यांची संख्याही आज बरीच आहे. आपल्या मुलाला अशी नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागणार, हे ओळखून काही पालक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाची फी भरण्यासाठी अक्षरश: हजारो रुपये खर्च करू लागले आहेत. कोणता विषय घेणारे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत मोठ्या संख्येत उत्तीर्ण होतात, हे बघून तो विषय घेतल्यास आपणही ती परीक्षा उत्तीर्ण होऊ, असे मानणारे विद्यार्थी भरपूर आहेत. तोच विषय घेऊन ते परीक्षेला बसतात. हे करताना पुन्हा परीक्षेच्या दृष्टीनेच अभ्यास करण्यावर भर दिला जातो. एवढे सगळे करूनही असंख्य विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत. मग तेच ‘आमच्या या शिक्षणाचा काय फायदा?’ असा प्रश्न विचारायला लागतात. असे का होत असावे?
शिक्षणाचा व्यापक आशय आणि संदर्भ लक्षात न घेतल्यामुळे असे होते. शिक्षण म्हणजे फक्त परीक्षेपुरता अभ्यास करणे नव्हे, हे समजून घेणे नितांत गरजेचे आहे. अनेक उत्तम पाठ्यपुस्तकांतून विविध उपविषयांबद्दल माहिती, संकल्पना, सिद्धांत, मुद्दे समजून घेणे हा कोणत्याही विषयाच्या अभ्यासातील पहिला टप्पा असतो. त्या विषयासंबंधातील अन्य पूरक माहिती देणारे ग्रंथ वाचणे, समजून घेणे, त्या ग्रंथातील मुद्द्यांचा विचार करणे, अभ्यासकांच्या मतांचा अभ्यास करणे हा अभ्यासातील पुढचा टप्पा असतो. विषय जर विज्ञानाशी संबंधित असेल तर प्रयोग करून सिद्धांत समजून घेणे, हाही भाग महत्त्वाचा असतो. विषयातील विविध संकल्पनांचा, माहितीचा उपयोग विविध शास्त्रांत किंवा व्यवहारात कसा केला जातो हे समजून घेणे अपेक्षित असते. याशिवाय, या विषयातील ज्ञानाचा उपयोग अन्य कुठे करता येऊ शकतो, याचा सर्जनशीलपणे विचार करणे, हाही अभ्यासाचा भाग असतो. हे सगळे अत्यंत गंभीरपणे, काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करणे म्हणजे कोणत्याही विषयाचा नीट अभ्यास करणे होय. खरेतर याच पद्धतीने शालेय स्तरापासूनच प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्यात विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. असा अभ्यास करण्यात आज कुणीच महत्त्व देत नाही, ही आजची परिस्थिती आहे.
नोकरी मिळविणे, सर्व दृष्टींनी सर्वांना संपन्न जीवन जगण्यास मिळावे, हे उद्दिष्ट शिक्षणाव्दारे साध्य झाले पाहिजे, असे म्हणण्यात काहीच चूक नाही; पण तेवढे एकच उद्दिष्ट योग्य मानणे हे योग्य नाही. ज्ञानग्रहण करणे, विविध विषयांचे आकलन समृद्ध करणे, काय योग्य, काय अयोग्य हे जाणणे, चिकित्सक विचार करण्याची क्षमता प्राप्त करणे, आपल्या ज्ञानेंद्रियांचा आणि क्षमतांचा योग्य उपयोग कसा करायचा, हे शिकणे, सामाजिक कर्तव्यांची जाणीव वृद्धिंगत करणे, कोणालाही जात-पात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, त्वचेचा रंग या आधारावर कमी न लेखणे, सर्व विषय आणि सर्व व्यवसाय समान महत्त्वाचे मानणे या सर्व गोष्टी विद्यार्थ्यास शिकविणे, हेही शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला हे ही शिक्षण मिळालेच पाहिजे. सामाजिक बांधिलकी, स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या नैतिक मूल्यांचे पालन, साहित्य, संगीत, कला यांचे महत्त्व, सचोटी, चारित्र्य या गोष्टी शिकविल्या जाणे, त्यांचा विद्यार्थ्यांच्या जीवनात परिपोष होणे, हेही शिक्षणातून साध्य व्हायला हवे. यासाठी शिक्षण द्यायचे आहे. तरच, ते खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण शिक्षण होईल.
हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध
शिक्षणाच्या या व्यापक आशयाकडे शिक्षकांचे, पालकांचे लक्षच नाही, अशी आजची परिस्थिती आहे. साक्षरता वाढविणारे, पण सुशिक्षित करण्यात अपयशी ठरणारे शिक्षण आपण देत आहोत. ज्यांनी शाळेत शिक्षण द्यायचे आणि ज्यांनी घरात शिक्षण द्यायचे त्यांनी शिक्षणाचा व्यापक आशय लक्षात न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. माणूस घडविणारे, व्यक्तिमत्वाचा विकास करणारे, ज्ञानोपासनेचे महत्त्व शिकविणारे, ज्ञानमय जीवनाचे श्रेष्ठत्व शिकविणारे, शिक्षण देण्याऐवजी फक्त भौतिक समृद्धीचे उद्दिष्ट साध्य करण्यास पूरक ठरेल अशाच शिक्षणाचा विचार आज होऊ लागला आहे. ही परिस्थिती बदलविण्यासाठी काय काय करता येईल, याचा विचार कायला हवा.


