साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 ऑगस्ट 2025
प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
मेष राशीसाठी हा आठवडा खूप शुभ घटनांचा आहे. रवी स्वतःच्या सिंह राशीत आला आहे. मेष राशीच्या पंचमात सिंह रास आहे. मुलांकडून आनंददायी बातम्या मिळतील. तुमची कामासंबंधात एखादी कल्पना अमलात आणाल. कलात्मकतेला वाव मिळेल. गणपती बाप्पाचे आगमन आनंददायी ठरू शकेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्ये पाळा. महिलांनी स्वयंपाक करताना काळजी घ्यावी, नियोजन करून कामे करा. विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवू शकतील. चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा अशा संधी मिळाल्यास विद्यार्थ्यांनी नक्की भाग घ्यावा.
वृषभ
या आठवड्यात घरी राहून काम करण्यास मिळेल (वर्क फ्रॉम होम), त्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. घरातील रेंगाळलेली कामे या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. रवी, केतू आणि बुध चतुर्थात असल्यामुळे वेळ कमी आणि काम जास्त असे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाची वर्गवारी केल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. महिलांना घरातील लोकांना आणि कामाला प्राधान्य द्यावे लागेल. घरातील किंवा सोसायटीमधील बाप्पाच्या आगमनाच्या तयारीमध्ये विद्यार्थ्यांचा छान वेळ जाईल.
मिथुन
या आठवड्यात तुम्हाला कामासाठी बाहेरगावी जावे लागू शकते. नोकरदार व्यक्तींना स्वतःच्या नेहमीच्या कामासोबतच सहकाऱ्यांची कामेही करावी लागू शकतात. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि तुम्ही स्वतःसाठी खर्च करू शकाल. महिलांना माहेरी जाण्याची संधी मिळू शकते आणि मनासारखी खरेदी करता येईल. विद्यार्थ्यांना छोटे प्रवास घडू शकतात. वादविवाद स्पर्धेत संधी मिळाल्यास नक्की भाग घ्या.
कर्क
या आठवड्यात तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील. तुम्ही कुटुंबासाठी नवीन खरेदी करू शकाल. महिलांना घरातील लोकांना आनंदी ठेवता येईल. मदतनीस महिला कामाला दांडी मारू शकतात, त्यामुळे तुम्हाला जास्त काम करावे लागेल. विद्यार्थ्यांना परिस्थिती ओळखून वागावे लागेल. प्रामाणिक प्रयत्न करत राहा.
सिंह
या आठवड्यात रवी स्वराशीत आहे. या आठवड्यात कामात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळू शकेल. तुम्ही सर्व कामे वेगाने आणि पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराची मदत मिळू शकते आणि तुमची तब्येत उत्तम राहील. कामाचा उत्साह वाढेल. महिलांना कामाचा उरक राहील, तुम्ही पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करू शकाल. विद्यार्थ्यांना नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
कन्या
या आठवड्यात तुमच्या कामाचा ताण जास्त राहील. तुम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे नाराज न होता पुढे जात राहा. तुमच्या कामाचे नियोजन व्यवस्थित करा आणि तब्येतीची काळजी घ्या. छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. महिलांनी बाप्पा आणि गौराईच्या आगमनाची छान तयारी करावी, ज्यामुळे तुम्ही आनंदात राहाल. विद्यार्थ्यांचे छोटे प्रवास होतील आणि त्यांना नवीन मित्रमैत्रिणी भेटतील.
हेही वाचा – Mental Health : आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव
तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप स्पेशल आहे. रवी लाभस्थानात विराजमान आहेत. त्यासोबत केतू आणि बुध आहेत. कामात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला लाभही मिळू शकेल. नवीन संधी चालून येतील. तुमच्या मतावर ठाम राहा. कोणताही निर्णय घेताना, नीट विचार करून आणि वरिष्ठांशी चर्चा करूनच घ्या. महिलांना भिशी लागू शकते, जुनी येणी मिळू शकतात. तुम्ही नवीन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकरीच्या संधी मिळतील.
वृश्चिक
या आठवड्यात तुम्हाला कर्मानुसार फळ मिळते, हे समजेल. तुम्ही मनापासून काम करू शकाल. सहकारी आणि वरिष्ठांकडून तुम्हाला मदत मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. महिलांची सर्व कामे मार्गी लागतील आणि घरात पाहुणे येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यावा.
धनु
या आठवड्यात तुम्हाला काही शुभ संकेत मिळू शकतात. कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे आणि परदेशी जाण्याचेही योग आहेत. नोकरदार व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. तुम्ही घरासाठी नवीन वस्तूंची खरेदी करू शकाल. महिलांना माहेरी जाण्याची संधी मिळू शकते आणि जुन्या मैत्रिणींशी भेट होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि नशिबावर नाही, तर कर्मावर विश्वास ठेवावा.
मकर
या आठवड्यात तुम्हाला कामाचा ताण जाणवेल. कामासंदर्भात मानसिक ताण असू शकतो, पण तुम्ही तुमच्या कामात परिपूर्ण असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांच्या दृष्टीने मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणार नाहीत, तरीही मन स्थिर ठेवून पुढे जात राहा. कामात अडथळे येतील, पण विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे सोडू नये.
कुंभ
या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी भागीदार आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व कामे सुरळीत पूर्ण होऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या. महिलांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. सहकाऱ्यांसोबत हा आठवडा उत्तम जाईल. विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत राहावे, सर्व ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
हेही वाचा – स्वाभिमानी की हेकेखोर?
मीन
या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीची कामे मिळतील. कामात तत्परता ठेवावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा, ती गहाळ होण्याची शक्यता आहे. महिलांना मुलांसाठी खर्च करावा लागेल. मुलांच्या मागण्या योग्य आहेत का, हे पाहून त्या पूर्ण करा. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यावा, यश मिळण्याची शक्यता आहे.