उन्हाळ्यात कैरी बाजारात यायला सुरुवात होते, तेव्हापासून विदर्भातील गाव-खेड्यांमध्ये, घरोघरी आंब्याची कढी केली जाते. आमच्याकडे कच्च्या कैरीलाही आंबाच म्हणतात आणि पिकलेल्या आंब्याला सुद्धा आंबाच म्हणतात! रोडगे, वांगी-बटाट्याची भाजी, साधं वरण, गूळ- तूप आणि ही आंब्याची कढी याने हनुमान जयंतीच्या भंडाऱ्यांची सांगता होत असते. वर्धा, नागपूर जिल्ह्यांमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने जे कार्यक्रम होतात, तेव्हा गावागावांतील हनुमानाच्या मंदिरांमध्ये हा प्रसाद ठरलेला असतो. नाहीच काही तर, मसालेभात आणि कढी हे नागपूरच्या कुठल्याही भंडाऱ्यातील ठरलेले पदार्थ आहेत. याच कढी प्रकारातील वैशिष्ट्यपूर्ण अशी ही आंब्याची किंवा कैरीची कढी आहे. उन्हाळ्यात तलखी देणारा असा पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया कैरीच्या कढीची रेसिपी!
साहित्य
- कैऱ्या – 2 (थोड्या पिवळसर असल्या तरी चालतील)
- बेसन – 1 चमचा
- दालचिनी – 1 तुकडा
- आले- लसणाची पेस्ट – 1 चमचा
- मिरे – 3-4
- लवंगा – 3-4
- गूळ – कैरीच्या आंबटपणानुसार
- मीठ – चवीनुसार
- मेथीदाणे – 8 ते 10
- हिंग – 1 लहान चमचा
- हिरव्या किंवा लाल मिरच्या – 2
- धणेपूड – 1 चमचा
- जिरेपूड – 1 चमचा
- मोहरी – 1 लहान चमचा
- हळद – 1 चमचा
- कढीपत्ता – 8-10 पाने
- कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
- तेल – फोडणीसाठी
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल भातावरचे पिठले
कृती
- प्रथम कैऱ्या उकडून त्यांचा गर काढून घ्यावा.
- या गरामधे चमचाभर बेसन टाकून दोन्ही घोटून एकजीव करावे.
- त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून परत एकदा हे मिश्रण घोटून घ्यावे.
- स्टीलच्या कढईत फोडणीपुरते तेल टाकून ते तापल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून ते तडतडल्यावर एक चमचा हिंग टाकावा. लगेच कढीपत्त्याची पाने चुरचुरीत करून घ्यावीत.
- हिरव्या किंवा लाल मिरच्यांचे तुकडे घालून नंतर दालचिनीचा तुकडा, मिरे, लवंग आणि मेथीदाणे टाकावे.
- त्यानंतर या फोडणीत आले-लसणाची पेस्ट घालून धणे, जिरे पूड टाकावी. थोडी हळद टाकून मसाले मिक्स करावेत.
- यानंतर लगेच घोटलेल्या कैरीचा आणि बेसनाचा घोळ त्यात टाकावा, नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार गूळ, कोथिंबीर टाकावी.
- जीभेची तलखी वाढवणारी ही कैरीची किंवा आंब्याची कढी व्यवस्थित उकळून घ्यावी.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


