माधवी जोशी माहुलकर
विदर्भातील अनेक नामांकीत खाद्यपदार्थांपैकी एक असलेला गोळाभात किंवा भरडा भात! याला भरडा भात म्हणण्याचे एक कारण असे की, यातील गोळे हे हरभऱ्याच्या डाळीचा भरडा काढून तयार करतात. हा पदार्थ करण्यासाठी खरंच कस लागतो. गोळे जर फुटले तर त्या भाताचा विचका होतो म्हणून अतिशय नजाकतीने आणि लक्षपूर्वक पद्धतीने गोळाभात तयार करावा लागतो.
साहित्य
- तांदूळ – 2 वाट्या
- हरभरा डाळ – 2 वाट्या
- हिरवी मिर्ची – 4 ते 5
- आलं – एक इंच
- कोथिंबीरीची पेस्ट – अर्धी वाटी
- जिरं पावडर – 2 चमचे
- मोहरी – 2 लहान चमचे
- गोडा मसाला – 1 चमचा
- हळद – एक चमचा
- लाल तिखट – 2 चमचे
- भरडलेले धणे – 1 चमचा
- हिंग – 1 लहान चमचा
- कढीपत्त्याची पाने – 3 ते 4
- मीठ – चवीनुसार
- तेल – आवश्यकतेनुसार
- पाणी – 4 वाट्या (किंवा तांदळाच्या दुप्पट घ्यावे.)
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी
कृती
- दोन वाट्या हरभऱ्याची डाळ दोन तास भिजत घालावी.
- दोन तासानंतर हरभऱ्याची डाळ पाण्यातून उपसून कोरड्या कपड्यावर थोडी वाळवून घ्यावी आणि नंतर त्याचा मिक्सरवर भरडा तयार करून घ्यावा. या भरड्यामधे पाणी राहता कामा नये.
- या भरड्यात लहान चमचा हळद, एक चमचा तिखट, कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीरीची पेस्ट, चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- नंतर या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यावेत.
- दुसरीकडे गॅसवर एक पसरट भांड्यात तेल टाकून ते गरम करावे.
- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची पाने टाकून फोडणी करावी.
- मग त्यात धण्याची भरड टाकावी. त्यानंतर नंतर लगेच आलं, हिरवी मिरची, कोथींबीरीची पेस्ट टाकून सर्व मिश्रण परतून घ्यावे.
- या मिश्रणात हळद, तिखट टाकून धुतलेले तांदूळ टाकावे आणि हलक्या हाताने सर्व परतून घ्यावे.
- तांदूळ किंचित भाजल्यावर त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे.
- नंतर त्यात एक लहान चमचा जिरेपूड आणि एक चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ टाकून तांदुळ शिजायला ठेवावा.
- तांदूळ अर्धा शिजत आला की, भाताच्या मधे जागा करून हरभऱ्याच्या भरडाचे तयार गोळे सोडावे आणि हा भात मंद आचेवर शिजू द्यावा.
- भरड्याचे गोळे हळूवार वाफवले जाऊन हा चवदार गोळाभात तयार होतो.
हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट
टीप
- जेवताना या गोळाभातावर चुरचुरीत लसूण आणि लाल मिरच्यांची फोडणी घ्यावी किंवा लाल मिरचीचा तडका द्यावा
- कढी किंवा फोडणीच्या ताकासोबत याचा आस्वाद घ्यावा.
- भरड्याचे गोळे तयार करताना भरडा सैलसर वाटला तर, त्याचे गोळे चाळणीवर वाफवून घेऊन मग भात शिजत आला की त्यात टाकावे.
- मिरच्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावे.
- यामध्ये अनेकदा लसूण तसेच तळलेला कांदाही वापरला जातो.
पुरवठा संख्या – चार ते सहा जणांसाठी
एकूण कालावधी – साधारणपणे अडीच तास (हरभरा डाळ भिजवायला दोन तास)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.