माधवी जोशी माहुलकर
थालिपीठ हे थालिपीठच असतं! मग ते कढईतील असो अथवा तव्यावर थापलेले असो… थालिपीठ म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा आवडता पदार्थ! भाजणीचे थालीपीठ करावे ते मराठी माणसानेच! कारण ते फक्त त्यांनाच योग्य प्रकारे जमतं. थालिपीठाचा खमंगपणा आपली जादू सदैव कायम राखून असतो. मराठी लोकांना कांद्याचे थालीपीठ तर जरा जास्तच प्रिय आहे. थालिपीठाची भाजणी नसेल मराठी गृहीणी गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि थोडे बेसन एकत्र घेऊन इन्स्टंट थालिपीठ तयार करते, परंतु भाजणीअभावी आपला थालिपीठ करण्याचा शिरस्ता मोडू देत नाही! पोळीसारखे मऊसर थालिपीठ खववय्ये मंडळींच्या घशाखाली उतरत नाही. आजचे थालिपीठ भाजणीचे नसून घरात असेलेली पीठं वापरून केले आहे.
साहित्य
- गव्हाचे पीठ – दोन वाट्या
- बेसन – अर्धी वाटी
- ज्वारीचे पीठ – अर्धी वाटी
- मोठे कांदे – 2 उभे चिरलेले
- हिरव्या मिरच्या – 4
- चिरलेली कोथिंबीर – मूठभर
- आलं-लसणाची पेस्ट – 1 चमचा
- तिखट – 3 चमचे
- हळद – 1 चमचा
- हिंग – 1 लहान चमचा
- ओवा – 1 चमचा
- तीळ – 2 चमचे
- मीठ – चवीनुसार
- दही – 2 चमचे
- (गरजेनुसार तेल किंवा तूप हे आवडीनुसार घ्यावे)
हेही वाचा – Recipe : शॅलोट्सचे चटपटीत लोणचे!
कृती
- गव्हाचे पीठ, बेसन, ज्वारीचे पीठ एकत्र करुन त्यामध्ये पातळ उभे काप करून चिरलेला कांदा टाकावा.
- नंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चिरलेली कोथिंबीर, आले-लसणाची पेस्ट, तिखट, हळद, हिंग टाकावा; नंतर ओवा हातावर भरडून टाकावा, तीळ आणि मीठ टाकून सर्व मिश्रण कांद्याला सर्व बाजूने लागेल, असे मिक्स करावे.
- नंतर दोन चमचे दही टाकून परत एकदा मिक्स करुन नंतर त्यात गरजेनुसार पाणी टाकून सर्व साहित्य घट्ट, पण थोडे सैलसर भिजवावे.
- एकीकडे तवा थोडा गरम करुन त्यावर सर्व बाजूने तेल पसरवून लावावे.
- आता या तव्यावर थालिपीठाच्या मिश्रणाचा एक मोठा गोळा ठेवून तो तवाभर सर्व बाजूने काठाने दाबत थापून घ्यावा.
- नंतर त्याला मध्यभागी एक छिद्र करून त्यामध्ये थोडेसे तेल सोडावे आणि गॅसची आच कमी-जास्त करत थालिपीठ दोन्ही बाजूने भाजून घ्यावे.
- थालिपीठ खमंग होण्यासाठी ते भाजताना तव्यावर कडेने तेल किंवा तूप सोडावे म्हणजे थालिपीठातील इतर जिन्नसांचा फ्लेव्हर त्यामध्ये उतरेल आणि चविष्ट असे थालीपीठ तयार होईल.
पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी
तयारीचा कालावधी – 15 मिनिटे
थालिपीठ भाजण्याचा कालावधी – 20 मिनिटे
एकूण कालावधी – साधारणपणे
हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!
टिप्स
- हिवाळ्यात पातीचा कांदा, हिरवा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेले थालीपीठ आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी गोड घट्टसर दही, लोणी, साजूक रवाळ तूप, लिंबाचे गोड लोणचे… झालंच तर एखादी चटणी असली म्हणजे दुसरे काही लागत नाही.
- जसे तव्यावर थालिपीठ करतो तसेच कढईतले थालिपीठ करता येते. फक्त कढई खोलगट असल्याने थालिपीठ बुडाकडून लवकर लागण्याची आणि थालिपीठ काढताना तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कढईतील थालिपीठ शक्यतो मंद आचेवर करावे, जेणेकरून ते जळणार नाही आणि कढईतून काढताना सहजपणे निघेल.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


