सुहास गोखले
श्रावण महिना सुरू झाला की, सणांची रांगच लागते. बाजारात विविध भाज्यांची रेलचेल असते, त्यामुळे अनेक वेगवेगळे पदार्थ केले जातात. एक चांगला, सर्व गुणसंपन्न पोलीस अधिकारी हाही एक प्रयत्नपूर्वक आणि वेळ घेऊन तयार झालेला पदार्थ आहे. त्यातही व्हेज आणि नॉन व्हेज अशा व्हरायटीज असू शकतात. श्रावण महिना सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिक, कर्तबगार (शाकाहारी) पोलीस अधिकारी बनवण्याची कृती पाहूया.
साहित्य : पोलीस या शब्दाचे स्पेलिंग लक्षात ठेवले की, सगळे ingredients लक्षात राहतील. Politeness (नम्रता), Obedience (आज्ञाधारक), Loyalty (ईमानदारी), Intelligence (हुशारी) किंवा Inquisitiveness (चौकसपणा), Compassion (दयाळू) आणि Enthusiasm (उत्साह) हे या रेसिपीचे मुख्य घटक आहेत.
कृती : हे सगळे पदार्थ समप्रमाणात घेऊन ते कायदे तसेच नियमावलीच्या सखोल ज्ञानात मिसळायचे आणि पोलीस प्रबोधिनीत वर्षभर marinate करायचे. त्यानंतर प्रबोधिनीच्या बाहेर काढल्यावर, वातावरणाशी समरस होण्यासाठी वर्षभर probationवर ठेवायचे, त्यानंतर पोलीस स्टेशनच्या प्रेशर कुकरमध्ये मोठ्या आचेवर शिजवायचे.
दर 7 -8 वर्षानी खांद्यावर एक-एक स्टार वाढवून गार्निश करायचे.
ही रेसिपी जशी मुरत जाईल, तशी प्रत्येक वर्षी तिची चव वाढत जाते.
टीप :
- उंच, देखणा वगैरे गुण म्हणजे केवळ गार्निशिंग्ज असतात. त्याने सजवून प्लेटिंग केलेली डिश बेचव निघण्याची अनेक उदाहरणे पोलीस दलात सापडतील.
- हा पदार्थ सर्व प्रकारच्या व्यसनांपासून मात्र दूर ठेवावा, नाहीतर तो नासायला अजिबात वेळ लागत नाही. (ही व्यसने कोणत्याही wine, wealth or woman प्रकारची असू शकतील.)
हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट
आता पोलीस ऑफिसरची नॉन व्हेज रेसिपी पाहू. पण हे लिहायला लागल्यावर वाटले की, याला नॉन व्हेजपेक्षा फसलेली रेसिपी म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण, सर्वसाधारणपणे तरुण-तरुणी 22 ते 24 वर्षे वयोगटात पोलीस दलात प्रवेश करायचे ठरवतात, तेव्हा त्यांना पोलीस दलाची माहिती कथा, कादंबऱ्या, सीरिअल्स यामधूनच मिळालेली असते. त्यामुळे प्रबोधिनीत ते जातात तेव्हाच त्यांच्या मानसिकतेला आकार दिला जातो, पण काही तरुण एक विशिष्ट उद्देश घेऊनच पोलीस दलात शिरतात. अशांसाठी POLICE शब्दाचे अर्थ वेगळे असतात उदा. Partial (पक्षपाती), Obstinate (दुराग्रही), Lethargic (आळशी), Irritable (चिडचिड करणारा), Corrupt (भ्रष्ट) आणि Erratic (अनियमित).
सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांपुढे पोलीस दलाची जी प्रस्थापित प्रतिमा आहे, ती अशा लोकांमुळेच. मी आधी म्हणालो होतो तसे, ते काही उद्देश घेऊन येतात… जसे पैसा, पॉवर, प्रसिद्धी.
हे तिन्ही उद्देश एकत्रितपणे साध्य होण्याचे एक साधन म्हणजे चांगल्या उद्देशाने सुरू झालेली पण नंतर अनिष्ट वळण घेतलेली एन्काऊंटर्स.
(लेखक निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)
हेही वाचा – …आणि पोलीस दलात जाण्याचा निश्चय केला!