स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स –
- शेंगदाण्याचे बारीक कूट, खोबरे किसून, भाजून त्याचे कूट, भाजलेल्या तिळाचे कूट व पंढरपुरी डाळ्याचे कूट समप्रमाणात एकत्र करून मीठ घालून (खराब होऊ नये म्हणून) ठेवावे आणि कुठल्याही भाज्यांना दाटपणा आणण्यासाठी पाणी घालून सारखे करून वापरावे. दाणे-खोबऱ्याची बचत होऊन पदार्थ चवदार लागतो. त्यातच आयत्या वेळी तिखट आणि जिऱ्याची पूड घालून दही अथवा तेलाबरोबर चटणी म्हणूनही वापरता येते.
- बाजारातून लसूण आणल्यावर त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून मिक्सरमध्ये त्याचा लगदा करावा आणि नंतर पाटावर थापून उन्हात वाळवाव्यात. पूर्णपणे वाळल्यावर पुन्हा मिक्सरमध्ये त्याची पावडर करावी. हा पावडर केलेला लसूण केव्हाही वापरायला सोयीचा जातो आणि खूप दिवस टिकतो. त्यामुळे आपल्या वेळेची बचत होते आणि पदार्थही चवदार होतात. याचप्रमाणे कांद्याचीही पावडर करून ठेवता येते.
हेही वाचा – Kitchen Tips : कायम तयार चिंचेचा कोळ, नारळाचे वाटण अन् पौष्टिक पोळ्या…
- कांदा बारीक चिरून कडक उन्हात वाळवावा. चांगला वाळल्यावर थोड्या तेलात मंद आचेवर गुलाबी रंगावर परतून घेणे. नंतर मिक्सरमधून बारीक पूड करून घेणे. ही पूड आयत्या वेळी भाजीला वापरता येते. एखादी भाजी फार तिखट झाल्यास ही पूड चमचाभर टाकल्यास तिखटपणा कमी होतो. शिवाय, ही पूड भरपूर दिवस टिकते.
- आले असे टिकविता येते – आले स्वच्छ धुऊन त्याची साले काढून जरा जाडसरच गोल चकत्या करा. त्या मिठात घालून 15 ते 20 मिनिटे पंख्याखाली ठेवा आणि बाटलीत भरून ठेवा. या आल्याच्या चकत्या वाटेल त्या वेळेस उपयोगात आणता येतात.
- खाराच्या मिरच्या चटकन खाता येण्यासाठी मिरच्या धुऊन कोरड्या करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्यात सर्व मसाला टाकून लिंबू पिळून बाटलीत भरून ठेवा. वाढताना त्यावर फोडणी घाला. मिरची अजिबात वाया जात नाही. एखादे वेळी ब्रेडवरसुद्धा लावण्यासाठी (पसरण्यासाठी) उपयोग होईल.
हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही
- भाजीसाठी आले, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीलिंब रोज लागतेच. हे वेगवेगळ्या ठिकाणांहून घेऊन ते निवडावे लागते आणि यात खूप वेळ जातो. यासाठी सर्व एकत्र करून ते वाटावे. त्यात तेल, मीठ घालून बाटलीत भरून ठेवावे. फ्रीजशिवायही आठ दिवस ते सहज टिकेल. आयत्या वेळेस लिंबू पिळून किंवा दही घालून पातळ चटणीसाठीही त्याचा उपयोग होईल.


