मानसी देशपांडे
“पार्टनर…” नावातच सारं काही सामावलेलं आहे. सोळा संस्कारांपैकी एक संस्कार असलेल्या विवाहामुळे दोन कुटुंबं एकत्र येतात. आयुष्याचे सार समजावणाऱ्या व.पु. काळे यांनी पार्टनर किंवा जोडीदार या विषयावर खूप प्रेरक असे लिखाण केले आहे. माणूस म्हटलं की चूक ही आलीच, पण तीच चूक चारचौघात न सांगता, तिथे त्या चुकीचा ऊहापोह न करता जी एकांतात समजावून सांगणारी व्यक्ती म्हणजे पार्टनर… मुळात प्रेमविवाह असो किंवा ठरवून झालेला विवाह असो, त्यामध्ये प्रेम असणे महत्त्वाचं नाही का!! कारण, व.पुं.च्या मते “प्रेम केल्यानेच प्रेम समजतं.” सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याजवळ मनाची श्रीमंती असते तो श्रेष्ठ. कारण, विवाह ही एक मोहरून टाकणारी अनुभूती असते. त्यामुळे प्रत्येक मुलाची किंवा मुलीची आपल्या जोडीदाराबाबतची मते वेगळी असतात. या संस्कारावर व.पु. म्हणतात, “आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की, धकाधकीची वाटचाल सुकर वाटते.”
एकाहून एक सरस असे नात्यावर भाष्य करणारे विचार व.पुं.नी मांडले आहेत. प्रेम करायचे म्हणजे कमीपणा घेण्याची वृत्ती देखील ठेवली पाहिजे. व.पुं.नी संसाराची व्याख्या करताना म्हटले आहे, “एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा एकमेकांच्या वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथे जोडीदार कमी पडेल, तिथे आपण उभे राहायचे असते…” म्हणूनच राहून राहून मनात येते आज व.पु. हवे होते.
हेही वाचा – सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला…
प्रेम, नोकरी किंवा विवाह यासारख्या अनेक विषयांवरचा व.पुं.चा अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे. व.पुं.चे विचार आत्मसात करणं म्हणजे काट्यावरून चालत असताना पायाखाली गुलाबाच्या पाकळ्या येणं… म्हणून तर म्हणतात, एक चांगला जोडीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण निघून जातात.
असो, व.पु. सर आपल्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे, पण शब्दांची गुंफणच कमी पडते. कारण, अथांग समुद्रासारखे आपले विचार आहेत. पण एक मात्र नक्की, भावना व्यक्त करायला शब्द कमी पडतात हेच खरं…
हेही वाचा – कवी ग्रेस अन् “भय इथले संपत नाही…” कविता