स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटा वेफर्स, ऑम्लेट, ब्रेडरोल, दहिवडे बनविण्याच्या टिप्स पाहुयात.
- बटाट्याचे वेफर्स करताना ते बटाट्याच्या सालांसकट करावेत. त्यामुळे वेफर्स अधिक कुरकुरीत होतात आणि सत्त्वही कायम राहते.
- अळूवडी करताना पानांना पुसटसे तेल लावले तर वड्या कुरकुरीत होतात.
- नेहमीच्या कुकरमध्ये (शिटीशिवाय) इडली करताना चांगली वाफ आल्यावर गॅस बारीक करून झाकण थोडा वेळ काढून ठेवावे. यामुळे इडली ओलसर होते. चिकट न राहता इडलीला चांगली छिद्रे पडतात.
- स्पाँज केक बनवताना अंड्यांच्या पांढऱ्या बलकात जाड साखर घातल्यास स्पाँज केक अधिक हलका होतो. 4 अंडी, 90 ग्रॅम जाड साखर, 60 ग्रॅम मैदा हे प्रमाण आहे.
- रव्याचा डोसा करताना रवा फडक्यात बांधून वाफळावा आणि नंतर वाटलेल्या उडीदडाळीत मिसळावा. त्याने डोसेसुद्धा जास्त चांगले होतात आणि तांदूळ वाटण्याची मेहनत वाचते.
हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनवताय, मग हे वाचा!
- चकलीच्या भाजणीत एक किलो भाजणीचे साहित्य असल्यास एक मूठ गच्च भरून तुरीची डाळ भाजून घालावी. चकलीला सुंदर नळी पडून अतिशय खुसखुशीत होते.
- ऑम्लेट अथवा हाफ फ्राय करताना आपण आधी तव्यावर तेल घालतो. त्यातच थोडे मीठ भुरभुरावे आणि ते तव्यावर पसरावे. अंडे तव्याला चिकटत नाही.
- ब्रेड रोल करताना ब्रेडचे स्लाइस कडा काढल्यावर पाण्याऐवजी दुधाचा वापर करा. रोल तेलकट होत नाही. तळायला तेल कमी लागते.
हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे…
- सुरळीच्या वड्या हमखास चांगल्या होण्याचा फॉर्म्युला – एक वाटी डाळीच्या पिठाला नेहमीपेक्षा थोडे कमी ताक घालून चांगले ढवळा. नंतर गॅसवर घाटत बसण्याऐवजी ते सर्व मसाल्यासहितचे मिश्रण सरळ डाळ-भाताबरोबर कुकरमध्ये ठेवा. कुकर झाल्यावर शिजलेले मिश्रण कालथ्याने ताटात भरभर पसरून लावा. (प्लास्टिकच्या पेपरवर पसरले किंवा किचन प्लॅटफॉर्मवर पसरले तरी चालेल.) रेघा पाडून सुरळ्या करा.
- एक कप गार दुधात एक सपाट चमचा कॉर्नफ्लोअर एकजीव करून घ्यावे. सतत ढवळत हे दूध उकळेपर्यंत तापवावे. हे मिश्रण गार झाल्यावर दहीवड्यासाठी करावयाच्या दह्यात घालून खूप घुसळावे. दह्याला अजिबात पाणी सुटत नाही.


