Monday, April 28, 2025
HomeअवांतरWhatsApp वर दररोज रंगतोय अंताक्षरीचा खेळ

WhatsApp वर दररोज रंगतोय अंताक्षरीचा खेळ

मोहिनी घारपुरे देशमुख

दररोजची तीच सकाळ, तोच तो दिनक्रम आणि जगाच्या रहाटगाडग्यात अडकलेले आपण सगळेच पोटार्थी… पण असे असले तरीही हीच सकाळ काही जणांसाठी गेली सहा वर्षं अतिशय आनंदाची ठरतेय. याचं कारण आहे, WhatsAppच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला एक आगळावेगळा उपक्रम.

मी सुरू केलेला ‘मोहिनी अंताक्षरी’ हा WhatsApp ग्रुप गेली सहा वर्ष सक्रिय आहे. स्वतःची गाण्याची आवड अस्वस्थ करत होती. गायनाच्या क्षेत्रात काही निराळं करावं या हेतूने ही कल्पना सुचली. सुरुवातीला काही ओळखीच्या गानप्रेमींना समुहात सहभागी केले आणि माझ्या या ग्रुपची ‘मोहिनी अंताक्षरी’ नावाने सुरुवात केली. आजवर अनेक सदस्य ग्रुपमध्ये आनंदाने सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सदस्याच्या परिचयातूनही काही सदस्यांना वेळोवेळी ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात येते. सध्या ग्रुपमध्ये पंचवीस सदस्य असून त्यापैकी अनेक जण सक्रिय आहेत.

अंताक्षरीच्या वेगवेगळ्या थीमबाबत मी सदस्यांना दररोज सकाळी नवनवीन कल्पना देते. त्यानुसार सकाळी थीम दिल्यापासून ते रात्री अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत ग्रुपमधील प्रत्येक सदस्य आपापल्या वेळेनुसार ग्रुपवर सहभागी होतो. केवळ गाण्यातून मिळणारा निखळ आनंद हेच यामागील उद्दीष्ट असल्याने या ग्रुपवर अन्य कोणतीही चर्चा, वादविवाद करण्यास मनाईच करण्यात आलेली आहे. ग्रुपचे सदस्य अगदी चोखपणे सुरुवातीलाच घालून दिलेल्या नियम पाळून अंताक्षरीचा दिवसभर आस्वाद घेत असतात.

निरनिराळ्या कल्पक थीम

या ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज देण्यात येणाऱ्या थीम. यामध्ये कधीकधी सदस्यही काही थीम्स सुचवतात. अंताक्षरीच्या सगळ्या लोकप्रिय थीमसह आजवर तब्बल पन्नासहून अधिक अन्य थीम्स ग्रुपवर घेण्यात आलेल्या आहेत. जसं की अंतरा-मुखडा, सवाल-जवाब, धून फेरी, शब्दच्छल फेरी, हिंदी-मराठी गाण्यांची अंताक्षरी यासह दररोज काहीतरी कल्पक थीम सदस्यांना देण्याचा माझा प्रयत्न असतो.

गेटटुगेदरची धमाल

केवळ व्हर्च्युअलच न राहता आजवर दोनदा अंताक्षरीच्या ग्रुपच्या सदस्यांचे इन्फॉर्मल छोटेखानी गेटटुगेदर देखील आयोजित करण्यात आले होते. नाशिक आणि पुणे येथे अत्यंत अल्प खर्चात, सदस्यांनी काँट्रिब्युशन काढून हे गेटटुगेदर केले. यावेळीही निराळ्या थीम्सवर गाणी म्हणून तसेच सोलो परफॉर्मन्स देत सदस्यांनी एकमेकांना गाण्यातून आनंद दिला.

वाढदिवसालाही गाण्यातून शुभेच्छा

ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस असेल तर त्या सदस्यालाही इतर सदस्य गाणी म्हणूनच शुभेच्छा देतात. ‘बार बार दिन ये आये…’ सारखं गाणं असेल किंवा सदस्याच्या आवडीचं गाणं म्हणून सकाळीच सारी मंडळी त्या सदस्याला शुभेच्छा देतात.

ऑन द स्पॉट स्पर्धा

सुरुवातीच्या वर्षी सदस्यांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादामुळे ग्रुपवर ऑन द स्पॉट स्पर्धाही घेतल्या होत्या. त्याकरीता कधी स्वखर्चातून वा कधी सदस्यांनी दिलेल्या स्पॉन्सरशिपमधून या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर पारितोषिक स्वरूपात विजेत्या स्पर्धकांना छोटी पेटीची प्रतिकृती, छोटी तबल्याची प्रतिकृती देऊन गौरविण्यात आले होते.

युट्यूबवरून वेळोवेळी व्हिडीओचे प्रसारण

कालसुसंगत अशा थीम्स घेऊन आपल्या ग्रुपमधील सदस्यांचे यूट्यूब व्हिडीओ देखील बनवले आहेत. जसं की, नवरात्रीनिमित्त जसे बाहेर नवरंग परिधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो, त्याप्रमाणे नवरंगांचा नामोल्लेख असलेली गाणी सदस्यांनी म्हटलेला व्हिडीओ, रामजन्मोत्सवानिमित्त सदस्यांनी म्हटलेली रामाची गाणी आणि भजनांचा व्हिडीओ तयार करून तो यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ आणि उत्साही सदस्यांचा सन्मान

केवळ छंद आणि आवड म्हणून सुरू करण्यात आलेल्या या ग्रुपमध्ये अनेक उत्साही गाणारी तसेच ज्येष्ठ सदस्य मंडळीही सहभागी आहेत. अशांपैकी काही जणांचा, जे ग्रुपवर सतत सक्रिय असतात आणि आपल्या गाण्यांनी तसेच सहभागाने इतरांना आनंद देतात, अशा सदस्यांचा ग्रुपतर्फे घरी जाऊन सन्मान केला जातो. त्यावेळी अशा सदस्यांना एखाद-दोन सुंदरशी फुलझाडांची रोपं भेट देण्यात येतात.

ग्रुपमधील सक्रिय सदस्य

राधिका गोडबोले, रेखा केतकर, सुनंदा रहाणे, एस. आर. करंदीकर, उदय सुभेदार, सीमा घारपुरे, अनुजा भंडारे, संतोष पाठक, प्रज्ञा काळे, शिरीन कुलकर्णी, रोहिणी गोरे, दीप्ती जोशी, सविता सरपोद्दार, राहुल मेश्राम, स्वतेजा अडावतकर, श्रीरंग देवधर, अंजली शेवडे आणि अन्य अनेक आजी माजी मान्यवर सदस्यांच्या सहभागाने ग्रुप रंगतो आहे.

निखळ आनंद प्रत्येकालाच मिळायला हवा

हल्ली गाण्यासारख्या निखळ आनंद देणाऱ्या कलेलाही केवळ स्पर्धेच्याच दृष्टीकोनातून पाहिले जाऊ लागले आहे, जे योग्य नाही. गाणं प्रत्येकाचं असतं, सगळे जरी गायक होऊ शकले नाही तरीही गाणं गुणगुणून मिळणारा आनंद मात्र प्रत्येकालाच मिळायला हवा. आपल्या जीवनातील गाणं आपल्याला हवं असेल तर आपल्या गळ्यातला प्रामाणिक सूर आपण प्रत्येकानेच जपला पाहिजे आणि आपलं स्वतःचं गाणं कोणाच्याही दबावाशिवाय आपण कायम म्हणत राहीलं पाहिजे तरच आपलं जीवन सुखी समाधानी होईल.

Loading spinner
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!