डॉ. किशोर महाबळ
अनेक शाळांमध्ये राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) पथक असते. ज्या शाळांमध्ये असे पथक नसेल त्या शाळांनी असे पथक शाळेत असावे, यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. या पथकातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासास पोषक अशा अनेक उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. पथकातील विद्यार्थ्यांना दर रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर, विशिष्ट क्रीडांगणावर व्यवस्थितरित्या परिधान केलेला विशिष्ट गणवेष घालून कवायतीसाठी पोहोचावे लागते. अत्यंत कडक शिस्तीत कवायत आणि पथसंचलन तसेच, छात्रसेना प्रमुखाच्या सर्व आदेशांचे विनातक्रार, काटेकोरपणे पालन करावे लागते. पाऊस, थंडी किंवा उष्ण हवामान असले तरीही संपूर्ण शैक्षणिक वर्षात दर रविवारी कवायतीसाठी जावेच लागते.
याशिवाय वर्षातून एकदा आयोजित केल्या जाणाऱ्या दहा दिवसांच्या हिवाळी शिबिरात भाग घ्यावा लागतो. शिबिरात पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सतत कार्यरत राहावे लागते आणि सर्व उपक्रमांत भाग घ्यावाच लागतो. सर्व बाबतीत स्वावलंबी असावे लागते. आपल्या गटातील इतर शिबिरार्थ्यांबरोबर तंबूत राहावे लागते. गटावर सोपविलेल्या सर्व जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात लागतात. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावेच लागते. शिस्त पालनात कोणतीही तडजोड चालत नाही. मिळेल ते अन्न, मिळेल तशी राहण्याची सोय, तक्रार न करता स्वीकारावी लागते. कितीही बिकट परिस्थिती असली तरीही तिच्याशी जुळवून घ्यावेच लागते. या शिबिरांत अनेक स्पर्धा होतात. अनेक गोष्टी शिकविल्या जातात. शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक क्षमता वाढविण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
दर रविवारची कवायत आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरांत सहभागी होण्यामुळे व्यक्तिमत्वात असंख्य सकारात्मक बदल होतात. आत्मविश्वास वाढतो. शिस्त लागते, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची सवय लागते. कामाचे तसेच वेळेचे उत्तम नियोजन कसे करावे हे शिकता येते. स्वावलंबनाची सवय लागते. आज्ञाधारकपणा अंगी बाणतो. नियमांचे काटेकोरपणे आणि व्यवस्थितरित्या पालन करण्याची सवय लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांबरोबर एकदिलाने, एकमताने कसे वागावे, कसे राहावे, याचे उत्तम शिक्षण मिळते. याशिवाय, धाडस, उत्साह, कृतिशीलता, जिद्द, चिकाटी, कणखरपणा असे अनेक गुण विकसित होतात. हे सर्व गुण चांगले जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. हे गुण खरेतर प्रत्येक विद्यार्थ्यात विकसित झाले पाहिजेत. त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेत दाखल होण्याची सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे. पण पुरेशा निधी अभावी प्रत्येक शाळेतील काही निवडक विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकात प्रवेश दिला जातो.
व्यक्तिमत्व विकासासाठी शिबिरात सहभागी होणे हे उपयुक्त ठरते हे लक्षात घेता शाळेतील सर्व विद्यार्थ्याना शिबिरात भाग घेण्याचा अनुभव मिळाला पाहिजे. शिबिराच्या आयोजनासाठी बराच खर्च होतो, जेवणाची सोय करावी लागते. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मनुष्यबळ लागते, कार्यक्रमांसाठी सभागृह तसेच मोकळी जागा लागते आणि म्हणूनच शिबिर घेणे सहज शक्य नाही, असे वाटणे साहजिकच आहे. पण शिबिरांची उपयुक्तता लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांसाठी ती कशी आयोजित करता येतील याचा विचार करायला हवा.
शिबिराचा कालावधी हा एक आठवड्याचा असलाच पाहिजे, हे गरजेचे नाही आणि शिबिर मुक्कामाचे असण्याचीही आवश्यकता नाही. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असे एक दिवसाचे शिबिर आयोजित करता यऊ शकते. विद्यार्थ्याना घरून डबा आणायला सांगितला तर जेवणाचा खर्चही वाचविता येऊ शकतो. नाश्ता, सरबत, चहा देण्यासाठी थोडी वर्गणी घेतली तरी ती पुरेशी ठरते. चहा आणि नाश्त्यासाठी आर्थिक मदत करणारे किंवा वस्तूरुपात मदत करणारेही सहज मिळू शकतात.
हेही वाचा – Education : शिकण्याची नेमकी गरज काय?
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वतंत्र शिबिर घेण्यासाठी शाळेतीलच एक खोली, सभागृह पुरेसे ठरू शकते. शिबिरात खेळ, कथाकथन, गटचर्चा, गटागटात स्पर्धा असे असंख्य छोटे छोटे उपक्रम आयोजित करता येऊ शकतात. मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांना समूह जीवनाचा व गटातील इतरांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळावा हा असल्याने त्या दृष्टिकोनातून सर्व उपक्रम आयोजित करता येतील. अशी एक एक दिवसाची शिबिरे शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करता येऊ शकतात.
हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!
विद्यार्थ्यांचे स्वतंत्र शिबिर घेण्यासाठी शाळेतीलच एक खोली, सभागृह पुरेसे ठरू शकते. शक्य असल्यास 10 दिवसांची निवासी किंवा अनिवासी, पण पूर्ण दिवस एवढ्या कालावधीची शिबिरे जरूर आयोजित केली गेली पाहिजेत. अशी शिबिरे घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थाचीही मदत घेता येऊ शकते. शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याला एकदा तरी शिबिरात सहभागी होण्याचा अनुभव मिळणे, हे त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. म्हणूनच अशी शिबिरे आवर्जून आयोजित करण्याचा प्रयत्न व्हायला हवा.


