भाग – 5
ओटीभरणासाठी पारूबाईंना सुनेच्या माहेराहून पदार्थांचे दहा- बारा करंडे हवे होते… सकाळी उठल्यापासून घरात तारांबळ उडाली होती. उमाच्या तिन्ही नणंदा आदल्या दिवशीच आल्या होत्या. तिच्या नवऱ्याच्या दोन्ही आत्या आणि त्यांच्या सुना-लेकी, सासूच्या दोघी सख्ख्या बहिणी, चार चुलत बहिणी, सासूची आई एकेक करून डेरेदाखल झाल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती स्वयंपाकघरातच होती. येणाऱ्या पाहुण्यांचे हवे- नको पाहात होती.
संध्याकाळी उमाची काकी आणि भाऊ डोहाळे जेवण घेऊन आले. उमाच्या मनात धास्ती होती, आता आत्याबाई काय तमाशा करतात याची! काकी स्वयंपाकघरात आली, उमाला तिने जवळ घेऊन विचारले, “कशी हायस बाळा. तब्येत बरी हाय ना? काय त्रास व्हत नाय ना?”
उमाने तिच्या मिठीत शिरत “नाही” असे सांगितले. माहेरच्या माणसाची जवळीक तिला हवीहवीशी वाटली. काकीपासून उठू नये, असे तिला वाटत होते. थोडावेळ ती तिथेच काकीला बिलगून बसली. तिच्या प्रेमळ स्पर्शाने ती सुखावली. खरंतर, तिला या क्षणाला आईची खूप आठवण येत होती. आईच्या आठवणीने तिचे डोळे भरून येत होते. खरंच आईची आठवण येतेय म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येतेय, की सासुबाई बुत्तीचे करंडे कमी आणले म्हणून रागावतील यांच्या धास्तीने रडू येतेय हे तिला कळेना. काकीच्या मिठीत ती अशी विसावलेली असतानाच पारुबाई आत आली.
हेही वाचा – उमाला आठवले लग्नानंतरचे दिवस…
“व्हंय गं, त्वा इथंच बसलीयास, पावन्यास्नी च्या पानी कोण बगनार?” हे पारुबाईचे कडक भाषेतील शब्द ऐकून ती चटकन उठली आणि चुलीकडे सरकली. चुलीवर पातेल्यात तिनं चहा ठेवला आणि पाण्याचा तांब्या भरून बाहेर बसलेल्या बंधूराजासाठी घेऊन गेली. तिथं कुणीही नव्हते तरीही तिथे जास्त वेळ न थांबता ती भावाकडे नुसताच नजरेचा कटाक्ष टाकत ती आत निघून आली.
तिने काकीला चहा दिला आणि भावासाठी भरलेला चहा घेऊन ती पुन्हा बाहेर आली. भावाला डोळे भरून पाहिले. तो ही आपल्या बहिणीकडे तसाच प्रेमाने पाहत होता.
“कशी आहेस?” त्याने प्रेमाने विचारले.
“बरी आहे की… आई कशी हाय?” तिने विचारले.
“बरी आहे ती पण. दिवस मोजत बसलीय तुझ्या येण्याचे. बाळंतपणाला येणार आहेस ना!” तिने होकारार्थी मान हलवली. घर पाहुण्यांनी भरले होते, त्यामुळे तिथे जास्त वेळ न थांबता ती परत आत निघून गेली.
आपल्या माहेराहून किती करंडे आलेत हे तिला माहीत नव्हते. पारूबाईंची भावकीतील बायकांना दुरड्या सोडायला बोलवायची गडबड चालली होती. आत्याबाईंचा अपेक्षाभंग झाला तर, सगळ्या बायकांसमोर त्या बडबड करायला कमी करणार नाहीत, अशी भीती उमाला वाटली आणि तिच्या पायांना सूक्ष्म थरथर होऊ लागली. तिचा चेहरा कसनुसा झाला. मानसिक ताणामुळे अचानक तिला चक्कर आली. तिच्या नणंदेने तिला पटकन धरले म्हणून बरे झाले, ती पडता पडता वाचली…
काकीने आणि दोघींनी मिळून तिला खाली बसवले. पाण्याचा ग्लास हातात दिला. तोपर्यंत घरात जमलेल्या सगळ्या पाहुण्या बायका तिच्याभोवती ‘काय झालं? काय झालं?’ करत कालवा करू लागल्या. बाहेर बसलेल्या पारूबाईने स्वयंपाकघराकडे धाव घेतली.
हेही वाचा – अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…
“ए बायांनो, सरा बाजूला. जरा वारं लागू द्या की. काय चक्कर आली व्हय?” असे म्हणत आपल्या पदराने सुनेला वारा घालू लागली.
बाजूला व्हा असे सांगूनही एकसुद्धा बाई बाजूला झाली नाही, उलट खाली वाकून तिच्याकडे निरखून पाहू लागल्या.
“आक्के, तुजी सून लयच नाजूक हाय. चार मानसं वाढली की तिला कामानं चक्कर आली. माजी सून बाळातीण हुस्तवर घरातलं आन् रानातलं समदं काम वढीत हुती. अशी चार भाकरी थापून तिला चक्कर आली न्हाई कंदी…” हे ऐकून आता आत्याबाई त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू करतायत का काय, असे वाटून उमाच्या काळजात अजूनच कालवाकालव व्हायला लागली. तिचा चेहरा कसनुसा झाला…
क्रमशः
काय होते पुढे? सासुबाई तिच्यावर रागावतात का? माहेराला तोंडसुख घेतात का? हे पाहूया पुढील भागात…


