स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –
- शिळ्या पुऱ्या पुन्हा तळल्यास ताज्या खुसखुशीत होतील आणि त्यांचा भेळ-पुरीसाठी चांगला उपयोग होईल किंवा साखरेच्या पाकात बुडविल्यास चांगल्या लागतात.
- दहीवडे अथवा मेदूवडे करताना वडे तळण्याऐवजी अप्पेपात्रात तेल सोडून केले, तर तेल कमी लागते आणि तेलकट होत नाहीत; पण पीठ किंचित सरसरीत करून वडे दोन्ही बाजूंनी चुरचुरीत करून घ्यावेत. अगदी तळल्यासारखे हलके आणि खमंग लागतात.
- चकली, कडबोळी, शंकरपाळे किंवा तत्सम पदार्थ मऊ अथवा तेलकट होतात, असे लक्षात येताच स्वच्छ केलेल्या मुरमुऱ्यांत ते पदार्थ बुडवून ठेवा. दोन दिवसांतच ते चांगले कुरकुरीत कोरडे होतील. शिवाय त्या मुरमुऱ्यांचा चिवडा पण करता येईल.
हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळा, खरबूज आणि कलिंगड यांच्या बियांचा वापर
- रगडा पॅटिस करतेवेळी वाटाणे आणि सोयाबीन यांचे प्रमाण 2:1 असे घ्यावे आणि रात्री नेहमीप्रमाणे भिजत घालावे. रगडा आपल्याला आवडेल तसा करावा. तसेच वाटाणा उसळ आणि वाटली डाळ करताना असेच प्रमाण घ्यावे. पदार्थ पौष्टिक तर होतोच, पण खाणाऱ्यालाही समजत नाही की, यात सोयाबीन आहे.
- सँडविचसाठी चटणी करताना, ढोबळी मिरची बिया काढून वापरावी. चव तशीच राहून दाहकता कमी होते. शिवाय चटणी खूप होते.
- तांदळाच्या कडबोळ्यात चवीसाठी लोणी घालतात, त्यामुळे ती खुसखुशीत आणि रुचकर लागतात.
- कांदापोहे करतेवेळी फोडणीत कांदा टाकताच त्यावर लिंबू पिळावे आणि हळद टाकावी. म्हणजे रंग पिवळा आणि कांदा चकचकीत दिसतो.
- केकचे मिश्रण घोटताना कमी वेळ लागावा म्हणून घोटण्यास घेतलेले भांडे थोडे गरम करा आणि मग वापरा. मिश्रण झटकन फेसाळले जाऊन हलकेही होईल.
हेही वाचा – Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी…
- आइस्क्रीम किंवा केक करताना ॲल्युमिनियमचे भांडे वापरल्यास दोन्ही उत्तम होतात. दोन्ही पदार्थ भांड्याला चिकटत नाहीत.
- इडली उरते तेव्हा तिचे लांब बोटाप्रमाणे तुकडे करून निर्लेपच्या तव्यावर तूप टाकून परतून कडक करावेत. ताजे दही, साखर, मीठ घालून घुसळावे. प्रथम प्लेटमध्ये इडलीचे तुकडे टाकावेत. त्यावर दही, चाट मसाला, खोबरे, कोथिंबीर, चिंचेचे पाणी टाकावे. कमी वेळात अत्यंत सुंदर आणि नवी टेस्टी डिश तयार होते.


