स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये फ्रोजन मटार, टोमॅटोचे सार, वांग्याचे काप बनविण्याच्या टिप्स पाहूयात.
- बाजारातून आणलेली कवठे काही दिवस तशीच ठेवली आणि नंतर फोडली तर ती अनेक वेळा खराब झालेली दिसतात. आतील गराला बुरशी आलेली असते. म्हणून पिकलेली कवठे आणल्याबरोबर ती फोडून, गर काढून फ्रीजमध्ये ठेवावा. म्हणजे कवठे वाया जात नाहीत.
- फ्रोजन मटार घरी तयार करा – मटार स्वस्त असतात, तेव्हा शेंगा सोलून ताजे, हिरवेगार दाणे काढा, निर्लेपच्या मोठ्या पॅनमध्ये किंवा बिनकानाच्या कढईत पाणी आणि दाणे उकळायला ठेवा. एक उकळी आली की, गॅस बंद करा आणि एक चिमूटभर खाण्याचा सोडा पाण्यात टाका. झाकण ठेवा. पाच मिनिटांनी दाणे चाळणीवर ओता. पाणी निथळल्यावर सुती साडीवर पसरून ठेवा. 15 मिनिटांनी प्लास्टिकच्या पिशवीत घालून ते सीलबंद करा. पिशवी फ्रीजमध्ये ठेवा. चार-चार महिने मटार जसाच्या तसा राहतो.
हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स
- टोमॅटोचे सार करताना त्यात कांदा, लसूण बरोबर चमचाभर मुगाची डाळही शिजवावी. सार दाट होते. त्याला मैदा किंवा कॉर्नफ्लोअर लावावे लागत नाही, मुख्य म्हणजे या साराचे आहारमूल्य वाढते.
- कोणत्याही प्रकारच्या जाड शेवया घ्याव्यात. नंतर ज्या उपलब्ध भाज्या असतील त्या घेऊन कांदा-टोमॅटो घालून सरसरीत रस्सा भाजी करावी आणि त्यात शेवया चांगल्या शिजू द्याव्यात. वरून कोथिंबीर घालावी. अगदी मोकळं केल्यास (कमी पाणी घालून) शेवयांचा उपमा तयार होईल. नाही तर ब्रेडबरोबर खाण्यास रस्सा भाजी तयार होईल. या ‘वन-मील-डीश’मुळे मुलं ज्या भाज्या अजिबात खात नाहीत त्या त्यांच्या आहारात आपोआप येतात.
- टिक्की, बटाटेवडा, पॅटिस, कटलेट करताना बटाट्याचा मॅश वापरतो, तेव्हा लगदा तयार करताना त्यात थोडं दूध, लोणी किंवा साय टाकावी. मॅशला छान सुगंध येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना…
- बाजारातून आणलेले आले, सर्व काही वापरले जात नाही. ते वाळून जाते आणि कडक होते. अशा वेळी ते लहानग्या कुंडीत ओल्या मातीत खुपसून ठेवावे. आयत्या वेळी कुंडीतून काढून स्वच्छ धुऊन पदार्थात घालता येते.
- वांग्याचे काप करावयाचे असल्यास (भजी नव्हे). थोड्या पाण्यात चण्याच्या डाळीएवढा सोडा टाकून, त्यात वांग्याचे काप दहा मिनिटे ठेवावेत व नंतर पिठात घोळवून, तव्यावर तेल सोडून लावावेत. काप लवकर तयार होतात. तेलाची आणि इंधनाची बचत होते तसेच काप चविष्ट लागतात.


