प्रणाली वैद्य
सर्व थोरा-मोठ्यांचं बोलणं मुलांनी नीट ऐकून घेतलं. रात्रीचं जेवण झाल्यावर उद्याची भटकंती कशी असेल, यावर चर्चा करण्यासाठी सर्वजण एकत्र आले… बाहेर बोचरा गारवा होता, त्यामुळे सगळे जवळजवळ रिंगण करून बसले… शौनकने पुढे होऊन उद्याचं आपलं वेळापत्रक कसं राहील, याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली…
“आपण गावाकडे आहोत… निसर्गाच्या कुशीत… त्यामुळे प्रत्येकाने आपला आळस बाजूला सारत उद्या पहाटे 5 वाजता उठून जितकं लवकरात लवकर आवरून ट्रेककरिता सज्ज व्हावं… माझ्या मते 6.30 वाजता आपण इथून निघायला काहीच हरकत नाही… प्रत्येकाने आपलं इतर सामान इथंच ठेऊन फक्त खाण्याचे जिन्नस, पाणी आणि अगदी आवश्यक अशाच वस्तू सोबत घ्यायच्या आहेत.
जितकं लवकर निघू तितक्या लवकर आपण आपल्या इच्छित स्थळी पोहचू आणि अभ्यास पूर्ण माहिती घेत परतीच्याव प्रवासाला लागू… इथं आपल्याला सायंकाळी 5 ते 6च्या आत येणं जरुरीचं आहे. कोणीही ग्रुपपासून विलग होऊ नये. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वागावं… परतीच्या प्रवासात कुठेही विनाकारण वेळ घालवायचा नाही… जे काही पाहू, अभ्यासू ते इथे येऊन सर्वांसमोर मांडू…”
“आपल्याला या ठिकाणाबाबत काहीच माहिती नाही… उद्या कदाचित चांगले-वाईट दोन्ही अनुभव आपल्या गाठीशी येऊ शकतात. तुमच्याबरोबर मीही इथे प्रथमच येतोय, त्यामुळे आपल्या ग्रुपच्या प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकावर असणार आहे… काहीही झालं तरी ग्रुपपासून वेगळं होऊ नका, जेणेकरून स्वतःवर आणि इतरांवर त्याचा परिणाम होईल…”
शौनकच्या बोलण्यावर सगळ्यांनी हुंकार भरला… आणि प्रत्येकाने त्याला आश्वस्त केलं…. लवकर उठायचं म्हणून सर्व लवकरच झोपी गेले… मनात उत्सुकता ठेवून! पण इथं असं दुसरं कोणी होतं, त्याचं मन अस्वस्थ होतं… उद्याच्या अज्ञात रहस्याकडे ओढलं जात होतं… अस काही होतं जे अचेतन मन सुचवत होतं, पण चेतन मनाला त्या सूचना कळतच नव्हत्या आणि म्हणूनच ते अस्वस्थ होतं… अन्य एक व्यक्ती या रहस्यापाठी असलेल्या गुप्तधनाची लालसा ठेऊन होती…!
हेही वाचा – शोध अज्ञात रहस्याचा…
या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या अर्थी आपापल्या शोधावर निघाल्या होत्या, पण दोन्हीचे मार्ग आणि इच्छा एकमेकांविरुद्ध होत्या… त्या विचारातच दोघांनाही झोपेनं आपल्या कवेत घेतलं…
घड्याळाचे अलार्म सेट होते. अगदी बरोबर 5 वाजता त्यानी आपलं अस्तित्व दाखवून दिलं… अलार्मच्या आवाजासरशी प्रत्येकजण उठला. आपापलं आवरत आपल्या सॅक पाठीवर घेऊन सगळी मंडळी तयार झाली… गावातील काही तरुण मंडळी वाटाड्याचं काम करणार होती, त्यामुळे सर्व रॉकर्स त्यांनी दाखबलेल्या मार्गानुसार मार्गक्रमण करू लागले…
उजडताच मुलांनी गाव पाठी टाकला होता, एक डोंगरवजा टेकडी चढून जावं लागणार होतं… कोणीही पाठी राहणार नाही वा मार्ग चुकणार नाही, याची पुरेपूर काळजी शौनकच्या टीमने घेतली होती…
डोंगराची वाट चढून जाताच गावातील मुलांनी, ‘इथंच नाश्ता पाणी करून घ्या,’ असं सांगितलं; जेणेकरून सावली मिळेल… सर्वांनी शांतपणे नाश्ता करून घेतला आणि पुढच्या मार्गाला लागले… तो डोंगर उतरून एक छोटं टेकाड पार केल्यावर समोरचं दृश्य पाहून सगळेच हबकले… पाठीमागे हिरवाईने नटलेला डोंगर तर समोर ओसाड वाळवंट…!
निसर्गाच्या या किमयेच सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं… दोन्ही फरकाचे फोटो क्लिक केले गेले… काही अंतरावर त्या वाळवंटसदृश्य भागात काही दगडी कोरीव काम नजरेत आली… काही देवतांची चित्र कोरली होती… तर एके ठिकाणी दगडात काही मजकूर कोरल्याचं ध्यानात आलं…
सगळे आपापल्या परीने त्या भागाचा अभ्यास करत होते… कोणी व्हिडीओ घेत होते तर कोणी फोटो काढत होते…. तिथल्या एकूण परिस्थितीवरून फार पूर्वी तेथे वस्ती असावी, असा काही जणांचा अंदाज होता… तर काही जण इथे गुप्तधन असेल का या प्रश्नात अडकले होते…
हेही वाचा – पाटलासह ज्येष्ठ गावकऱ्यांनी केलं सावध…
इतक्यात त्या भागात जमीन कंप पावतेय असं जणू जाणवायला लागलं… हळूहळू हादरे वाढले तसे सगळे हडबडून गेले… काही जण घाबरले आणि पळू लागले… गावातल्या मुलांनी परतीच्या रस्त्याकडे बोट दाखवून प्रत्येकाला तिथून बाहेर काढलं… जणू पायाखालची वाळू घसरतेय असंच काहीसं जाणवत होतं… असा अनुभव गाठीशी आल्यावर मात्र तिथे जास्त वेळ थांबायची कोणाचीच इच्छा नव्हती… सगळे तिथून बाहेर पडलेत, याची खात्री करून सगळे परतीच्या प्रवासाला लागले…
भर दिवसा हा अनुभव घेतलाय, आता बाकी उर्वरित दिवसात काय घडेल, काय पहायला मिळेल… याचीच भीती काहींच्या मनात घर करून गेली.
सकाळी नाश्ता केला त्याच ठिकाणी थोडी विश्रांती घ्यायची का, असं मत विचारताच सगळ्यांनी नकारार्थी मान हलवली आणि आता वाड्यावर जाऊन थांबू असे सांगितले… सगळ्यांच्या मनाची चलबिचल वाढली होती… कधी नव्हे तो शौनकही चिंताग्रस्त दिसत होता… पण शाल्मली मात्र तितकीच शांत आणि निश्चल भासत होती… येताना अस्वस्थ असणारी शाल्मली आज अशा अनुभवानंतर इतकी शांत कशी राहू शकते, याचा शौनकला प्रश्न पडला होता. तिला वेगवेगळ्या प्रकारे बोलतं करायचा तो प्रयत्न करत होता, मात्र ती हसून वेळ मारून नेत होती…
गावात परतत असताना शौनकने सर्वजण आहेत ना, याची खात्री करून घेतली. सांगितलेल्या वेळेच्या आतच सगळी मुलं वाड्यावर परतली होती… रॉकर्ससोबत गेलेल्या गावातील मुलांनी आलेला अनुभव चावडीतल्या थोरामोठ्यांच्या कानावर घातला… सर्व रॉकर्स फ्रेश होऊन आवरेपर्यंत गावातील मंडळी त्यांच्या भेटीदाखल वाड्यावर आली होती… सगळे व्यवस्थित परतलेले पाहून तेही निश्चिंत झाले…
पण खरं पहाता तेही मनातून धास्तावलेले होते… सकाळचा हा अनुभव तर अंधारून आल्यावर काय होणार… गावाला धोका नव्हता, पण या मुलांचं काही सांगता येत नव्हतं… आता वेळच सर्व काही दाखवून देणार होती…
खरं पहाता गावकऱ्यांनी सगळंच सत्य सांगितलं नव्हतं… कधी कोणाला काही सांगायचंच नाही, अशी सक्त ताकीद थोरामोठ्यांनी देऊन ठेवली होती… आणि म्हणूनच बाकी गावही सुखासमाधानाने राहात आला होता…
आज मात्र गावातल्या मुलांनी ही भूकंप आणि वाळू विचित्र प्रकारे सरकण्याचा अनुभव घेतला होता… त्यांच्या सांगण्यानुसार जणू ती वाळू जमिनीच्या पोटात हळूहळू सरकत होती… तसे व्हिडीओही घेतल्याचं त्या मुलांनी सांगितलं…
वेळ भरभर जाऊ लागला होता…. सूर्य मावळतीला लागला होता… शौनकने सर्व मुलं वाड्यात आहेत ना, याची खात्री करण्यास सुरुवात केली… तेवढ्यात कोणी ओरडले, “अरे, श्लोक बसपाशी गेला होता, आला का पाहा…”
शौनकच्या तर पोटात गोळाच यायचा बाकी राहिला… तो तडकच दिंडी दरवाज्यापाशी पोहचला. दार उघडलं तर, श्लोक दारातच उभा होता… “श्लोक ताबडतोब आत ये… उगीच परीक्षा पाहू नकोस…” शौनक ओरडलाच त्याच्या अंगावर!
“चिल ब्रो… काही होत नाही… अफवा आहेत या, सर्व दुनियेला घाबरवायला… इथे कोणी यायला नको आणि इथलं सत्य बाहेर यायला नको…” श्लोक म्हणाला.
जे असेल ते असेल, आपण सकाळी अनुभव घेतलाय अजून काही विचित्र नको घडायला … आपण आणि सोबत आलेल्यांना सांभाळायला हवं एवढंच मला माहीत!” असं बोलून शौनकने श्लोकला जवळजवळ खेचूनच आत घेतलं… सर्व मुलं साशंक होऊन श्लोककडे पाहात होती… शौनकने सर्वांना शांत राहून एकमेकांना साथ देण्यास सांगितलं…
आज पाटीलही वाड्यावर वेळेतच हजर होते… वेळ होता म्हणून मुलांशी बोलत होते… जेवणानंतर गप्पा मारत बसलेले असताना… मुलांनी त्यांच्या गावातल्या या अनुभवावर बोलण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं… आपल्या आयुष्यात वाडवडिलांनी त्या वाळवंटी भागात आणि त्या शिलालेखांकडे तर कधी जाऊच नये, असं बजावलं असल्याने त्या तिथे आपण कधी वळलोच नाही, असं त्यांनी सांगितलं…
मात्र यावेळेस का कोणास ठाऊक शौनकलाही जाणवू लागलं की, ते काही तरी लपवत आहेत किंवा खोटं बोलत आहेत… पण असं असावं तरी काय इथे? या प्रश्नाचं मात्र उत्तर मिळत नव्हतं…
झोपण्यापूर्वी पाटील म्हणाले, “काहीही झालं तरी तुम्ही कोणी बाहेर पडू नका, दारही उघडू नका…!” शौनकने स्वतः हमी दिली आणि सांगितलं, “आम्ही काही जण इथे जागून पहारा देऊ…” नोकराकडून शेकोटीसाठी काही लाकूडफाटा घेतल्याचंही सांगितलं…
शौनकच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला. कारण, त्याच व्यक्तिमत्त्व होतंच तसं…
क्रमशः