दीपक तांबोळी
भाग – 3
नानांचा ॲक्सिडंट झाल्याचे ऐकून सारेच हादरले. हॉस्पिटलबाहेर खूप गर्दी जमली होती, ती फक्त नानांना बघण्यासाठी! हे विवेकला कळल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. नाना इतके लोकप्रिय असतील, असं त्याला वाटलं नव्हतं. थोड्या वेळाने त्याचे दोन्ही भाऊ बायका आणि मुलांसह आले. मुलांना आपल्या आजोबांना भेटायचं होतं. त्यांचा आजोबांवर आणि आजोबांचा त्यांच्यावर खूप जीव होता. त्यामुळे हट्ट करुन ते हाँस्पिटलला आले होते.
विवेक डाँक्टरांना भेटला. तब्येतीबद्दल विचारणा केली…
“आताच काही सांगता येणार नाही. सीटी स्कॅनचे रिपोर्ट्स आल्यानंतर परफेक्ट काहीतरी बोलता येईल. त्यांच्या मेंदूला जबरदस्त मार लागलाय. ब्रेन हॅम्रेजची शक्यताही असू शकते. आमचे प्रयत्न सुरू आहेत… लेट्स वेट अँड वॉच!”
विवेक आयसीयूतून बाहेर आल्यावर प्रसाद आणि अंकीत त्याला कोपऱ्यात घेऊन गेले,
“दादा नानांनी मृत्यूपत्र केलंय का?” अंकीतने विचारलं.
“मला कल्पना नाही. त्यांचा वकील कोण आहे, हेही माहीत नाही. पण असं का विचारताय?”
“अरे बाबा, नानांचं काही बरंवाईट झालं तर, वाटेहिस्से कसे होणार? आजकाल सगळं कोर्टातून करावं लागतं. नंतर कोर्टकचेऱ्या कोण करत बसेल? आपल्याला आताच काहीतरी करावं लागणार…” प्रसाद उतावीळपणे म्हणाला.
“अरे बापरे, खरंच की! पण आता या परिस्थितीत आपण कुणाला मृत्यूपत्राबद्दल विचारणार आणि ते बरं तरी दिसेल का?”
“मी असं करतो नानांच्या कपाटात शोधतो. तोपर्यंत तुम्ही नानांच्या मोबाइलमध्ये एखाद्या वकिलाचा नंबर मिळाला तर, त्याला फोन करून विचारा,” अंकीतने उपाय सांगितला आणि दोघं काही बोलायच्या आत तो तिथून सटकला.
प्रसादने नानांच्या मोबाईलमधून एका वकिलाचा फोन शोधून काढून त्याला फोन लावला…
“नाही. नानांनी माझ्याकडून तरी असं मृत्यूपत्र केलेलं नाही. पण मला एक सांगा नानांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही तुमच्या वाटेहिश्शांची काळजी का करताय? नाना काही इतक्यात मरत नाही. अरे, मजबूत खोड आहे ते!” वकील संतापून म्हणाले… तसा प्रसादने फोन बंद केला.
“मी काय म्हणतो दादा, आपण आपल्याला हवं तसं मृत्यूपत्र तयार करून घेऊ आणि नाना शुद्धीवर आले की, लगेच त्यांच्या सह्या घेऊ…” प्रसाद म्हणाला आणि नेमकी सुलभा तिथं आली.
“कशावर सह्या घेताय भाऊजी नानांच्या? अहो, वडील आहेत ते तुमचे! त्यांच्या तब्येतीची काळजी करायची सोडून तुम्ही काय लावलंय हे?” ती रागावून म्हणाली.
“तू त्यात लक्ष घालू नकोस, सुलभा. शेवटी व्यवहारही बघावाच लागणार ना?” विवेक म्हणाला. सुलभाने नाराजीचा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि ती निघून गेली.
सीटी स्कॅनचे रिपोर्ट्स आले. नानांच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागणार होतं; पण ते कितपत यशस्वी होईल, याबद्दल डॉक्टरांना शंका होती. नाना कोमात जाण्याचीही भीती होती. निर्णय होत नव्हता…
घरी जाऊन अंकीतने नानांच्या रूममधली सगळी कपाटं शोधली, पण कुठेही मृत्यूपत्र मिळालं नाही. तिघं भाऊ अस्वस्थ झाले. पण काही इलाज नव्हता.
दोन दिवसांनी अचानक डॉक्टर आयसीयूतून बाहेर आले. विवेक सुलभासोबत बसला होता. आज रविवार असल्याने मुलंही सगळी दवाखान्यात आली होती.
“लवकर चला, नाना शुद्धीवर आलेत. ते सगळ्यांना बोलावताहेत…” डॉक्टर विवेककडे पाहून बोलले. विवेक आणि सुलभा उठले तसे डाँक्टर म्हणाले
“मुलांनाही घेऊन चला.”
आजोबांची अवस्था पाहून मुग्धाला रडू आवरलं नाही. रडतच तिने त्यांना मिठी मारली. पलंगाजवळ जमलेल्या नातवंडांच्या डोक्यावरून, गालावरून नानांनी प्रेमाने हात फिरवला.
“कसं वाटतंय नाना?” विवेकने विचारलं
नानांनी काही न बोलता हाताने सुलभाला जवळ बोलावलं. तिच्याही डोक्यावरून हात फिरवला. ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करताहेत हे पाहून विवेक त्यांच्याजवळ गेला…
“काही बोलायचंय, नाना?” त्याने विचारलं.
मोठ्या कष्टाने नानांनी तोंड उघडलं. हलक्या, पण सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात ते म्हणाले,
“ए…क…त्र…र…हा….बा…ग…सां…भा….ळा…”
एवढं बोलतानाही त्यांना धाप लागली. त्यांनी डोळे मिटले. पुढच्याच क्षणी त्यांनी मान टाकली.
“नाना… नाना…, डॉक्टर..” विवेक ओरडला. डॉक्टर घाईघाईने पुढे आले. त्यांनी नानांना बराच वेळ तपासलं. मग विवेककडे पाहात त्यांनी मान हलवली.
“सॉरी, ही इज नो मोअर…”
सुलभा आणि नातवंडांनी त्यांना बिलगून एकच आक्रोश केला.
चौदा दिवसांचे सगळे विधी आटोपले. तिन्ही भावांनी सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली. वकिलाला गाठलं. कोर्टातून अधिकृत वारस लावून घेतले. सगळ्या प्रापर्टीची वाटणी करण्यापेक्षा पेंडिंग पडलेला ड्रीम प्रोजेक्ट सुरू करण्यावर तिघा भावांचं एकमत झालं. त्यासाठी बाग तोडावी लागणार होती. आता नाना हयात नसल्यामुळे विरोध करणारं कुणी नव्हतं…
हेही वाचा – नाना आणि तीन मुलांच्या निराळ्या तऱ्हा
तिघंही बिल्डरला भेटले. नगरपालिकेत जाऊन प्लॅन मंजूर करून घेतला. बँकेतून कर्जही मंजूर झालं. वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या गेल्या. मोक्याची जागा असल्यामुळे दुकानांचं ताबडतोब बुकिंग झालं… बारा फ्लॅटही बुक झाले. अपार्टमेंट बांधण्याइतकी रक्कम जमा झाली. तिघं भाऊ खूश झाले.
प्रसाद आणि अंकीतच्या बायकांना ही गोष्ट माहीत असली तरी विवेकने मात्र सुलभाला अजूनही अंधारातच ठेवलं होतं. एक दिवस अंकीतच्या बायकोकडून सुलभाला ते कळलंच. तिने लागलीच विवेकला जाब विचारला,
“तुम्ही काय या बंगल्याच्या जागेवर अपार्टमेंट उभं करताय म्हणे!”
“हो. सगळी दुकानं बुक झालीत. बारा फ्लॅटसुद्धा बुक झालेत…” विवेक आनंदाने म्हणाला.
“बागेचं काय करणार आहात?”
“काय करणार म्हणजे? तोडणार!”
“नानांचा या अपार्टमेंटला विरोध होता आणि मरताना नानांनी तुमच्याकडून बाग सांभाळायचं वचन घेतलं होतं?”
“हे बघ. नाना नुसतं तसं बोलले होते. मी त्यांना कोणतंही वचन दिलं नव्हतं…”
“म्हणून काय झालं! मरताना नानांची तीच इच्छा होती की, तुम्ही एकत्र राहावं आणि बाग सांभाळावी.”
“आम्ही एकत्र तर रहाणारच आहोत ना! आपले फ्लॅट जरी वेगवेगळे असले तरी, अपार्टमेंट एकच आहे ना? आणि बागेचं म्हणशील तर, अपार्टमेंट झालं की, त्याच्या कंपाऊंडमध्ये लावू ना झाडं!”
“म्हणजे, ही पूर्ण वाढलेली, बहरलेली, फळांनी लगडलेली झाडं तुम्ही तोडणारच? तुमचं, तुमच्या मुलांचं बालपण त्या बागेत गेलं. आता तुम्हाला तिची अडचण होतेय नाही का? स्वार्थी आहात तुम्ही सगळे भाऊ!”
“हे बघ सुलभा माझं डोकं नको खाऊ. या प्रसाद आणि अंकीतमुळे मी वैतागून गेलोय. दोघंही दुकानात अजिबात इंटरेस्ट घेत नाहीत. नानांनी पोसलं त्यांना. मला त्यांना असं रिकामं बसवून पोसायची अजिबात इच्छा नाहीये. कळू दे ना त्यांना, जबाबदारी काय असते ते!”
“दुकानाचं काय करणार आहात?”
“विकून टाकणार. जे पैसे येतील ते तिघं वाटून घेऊ आणि आपापले वेगळे बिझनेस सुरू करू. मी होजिअरीची एजन्सी घेणार आहे.”
“याचा अर्थ तुमच्या वडिलांची एकेक निशाणी, आठवण तुम्ही पुसून टाकणार तर…” बोलताबोलता सुलभा गहिवरली.
“एवढं सेंटिमेंटल होऊन चालत नाही सुलभा… आपलं भलं होत असेल तर, अशा बोलण्याला काही अर्थ उरत नाही. शिवाय, मला वडिलांबद्दल काही वाटत असेल, पण माझ्या भावांना तर वाटलं पाहिजे ना?”
“ते मला माहीत नाही, पण तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय! तुम्ही मोठे आहात लहान भावांना समजावू शकता…”
“आता काहीही होणार नाही, सुलभा. सगळं प्लॅनिंग झालंय आणि आमचा निर्णय पक्का आहे…” सुलभाकडे रागाने पाहात विवेक निघून गेला.
बाग तोडण्याची बातमी मुलांनाही कळली. प्रसादच्या दहा वर्षांचा मुलगा सौरभने त्याला याबद्दल विचारलं. त्यावर, “हो, तोडणार आहे ती बाग! का? तुला काही ऑब्जेक्शन?” प्रसादने रागाने विचारलं.
“पप्पा, प्लिज नका ना तोडू बाग… इतकी छान झाडं आजोबांनी वाढवली आहेत आणि आम्ही खेळायचं तरी कुठे? आपल्या कॉलनीत साधं ग्राऊंडसुद्धा नाहीये…”
“गावात दोन गार्डन्स आहेत. तिथं का नाही जात? आणि तिथं नाही जायचं तर घरात टीव्ही आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, त्यावर हजारो गेम्स आहेत… ते खेळा.”
“आम्हाला नाही खेळायचे ते गेम्स. डोळे खराब होतात त्यांनी. आम्हाला आपल्या बागेतच आवडतं. तिथं गेलं की आजोबांशी गप्पा मारल्यासारखं वाटतं आणि पप्पा, इथं अपार्टमेंट बांधून त्यात दुकानं काढण्यापेक्षा आपलं इतकं चांगलं दुकान का नाही चालवत तुम्ही?”
“तू नको शहाणपणा शिकवू त्यांना!” प्रसादची बायको मुलाला दटावत म्हणाली, “मोठ्यांच्या भानगडीत लहानांनी पडू नये, समजलं? जा आता अभ्यासला बैस.”
सौरभ हिरमुसून तिथून निघून गेला.
“तुम्हांला माहितेय? ही सगळी पोरं एकत्र येऊन त्या बागेवरच चर्चा करताहेत. विवेक भाऊजींची मुग्धा यांची लीडर आहे. ती या पोरांना सांगतेय की, आपण बाग तोडूच द्यायची नाही म्हणून… आमच्या आजोबांची बाग आहे म्हणे!”
प्रसाद हसला.
“पोरांना काय घाबरतेस? त्यांना कोण जुमानतंय? दोन फटके मारले की, चुपचाप बसतील…”
अपार्टमेंट बांधायचं म्हणून तिन्ही भावांनी एक जुनं घर राहण्यासाठी भाड्याने घेतलं. बागेतली झाडं तोडण्याची महानगरपालिकेतून परवानगी घेतली गेली. अगोदर बाग तोडून मग बंगला तोडण्याचं काम सुरू करायचं होतं.
मुहूर्त ठरला… प्रसादने दोन झाडं तोडणाऱ्यांना बोलावून घेतलं… ती माणसं सकाळी 11 वाजता आली. चिकूचं झाड अगोदर तोडावं, असं ठरलं. एक माणूस झाडावर चढला. लागलेले जवळजवळ दीडशे चिकू त्याने तोडून विवेककडे दिले. दुसराही माणूस कुऱ्हाड घेऊन वर चढला. वरच्या फांद्या दोघांनी तोडायला सुरुवात केली. ते पहाताना खाली उभ्या असलेल्या सुलभाच्या डोळ्यात पाणी आलं. ही झाडं वाढवताना सासऱ्याच्या बरोबरीने तिनेही कष्ट घेतले होते… या बागेत घालवलेले क्षण तिला आठवू लागले आणि तिचा जीव कासावीस होऊ लागला…
हेही वाचा – तिन्ही पोरांच्या डोक्यातील ‘त्या’ खुळामुळे नाना हैराण
“अहो ऐका ना. नका ना तोडू ती झाडं…” ती गयावया करत विवेकला म्हणाली पण विवेकने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्यात घरासमोर बस थांबल्याचा आवाज आला. शाळेत गेलेली मुलं आली होती. पाचच मिनिटांत बंगल्याचा बागेत उघडणारा दरवाजा उघडला आणि विवेकची दोन आणि प्रसादची दोन मुलं शाळेच्या युनिफॉर्ममध्येच बागेत आली. चिकूचं अर्ध तुटलेलं झाड आणि त्याच्या बागेत पडलेल्या फांद्या पाहून स्तब्ध झाली. दुसऱ्याच क्षणी मुग्धा ओरडली,
“हे काय करताय तुम्ही? उतरा खाली. कोणतंच झाड तोडायचं नाही!”
झाडावरची माणसं थांबली. विवेक मुग्धाजवळ आला, “शांत बस मुग्धा. त्यांचं काम त्यांना करू दे…”
“नाही बाबा, आम्ही झाडं तोडू देणार नाही. आजोबांनी लावलेली झाडं आहेत ती!”
“म्हणून काय झालं? आपल्या प्रगतीच्या आड ती येतायेत, मग ती तोडायला नको?”
“काका, मरताना आजोबा तुम्हांला सांगून गेले की, ‘बाग सांभाळा, एकत्र रहा.’ मी होतो तिथे, मी ऐकलं होतं सगळं,” सौरभ म्हणाला.
तेवढ्यात प्रसाद बाहेर आला. त्याने ते ऐकलं,
“काय गोंधळ लावलाय तुम्ही पोरांनी! मुकाट्याने आमचं काम करू द्या!” तो ओरडला,
“आम्ही नाही जाणार आत. तुम्ही अगोदर झाडं तोडणं बंद करा…” विवेकचा लहान मुलगा म्हणाला.
चिकूचं झाड आता थोडंसंच बाकी होतं. माणसं आता खाली उतरून खोडावर घाव घालीत होती.
“बंद करा म्हणतेय ना मी!” मुग्धा किंचाळली आणि चिकूच्या झाडाजवळ धावत गेली. दोघातला एक माणूस तिच्यासमोर उभा राहिला. दुसरा माणूस घाव घालतच राहिला. मुग्धामध्ये कुठून बळ आलं माहीत नाही तिनं त्या माणसाला ढकललं आणि घाव घालणाऱ्या माणसासमोर उभी राहिली. ते पाहिल्यावर विवेक धावत आला आणि त्याने मुग्धाला ओढलं आणि धरून ठेवलं. मुग्धा ओरडत होती… किंचाळत होती… रडत होती… खोडावर खपाखप घाव पडू लागले आणि थोड्याच वेळात झाड जमीनदोस्त झालं! जमिनीवर फांद्या आणि पानांचा ढिग जमा झाला. चारही मुलं धक्का बसल्यासारखी त्या सपाट जागेकडे बघत राहिली.
“आता ते आंब्याचं झाड घ्या..” विवेक ओरडला. तशी मुग्धा किंचाळली, “नाहीsss” तिने विवेकच्या हाताला झटका मारून स्वतःची सुटका करुन घेतली आणि पळत जाऊन तिने आंब्याच्या झाडाला मिठी मारली. तिच्या मागे सौरभ, त्याची बहीण, विवेकचा मुलगा पळत गेले… त्यांनीही झाडाला मिठी मारली. ते पाहून विवेक आणि प्रसाद धावत गेले. मुलांना बाजूला करू लागले. मोठ्या प्रयासाने विवेकने मुग्धाला बाजूला केलं आणि तिच्या थोबाडीत मारली. प्रसादनेही सौरभला बाजूला करून ढकलून दिलं. खाली पडलेला सौरभ उठायला गेला तसा प्रसाद त्याला लाथांनी बडवू लागला. आंब्याच्या झाडाला मिठी मारलेली दोघं मुलं भीतीने रडू लागली. रडणाऱ्या मुग्धाला पाहून विवेक संतापाने म्हणाला,
“खबरदार जर तू त्या झाडाजवळ गेली तर!”
“ते माझ्या आजोबांचं झाड आहे. मी ते तोडू देणार नाही…” मुग्धा रडतरडत म्हणाली आणि परत झाडाजवळ जाऊ लागली तसं विवेकने तिला अडवून इतक्या जोरात तिच्या मुस्काटात मारली की, ती हेलपाटून खाली पडली. ते पाहून सुलभा धावतच पुढे आली, तिने मुग्धाला उचलून जवळ घेतलं आणि विवेकवर ओरडून म्हणाली,
“बस करा. लाज नाही वाटत पोटच्या पोरीला मारताना? पैशासाठी आंधळे झालाहात तुम्ही. ती लहान पोरं गयावया करताहेत तरी तुम्हांला त्यांची दया येत नाही? आता माझा जीव गेला तरी हरकत नाही. मी झाड तोडू देणार नाही.”
तिरीमिरीत ती झाडाजवळ जाऊन उभी राहिली आणि झाडं तोडणाऱ्या माणसांना म्हणाली.
“चालवा ती कुऱ्हाड माझ्यावर… तुकडे करा माझे, मगच ते झाड तोडा…”
क्रमश:
मोबाइल – 9209763049


