Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शिक्षण सेवक वळला आपल्या मूळ व्यवसायाकडे अन्…
    ललित

    शिक्षण सेवक वळला आपल्या मूळ व्यवसायाकडे अन्…

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करDecember 25, 2025No Comments11 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, शिक्षण सेवक, फिजिक्सचा शिक्षक, शिक्षकाची फरफट, खेडेगावातील शिक्षक, खेडेगावातील शाळा, शिक्षक पिळवणूक, पाटणकर शिक्षण सेवक, शिक्षण सेवक पाटणकर
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 2

    वैभववाडी तालुक्यातील कोकिजरेपासून 40 किलोमीटर अंतरावरील खेडेगावात शिक्षण सेवक म्हणून नारायण पाटणकरना नोकरी मिळाली. मग जाण्या-येण्यात वेळ जायला नको म्हणून पाटणकरांनी आपले कुटुंब इथे हलविले. शिक्षण सेवक नारायण पाटणकरांची बायको वनिताने आजूबाजूच्या बायकांबरोबर ओळख वाढविली. ज्यांनी राहायची व्यवस्था केली त्या दुकानदार मिराशींच्या घरी तिचे जाणे येणे होतेच. काही हवे असले तर मिराशींची बायको तिला द्यायची.

    शिक्षण संस्थेने पहिले दोन महिने पाटणकरांना सहा हजार रुपयांप्रमाणे मानधन दिले. तिसरा महिना संपला चौथ्या महिन्याची दहा तारीख आली तरी पैशाचा पत्ता नाही. वनिता नवर्‍याकडे एकसारखी पैसे मागत होती. घर सामानाला पैसे हवे होते. मिराशींची उधारी चालू होती. भाजीला पैसे हवे होते. दुधाचे पैसे द्यायचे होते. चौथ्या महिन्याची पंधरा तारीख आली, तसे पाटणकर क्लार्क कोळंबकरना भेटायला गेले.

    ‘कोळंबकर, अहो माझा पगार नाही दिला. आज पंधरा तारीख. मी माझा संसार कसा चालवू?’

    ‘अहो, पाटणकर. ह्यो सरकारचो पगार न्हय. एक तारखेक गावणारो. हेका मानधन म्हणतत. मुला जेव्हा फीचे पैसे भरतली त्यातून तुमचा मानधन.’

    ‘पण केव्हा मिळेल.?’

    ‘तुम्ही चेअरमनांका विचारा मी काय सांगू?’

    दुसर्‍या दिवशी शाळा सुटल्यावर पाटणकर चेअरमनांच्या घरी गेले. तर, चेअरमन सोसायटीत गेले होते. पाटणकर चौकशी करत सोसायटीत गेले. चेअरमन दोस्तांसमवेत गप्पा मारत बसले होते. पाटणकरांनी त्यांना नमस्कार केला.

    ‘हा काय पाटणकर इकडे कसो काय?’

    ‘साहेब, मागील महिन्यात पगार नाही झाला. पंधरा तारीख आली म्हणून आलो होतो.’

    ‘हे बघ पाटणकर, शिक्षक सेवकांचो पगार म्हणजे मानधन. एक तारखेक मिळात हेची गॅरंटी नाय. या आधी जे होते तेंका पण वेळेत कधी पैसे मिळाक नाय. मुलांकडून जसे पैसे जमतीत तसे पैसे देणार. संस्थेकडे पैसे नाहीत बाबा. नोकरी स्वीकारताना विचार करायला हवा होतास तू.’

    ‘पण साहेब, माझं कुटुंब…’

    ‘हे बघ मी काही करू शकत नाही. तू जा.’

    पाटणकर निराश मनाने बाहेर पडले. घरी येऊन वनिताला सर्व परिस्थिती सांगितली. वनिता दुसर्‍या दिवशी भावाकडे कनेडीला गेली. तिच्या भावाचे कनेडीत आणि कणकवलीत दोन सलून होती. तिने भावाला सर्व परिस्थिती सांगितली.

    ‘वनिता, भावोजींका सांग. तुमका पगार देनत नाय तर, नोकरी सोडा आणि बर्‍यापैकी सलून घाला. मी मदत करतंय. अगो, आमच्या धंद्यात काय कमी नाय. दाढी करूक आम्ही चाळीस रुपये घेतो आणि केस कापूक शंभर रुपये. एसी सलून घातला तर केस काळे करूक पाचशे रुपये घेतो आणि लोक आनंदानं देतत. दिवसाचो खर्च वजा करुन दीड दोन हजार रुपये खय गेले नाय.’

    ‘सांगतंय मी तेंका. पण तेंनी शिक्षण घेतला ना. डबल ग्रॅज्युएट आसत. सासर्‍यानी मोठ्या अपेक्षेन एका झीलाक कोल्हापुराक पाठवून शिकवल्यानी, तेंका काय वाटात?’ वनिताच्या भावाने दोन हजार रुपये दिले आणि वहिनीने तांदूळ, गहू, शेंगदाणे, कुळीथ वगैरे दिले. वनिताला खरं म्हणजे भावाकडे मागणे कमीपणाचे वाटत होते. पण नवर्‍याचा पगार सुरू झाला की, दादाचे पैसे परत करू, असे तिने ठरविले.

    संस्थेकडून पगाराचे असेच सुरू होते. दोन महिन्यांनी सहा हजार मिळाले, पुन्हा दोन महिने नाही. कसा तरी संसाराचा गाडा पाटणकर आणि वनिता ओढत होते. सरकारचे धोरण बदलेल आणि आपणास परमनंट शिक्षकाचा पगार मिळेल, या आशेवर ते होते. हळूहळू दसरा, दिवाळी जवळ आली आणि वनिताच्या चुलत बहिणीचे लग्न ठरले. पाटणकरांच्या मावस भावाचे लग्न ठरले. ही तर घरातली लग्ने. लग्नाला जायला हवेच. वनिता नवर्‍याला म्हणाली, ‘आता दिवाळीत दोन लग्ना आसत. घरचीच लग्ना. दागिने जावंदे, खोटे दागिने घालूक येतत. पण कपडे तरी हवेत. माझे साडये जुने झालेत. दोन साड्या, ब्लाऊज, शाम्याक दोन ड्रेस आणि लग्नाक अहेर करुक होयो. तेनी आपल्या लग्नात अहेर केल्यानी. पैशाची सोय करुक होयी. मागे दादानं पैसे दिल्यान, आता तेच्याकडे परत पैसे कशे मागतले?’

    ‘नको, आता दादाकडे मागू नको. मी बघतंय कोणाकडे तरी.’ पाटणकरांच्या लक्षात आले. आपले दोन सहकारी आहेत. सावंत आणि जांभळे. दोघेही परमनंट आहेत शिवाय जांभळेंची बायको शिक्षिका आहे. म्हणजे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही.

    दुसर्‍या दिवशी त्यांनी सावंत सरांना गाठले. सावंत सरांना भेटताना त्यांच्या लक्षात आले, हे सर आता रिटायरमेंटला आले म्हणजे यांचा पगार एक लाखाच्या आजूबाजूला असणार. आपल्याला फत पाच हजारांची गरज आहे.

    ‘सावंत सर, माझं एक काम होतं.’

    ‘होय काय! पैशाचे सोडून काही काम असेल तर सांगा.’

    ‘पैशाचेच होते. फक्त पाच हजार हवे होते.’

    ‘नाय ओ. मीच कर्ज घेतलंय. त्याचे हप्ते भरतंय आणि तुमच्या या सहा हजारात तुम्ही पैसे परत कशे करणार बाबा? नाही जमायचे.’

    हिरमुसले होत पाटणकर बाहेर पडले. आता जांभळे सर म्हणजे नवरा बायकोचा पगार. म्हणजे किमान दीडलाख रुपये. हे नाही म्हणणार नाहीत, असा पाटणकरांचा अंदाज होता.

    ‘जांभळे सर, थोडं काम होतं.’

    ‘बोला पाटणकर.’

    ‘फत पाच हजारांची गरज होती. पगार झाला की, तुमचे पैसे निश्चित देणार.’

    जांभळे सर खो-खो हसत म्हणाले, ‘पाटणकर शिक्षण सेवक कधी कुणाचे उधार घेतलेले पैसे देतो काय हो? तुमचे महिन्याचे मानधन वेळेत मिळत नाही म्हणजे तुम्ही अनेकांकडून पैसे उधार घेतलेले असणार. मग माझे देणार कसे? मी कधीच कुणाला पैसे देत नाही. पैसे कमवण्यास घाम गाळावा लागतो. पैसे काय झाडाला लागतात?’

    ‘हो सर, बरोबर आहे तुमचं.’ असं म्हणून पडेल चेहर्‍याने पाटणकर बाहेर आले. बाहेर पडता पडता शाळेचा प्यून मोहनने त्यांना पाहिले. मोहनला पहिल्या दिवसापासून पाटणकरांची दया येत होती. गरीबीतून हा मुलगा नोकरीस लागला, तो शिक्षण सेवक म्हणून. चार वर्षे आधी शिक्षण पुरे केले असते तर, एव्हाना साठ-सत्तर हजार मिळवले असते. मोहनने पाटणकरांना बाजूला घेतले.

    ‘सर, काय प्रॉब्लेम होता?’

    ‘काही नाही ओ, असंच.’

    ‘असंच नाही. माझ्या कानात शब्द पडलेत. या जांभळ्याकडे पैशे मागूक गेलात. अहो, जांभळो म्हणजे एक नंबर चिकटो. किती पैसे हवेत? मी देतंलय. अहो, माका चाळीस हजार रुपये पगार आसा माका खर्च कसलो? किती व्हयेत सांगा. उद्या आणून देतंलय.’

    ‘कसं सांगणार तुम्हाला. पण पाच हजाराची गरज होती.’

    ‘उद्या तुमका पाच हजार रुपये मिळतले.’

    आणि खरोखरच मोहनने पाटणकरांना पाच हजार रुपये दिले आणि वर सांगितलं, ‘पाटणकर हे पैसे परत करू नकात आणि तुम्ही दिलात तरी मी घेवचंय नाय.’

    ‘पण मोहनराव असा कसा?’

    मोहन तेथून दुसरीकडे निघून गेला होता. पाटणकरांचे मन भरून आले. आपले पैसे मिळाले की मोहनचे पैसे परत करायचे, हे त्यांनी मनोमन ठरविले.

    पाटणकरांची बायको खूश झाली. या लग्नासाठी साड्या, ब्लाऊज, मुलासाठी कपडे आणि बळेबळे नवर्‍याला पण पॅन्ट-शर्ट घ्यायला लावले.

    जानेवारी महिना उजाडला आणि अकरावी-बारावीची सहल काढण्याची टूम निघाली. यावर्षी गोव्याला जायचे ठरले. एकंदर बावीस मुला-मुलींनी सहलीला येण्याची तयारी दाखविली. सोबत शिक्षक म्हणून पाटणकर आणि खालच्या वर्गात शिकवणार्‍या चव्हाण मॅडम जाणार होत्या. सकाळी सहाला बसमधून जायचे आणि संध्याकाळपर्यंत परत यायचे, असा कार्यक्रम ठरला. कणकवलीतून बस येणार होती. एकंदर बारा मुलगे, दहा मुली, दोन शिक्षक असे चोवीस जण सहलीला निघाले.

    पाटणकरांनी सहलीचा कार्यक्रम निश्चित केला आणि तसे ड्रायव्हरला सांगितले. गाडी साडेसहाला निघाली. गोव्यातील ओल्ड चर्च, शांतादुर्गा, मंगेशी देवस्थाने तसेच पणजी करत दुपारी तीनच्या सुमारास कळंगुट बीचवर आले. पाटणकरांनी आणि चव्हाण मॅडमनी मुलांना येथे एक तास दिला. समुद्रावरुन फिरुन चार वाजता पुन्हा बसकडे या. चार वाजता बस सुटेल, असे निक्षून सांगितले. मुलं-मुली खुशीत समुद्रावर धावली. पावणेचार झाले तसे पाटणकर आणि चव्हाण मॅडम बसकडे आले. चारला पाच मिनिटे असताना मुलं-मुली गाडीकडे येऊ लागली. चार वाजले तसा ड्रायव्हर येऊन बसला. चव्हाण मॅडमनी मुल-मुली मोजली तर वीस मुल भरली. म्हणजे दोन मुलं आली नव्हती. अजून पाच-दहा मिनिटे थांबून पुन्हा पाटणकर शोधून आले. दोन मुलं आली नव्हती. कोण नाही आले याची चौकशी केली तर, बारावीतील एक मुलगा आणि अकरावीतील एक मुलगी आली नव्हती. पाटणकर घाबरले. पाटणकरांनी मुलांकडे आणि चव्हाण बाईंनी मुलींकडे चौकशी केली तर, मुल एकमेकांकडे बघून खुसुखुसु हसत राहिली. चव्हाण बाई पाटणकरांना म्हणाल्या, काहीतरी गडबड आहे. ही मुलं गेली कुठे? शेवटी जबाबदारी पाटणकरांची होती. त्यांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना एक तासाकरिता सोडलं होत. म्हणता म्हणता साडेचार वाजले तरी या दोन मुलांचा पत्ता नाही. पाटणकरांच्या घशाला कोरड पडली. काय करावं हे कळेना. त्यांनी शाळेत फोन केला आणि मुख्याध्यापकांना ही बातमी सांगितली. जोंधळे चिडले… ‘तुम्हाला मुलांना समुद्रावर मोकळं सोडायला कोणी सांगितलं होतं? आता काय जबाब देणार पालकांना? आता तेथल्या पोलिसांना तक्रार द्या. दुसरा काही उपाय दिसत नाही मला,’ असं म्हणून जोंधळेंनी खाड्कन फोन आपटला.

    पाटणकर घाबरले. चव्हाण मॅडम थरथरू लागल्या. कोण मुलं आलेली नाहीत, याची पुन्हा चौकशी करताना संस्थेच्या सदस्या साळगांवकर मॅडम यांची कन्या आलेली नव्हती. पाच वाजले तरी मुलं आली नाहीत. शेवटी पाटणकरांनी कळंगुट पोलीस स्टेशनला तक्रार दिली. दोघांची नावे आणि फोटो दिले. इन्स्पेक्टरने जवळपास कुठल्या बीचवर सतरा-अठरा वर्षांची मुलं समुद्रात बुडाली होती काय? याची चौकशी केली. सुदैवाने, त्या दिवशी संपूर्ण गोव्यात कसलीही दुर्घटना घडली नव्हती. मग इन्स्पेक्टरने कळंगुटच्या आसपास सर्व हॉटेल्स, बीअर बार, लॉजमध्ये फोटो पाठवून चौकशी करण्याची ऑर्डर दिली. यावेळेपर्यंत गाडीत बसलेल्या मुलांनी आपापल्या घरी ही बातमी कळविली होती. त्यामुळे गावात सगळीकडे ही बातमी पसरली. पाटणकरांना आणि चव्हाण मॅडमना फोनवर सतत फोन येत होते. पण त्यांनी ते न घेण्याचे ठरविले.

    हेही वाचा – शिक्षण सेवक… खेडेगावात काय किंमत?

    पंधरा मिनिटांनी एका बारवाल्याचा मेसेज आला. सव्वातीन वाजता एक मुलगा आणि एक मुलगी आपल्या बारमध्ये बीअर पीत बसली होती. मग ते टॅसीच्या शोधात रस्त्यावर फिरत होते. ताबडतोब शहरातील सर्व टॅसीवाल्यांची चौकशी झाली. रात्री आठ वाजता निरोप आला. एका टॅसीवाल्याने दोघांना कर्नाटक सीमेपर्यंत सोडलं होत. तेथील आजूबाजूच्या लॉजवर चौकशी केली गेली आणि रात्री नऊ वाजता एका लॉजमध्ये हा मुलगा आणि मुलगी सापडली.

    गावात जोरदार चर्चा सुरू झाल्या. त्यात साळगांवकर बाईंची मुलगी असल्याने जास्त खमंग चर्चा… एव्हाना गावातून दहा-बारा गाड्या माणसे भरून कळंगुट पोलीस स्टेशनकडे आल्या होत्या. साळंगावकर बाई आणि तिचा नवरा पोलीस स्टेशनमध्ये आले आणि ते पाटणकरांना शिव्या घालू लागले. रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्या मुलांना कळंगुट पोलीस स्टेशनवर आणले. कळंगुटच्या आमदाराच्या मदतीने सर्व प्रकरण मिटवले आणि पालकांनी मुलं आपल्या ताब्यात घेतली आणि रात्री बारा वाजता सहलीसाठी बाहेर पडलेली मुलं, पाटणकर सर, चव्हाण मॅडम आणि गावाकडून आलेल्या गाड्या गावाकडे निघाल्या. पाठीमागून साळगांवकर मॅडम, साळगांवकर आणि त्यांच्या वाडीतील अनेकजण येत होते.

    साळगांवकर आणि साळगांवकर मॅडम दात ओठ खात होते. अख्ख्या गावात तोंड दाखवायला जागा नव्हती आणि हे सर्व त्या पाटणकरांमुळे. साळगांवकर बाई बडबडू लागल्या. तरी मी चेअरमनांना सांगत होते. ‘त्या मूर्ख माणसाला शाळेत घेऊ नका. पण चेअरमन म्हणाले, सहा हजारांत या गावात कोण येणार?’ साळगांवकर, शिव्या घालत बोलू लागला, ‘त्या चेअरमनला मग बघतो. आधी या पाटणकराला बघतो. एकतर मुलांना बीचवर एक तास सोडला आणि मग पोलीस तक्रार करतो. केवढी बेअब्रू झाली माझी. नाही या पाटणकरला ठार मारला तर नावाचा साळगांवकर नाही.’

    ‘अहो, त्याला ठार मारू नका हां! तुरुंगात जाल. मोडून ठेवा फक्त. आधीच या कार्टीची मला काळजी लागली. त्या पोराबरोबर पळून जात होती. आता हिची शाळा बंद. मुंबईला ताईकडे पाठवते हिला आणि लग्न करून देते.’

    मिराशींच्या घरात पण जोरात चर्चा सुरू होती. मिराशी बायकोला सांगत होते, ‘त्या साळगांवकराचा पॉर लय चालू आसा. तेच्या बापाशीक मी सांगलेलंय, ह्या कोणाकोणाबरोबर फिरत असता. तेचा लवकर लगीन लावन टाक, पण झाला ता बरा झाला. साळगांवकरनीचो तोरो जरा कमी होतोलो. नाहीतरी चेअरमनांच्या संगतीत हीका वाटा होता सगळी शाळा आपल्या खिशात.’

    एवढ्यात भयभीत झालेली पाटणकरांची बायको वनिता आपल्या मुलाला कमरेवर मारुन आली. मिराशींना म्हणाली. ‘भावोजी, शाळेकडे माणसा जमली आसत. पाटणकरांका मोडून ठेवतलव असा बडबडतत. माका भीती वाटता.’

    ‘वहिनी घाबरू नकात. मी कसा काय ता बघतयं. मी पण शाळेकडे जातय.’ अस म्हणून मिराशी आपल्या स्कूटरवर बसून शाळेकडे गेले. घाबरलेल्या वनिताने आपल्या भावाला कनेडीत फोन केला आणि त्याला ही बातमी सांगितली. साळगांवकरच्या वाडीतले लोक पाटणकरांना मारण्याची भाषा बोलत आहेत, अशी बातमीही दिली. भाऊ म्हणाला, ‘वनिता घाबरू नकोस. मी दहा मिनिटात गाडी घेऊन निघतंय.’

    हेही वाचा – चॅलेंज.. अहंकार मोडून काढणारं!

    रात्रौ अडीच वाजता सहलीची बस शाळेकडे पोहोचली. मुलांचे पालक शाळेकडे उभे होतेच. मुलं पटापट उतरली आणि आपल्या पालकांकडे गेली. पाटणकर, चव्हाण बाई उतरले. बस पाठोपाठ साळगांवकरांची गाडी आली. दारू पिऊन टाईट झालेल्या साळगावकराने कमरेचा पट्टा काढला आणि तो पाटणकरांना बडवू लागला. सर्व पालक पाटणकर पट्टयाचा मार कसा खातात याची मजा घेत होते. एवढ्यात मिराशी पुढे आले आणि साळगावकरांनी उगारलेला पट्टा त्यांनी हवेतच पकडला आणि खेचून घेतला. मिराशी ओरडून म्हणाला, ‘हरामखोर साळगांवकरा, या गरीब मास्तराक मारतस? तुझ्या पोरीन शेण खाल्ल्यानं आणि त्या मास्तराक जबाबदार धरतस?’

    ‘मग? त्याने मुलांना बीचवर का सोडलं? आणि मग पोलीस तक्रार का केली?’

    ‘अरे, मुलं सहलीला गेली होती ना? मनासारखं फिरू दे त्यांना म्हणून सोडली. बाकीची वीस मुलं वेळेत गाडीत आली. तुझा चेडू आणि तो फर्नाडिसाचो झील तेवढे पळाले. ह्या दोघांका मी देवळाच्या पाठीमागे कितीवेळा बघलंय. तुका सांगलेलय ह्या चडवार लक्ष ठेव. आता पाटणकरांवर हात उचलशीत तर मुळासकट उपटून टाकीन लक्षात ठेव.’

    साळगांवकर जळफळत होता. पाटणकरांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होता. एवढ्यात कनेडीहून पाटणकरांचा मेहूणा दोन गाड्या भरुन माणसे घेऊन आला. पटापट दरवाजे उघडले गेले आणि हातात दांडे घेतलेले दहा जण बाहेर आलेत. पाटणकरांच्या मेहुण्याने हातात सुरा घेतला आणि पट्टा हातात घेतलेल्या साळगांवकराच्या मानेवर लावला.

    ‘वा रे मुडद्या, या गरीब शिक्षकावर हात टाकतंस? कित्या तो शिक्षण सेवक आसा म्हणून? पैशानं गरीब आसा म्हणून? भानगडी केल्यानं तुझ्या चेडवान आणि या पट्टयानं मारतस या मास्तरास. थांब तुझो कोथळो बाहेर काढतंय.’

    पाटणकरांच्या मेहुण्याने सुरा पोटावर लावताच साळगांवकर रडू लागला. हातापाया पडू लागला. साळगांवकरांची मित्रमंडळी एवढी सगळी दांडे हातात घेतलेली माणसे बघून पळू लागली. मिराशी पुढे झाले आणि त्यांनी मेहुण्याला थांबविले. ‘रक्तपात करू नको बाबा. पोलिस मागे लागतले. एकवेळ सोड तेका.’

    मेहुण्याने सुरा बाजूला केला आणि साळगांवकरांच्या दोन थोबाडीत दिल्या. बरोबरीच्या साथीदारानी दांड्यानी त्याच्या पाठीवर मारले. साळगांवकर गुरासारखा ओरडू लागला. मिराशीनी दोघांना दूर केले. मग मेव्हण्याने साळगांवकरांच्या मानेला धरले आणि उचलून पाटणकरांच्या पायावर घातले. पाया पड तेंच्या. अरे, डबल ग्रॅज्युएट माणूस आसा तो. शिक्षण सेवक झालो म्हणून तुमका तेंची किंमत नाय. साळगावकर लंगडत लंगडत बाजूला झाला. मग मेहुणा पाटणकरांकडे वळला. पाटणकरांची पाठ, मान, दंड रक्ताने माखले होते.

    ‘चला भावोजी, तुमका डॉटरकडे नेऊन मलमपट्टी करूक होयी आणि आजपासून ह्या गाव आणि ही शिक्षण सेवकाची नोकरी सोडायची. तुम्ही कितीही हुशार असलात, कितीही शिक्षण घेतलात तरी तुम्ही शिक्षण सेवक झालात की, तुमची किंमत शून्य. ही असली नोकरी करण्यापेक्षा मी तुमका धंदो काढून देतंय.’

    मेहुण्याने पाटणकरांना गाडीत घेतले. वाटेत बहिणीच्या घरी जाऊन घरातील सर्व सामान आणि बहिणीला आणि तिच्या मुलाला घेऊन कणकवली गाठली.

    पंधरा दिवसांनी कणकवलीत ‘पाटणकर हेअर कटींग सलून एसी’ सुरू झाला. पाटणकरांच्या मेहुण्याने आपला अनुभवी कारागिर सोबत दिला. हळूहळू पाटणकरांनी सर्व शिकून घेतले. दोन महिन्यांनी ते सलूनमध्ये व्यवस्थित काम करू लागले. पाटणकर हेअर कटींग सलूनला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. एका वर्षात दुसरे सलून कणकवली स्टेशनजवळ काढले.

    आता पाटणकर मजेत आहेत. व्यवसायात चांगले पैसे मिळवत आहे. बायको, मुलगा खूश आहेत. तरीपण, पाटणकरांच्या स्वप्नात आर्किमिडीज, न्यूटन येतो… स्पेट्रम थिअरी येते… सरफेस टेंशन येते… आणि मग अजून आपण शिक्षण सेवक असल्याचे दिसते आणि ते घाबरतात. मग जाग आल्यावर आपण पाटणकर हेअर कटींग सलूनचे मालक असल्याचे तेंच्या लक्षात येते… मग ते कुशीवर वळतात आणि गाढ झोपी जातात.

    समाप्त

    मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    By रेवती निलेश पांडेApril 15, 2026

    दवाखान्यातून बाहेर पडताना कवीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी तो तिथून निघाला. हातातल्या…

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026
    Most Popular

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.