दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 31 डिसेंबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 10 पौष शके 1947; तिथि : द्वादशी 25:48; नक्षत्र : कृत्तिका 25:29
- योग : साध्य 21:13; करण : बव 15:26
- सूर्य : धनु; चंद्र : मेष 09:22; सूर्योदय : 07:10; सूर्यास्त : 18:10
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
भागवत एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – 2025 चा शेवटचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुम्हाला नशीबाची मोठी साथ मिळेल. यामुळे गुंतागुंतीच्या कामात अचानक यश मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन टिकवण्यासाठी, तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे.
वृषभ – या वर्षीच्या शेवटच्या दिवशी थोडे व्यग्र राहाल. तुम्हाला एखादे खूप महत्त्वाचे आणि तातडीचे काम सोपवले जाऊ शकते किंवा ते पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाईल. अशा परिस्थितीत, आपले कर्तव्य न डगमगता पार पाडावे लागेल. काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल.
मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. काम करण्याचा तुमचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळे गुंतागुंतीची कामेही सहजतेने पूर्ण करण्यास जास्त वेळ लागत नाही. आज, असाच एक मुद्दा तुमच्या वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल. याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल.
कर्क – आज, कामाचा मोठा ताण येऊ शकतो. ज्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होईल. व्यवसाय करत असाल तर तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवा. त्यातला एखादा तुमच्या प्रतिस्पर्ध्याला तुमच्याबद्दल सगळी माहिती पुरवू शकतो, यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याचा अनुभव देणारा ठरेल. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी इतरांच्या अधिकारक्षेत्रात घुसण्याची जुनी सवय तुम्हाला बदलावी लागेल. नाहीतर इतरांकडून टीका होऊ शकते. एक चांगला अधिकारी बनण्यासाठी, तुम्हाला प्रथम एक चांगला कर्मचारी बनावे लागेल.
कन्या – आज संघर्षांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सहकारी आणि वरिष्ठांशी जास्त वाद घालणे टाळा. व्यवसायात आणि व्यापारात येणाऱ्या चढ-उतारांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जर यशस्वी व्हायचे असेल तर सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेणे शहाणपणाचे ठरेल.
तुळ – सकाळपासून तुम्हाला अस्वस्थ करणारे वातावरण असेल. काही अडथळ्यांनंतरच दैनंदिन घरातील कामे पूर्ण होतील. व्यवसायाची परिस्थिती गेल्या काही काळापासून डळमळीत आणि अनिश्चित आहे. व्यवसायातील चढ-उतारावर फक्त तुमचे नाही तर कामगारांचेही भवितव्य अवलंबून आहे, याचे भान ठेवा. म्हणजे चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत.
हेही वाचा – पैलतीर… नकारात्मक अन् सकारात्मक!
वृश्चिक – कधीकधी, तुम्ही अशा परिस्थितीत अडकलेले असता ज्यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आजही, अशाच प्रकारच्या व्यवसायिक गुंतागुंतींना तोंड द्यावे लागणार आहे. जर तुम्हाला मार्ग सोपा आणि सरळ ठेवायचा असेल, तर अशा पर्यायांना चिकटून राहा जे तात्काळ फायदे देणार नाहीत, पण अडचणीही निर्माण करणार नाहीत.
धनु – शेअर बाजारात आजपर्यंत खूप पैसे वाया घालवले आहेत, तर या गुंतवणुकीच्या मार्गाचा शांतपणे फेरविचार करा. मेहनत हाच एक योग्य पर्याय ठरू शकतो. तुमच्या जुन्या व्यवसाय पद्धतींवर लक्ष केंद्रित करा. दररोज होणारे नुकसान कशाप्रकारे टाळता येईल, या दृष्टीने प्रयत्न करा.
मकर – तुमच्या कामाची गती आज थोडी मंद असेल. मात्र तुम्ही स्वतः खूप सकारात्मक आणि उत्साहाने भरलेले असाल. सर्व कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात रहाल. मात्र कामे तुमच्या अपेक्षेप्रमाणे तेवढ्या गतीने होणार नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला सर्वकाही नियंत्रणाखाली आणावे लागेल.
कुंभ – दीर्घ काळापासून सुरू असणारा तुमचा कठीण काळ आता संपत आला आहे, असे दिसते. आज तुम्हाला एकट्याने वेळ घालवावासा वाटेल. स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची हीच वेळ आहे. चित्त स्थिर नसेल तर कठोर परिश्रम करणे कठीण होईल.
मीन – पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आज तुम्हाला सापडतील. मात्र सहकारी आणि भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पैसे कमवण्याचा कोणता मार्ग आपण निवडतो, याकडे विशेष लक्ष द्या. कोणत्याही स्पर्धेत विजय आणि पराभव हे दोन्ही असतात, याच मानसिकतेने पुढे गेले पाहिजे.
दिनविशेष
मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक छोटा गंधर्व
टीम अवांतर
मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या छोटा गंधर्व यांचा जन्म 10 मार्च 1918 रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळे या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बालमोहन संगीत मंडळी’चे मालक दामूअण्णा जोशी हे गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली. त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी सौदागर आणि त्यांचा धाकटा भाऊ पितांबर यांना आपल्या मंडळीत आणले. संस्थेच्या प्राणप्रतिष्ठा या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका वयाच्या 10 व्या वर्षी मिळाली आणि ती देखील नायिकेची.
त्यांच्या गंधर्वतुल्य आवाजामुळे दामूअण्णांनी आपल्या संस्थेतर्फे होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत सौदागरांचा उल्लेख ‘छोटा गंधर्व’ असा करण्यास सुरुवात केली आणि नंतर हेच नाव रूढ झाले. ‘बालमोहन’च्या अन्य काही नाटकांत कामे केल्यानंतर, या संस्थेने सादर केलेल्या संशयकल्लोळ या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली.
Bookshelf : बालकाण्ड… पूर्वग्रह, गृहितके गळून पडतातहेही वाचा –
आचार्य अत्र्यांचे पहिले नाटक साष्टांग नमस्कार हे बालमोहनने 1933 साली रंगभूमीवर आणले. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या नाटकात सौदागरांनी नायिकेची -त्रिपुरीची- भूमिका केली. त्यानंतर ‘घराबाहेर’ या अत्रेकृत नाटकातील पद्मनाभाच्या भूमिकेपासून सौदागर यांनी स्त्रीभूमिका करणे सोडून देऊन नायकाच्या भूमिका करावयास आरंभ केला. साष्टांग नमस्कार, घराबाहेर यानंतर भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, उद्याचा संसार, वंदे मातरम्, मी उभा आहे अशी नाटके ‘बालमोहन’ने रंगभूमीवर आणली. यामुळे संस्थेला आर्थिक लाभाबरोबरच जी कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळाली, ती मिळविण्यात सौदागरांचा वाटा मोठा होता.
कला-विकास या नव्या संस्थेकडून फुलपाखरे, मैलाचा दगड, देवमाणूस, विजय ही नाटके सादर केली जाऊ लागली. त्यांतील मुख्य भूमिकांची आणि संगीताची बाजूही सौदागर यांनी सांभाळली. या संस्थेच्या नाटकांची पदेही सौदागर स्वत: लिहू लागले. त्यांच्या असामान्य गानकौशल्यामुळे ‘स्वरराज छोटा गंधर्व’ हे नामाभिधानही त्यांना लाभले. ‘गुनरंग’ या नावाने त्यांनी बंदिशी लिहिल्या. मुंबईत 1980 साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला. 31 डिसेंबर 1997 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.


