दर्शन कुलकर्णी
आज भारतीय सौर : 08 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 29 जून 2025, वार : रविवारी, तिथि : चतुर्थी 09:14, नक्षत्र : आश्लेषा 06:33
योग : वज्र 17:57, करण : बव 21:12
सूर्य : मिथुन, चंद्र : कर्क 06:33, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 9:19
पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ख्यातनाम कथा-कादंबरीकार दिगंबर मोकाशी
ख्यातनाम मराठी कथा-कादंबरीकार दिगंबर मोकाशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1915 रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे झाला होता. लामणदिवा (1947) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर कथामोहिनी (1959), आमोद सुनासि आले (1960), वणवा (1965), चापलूस (1974), एक हजार गायी (1975), आदिकथा (1976), माऊली (1976) तसेच तू आणि मी (1977) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. विविध अनुभूतींतून माणूस शोधण्याचा, व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या लेखनाद्वारे केला आहे. रहस्यकथा, पिशाच्चकथा असे कथाप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. भावचित्रणातील हळुवारपणा आणि नाजुकपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम त्यांच्या अनेक कथांतून आढळतो. स्थलयात्रा (1958), पुरूषास शंभर गुन्हे माफ (1971), देव चालले (1961), आनंद ओवरी (1974) आणि वात्स्यायन (1978) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. विख्यात अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या फॉर व्हूम द बेल टोल्स या प्रसिद्ध कादंबरीचा घणघणतो घंटानाद (1965) हा अनुवाद उल्लेखनीय आहे. संध्याकाळचे पुणे (१९८०) हे त्यांचे अखेरचे पुस्तक. मोकाशी यांनी संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रूपे दिसली, त्यांचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी ह्या पुस्तकात घडविले आहे. 29 जून 1981 रोजी पुण्यातच त्यांचे निधन झाले.
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आशुतोष मुखर्जी
न्यायशास्त्रज्ञ, बॅरिस्टर आणि गणितज्ञ आशुतोष मुखर्जी यांचा जन्म 29 जून 1864 रोजी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे झाला. कलकत्ता विद्यापीठाने घेतलेल्या गणित आणि भौतिकशास्त्रात दुहेरी पदव्युत्तर पदवी मिळविणारे पहिले विद्यार्थी होते. लॉ ऑफ परपेच्युइटीज हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. पाली, फ्रेंच, रशियन इत्यादी भाषाही त्यांना अवगत होत्या. आशुतोष मुखर्जी हे राजकारणापासून अलिप्त होते; मात्र 1899 मध्ये बंगाल विधान परिषदेत त्यांची सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. तर, ते 1904मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर 1920मध्ये मुख्य न्यायाधीश झाले. आशुतोष यांनी गणित विषयात संशोधन केले. या विषयातील संशोधनात अंतर्भूत असलेल्या प्रमेयांचा केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला होता. 1904 – 1918 आणि 1921-1923 या काळात कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. ब्रिटिश सरकारने त्यांना 1907 मध्ये C. S. I. आणि 1911 मध्ये ‘Knight’ ह्या पदव्या देऊन त्यांचा गौरव केला. आशुतोष मुखर्जी यांचे पाटणा येथे 25 मे 1924 रोजी निधन झाले.