दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 25 ऑक्टोबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 03 कार्तिक शके 1947; तिथि : चतुर्थी 27.47; नक्षत्र : अनुराधा 07:50
- योग : शोभन अहोरात्र; करण : वणिज 14:34
- सूर्य : तुळ; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:35; सूर्यास्त : 18:10
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
विनायक चतुर्थी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – विरोधक तुमच्यासाठी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जातकांसमोर काही अडचणी निर्माण होऊ शकतात. संध्याकाळी पाहुण्यांचे अचानक आगमन झाल्यामुळे खर्च वाढेल. सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे.
वृषभ – आज नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. मात्र, जास्त कामाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कला आणि साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमासाठी पैसे खर्च करावे लागतील.
मिथुन – मिथुन राशीच्या जातकांना शनिवार हा शुभ दिवस असेल. सकाळपासूनच मूड चांगला राहील. बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा वापर केल्यास यश मिळेल. संततीकडूनही तुम्हाला समाधानकारक बातम्या मिळतील.
कर्क – आज नोकरी, व्यवसाय आणि राजकारणात प्रगती साधता येईल. कामाच्या ठिकाणी वडीलधाऱ्यांच्या सहकार्याने सर्व कामे सहज पूर्ण होतील. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. घरातील विवाहयोग्य संततीसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील.
सिंह – कौटुंबिक जीवनात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. या काळात धैर्य आणि संयम बाळगावा लागेल. कोणत्याही कामात घाई केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. अर्थात, तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगतीची मोठी शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात. भूतकाळात कोणाला उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – सुपर मार्केट अन् सुपर खरेदी!
कन्या – कन्या राशीच्या जातकांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील तणावाचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना सातत्याने कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबात मालमत्तेबाबत काही तणाव निर्माण होऊ शकतो. संध्याकाळी व्यवसायिकांना एखादे काम मिळेल, ज्याचे फायदे भविष्यात दिसतील.
तुळ – आजचा दिवस खूप शुभ असेल. आज बल आणि संपत्ती दोन्हीत वाढ होईल. या काळात न्यायालयीन प्रकरणे जिंकण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यशाच्या शिखरावर पोहोचाल. रिअल इस्टेट व्यवसायिकांना नफा होण्याची शक्यता आहे. असा एखादा नवीन प्रकल्प सुरू कराल ज्यामुळे समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.
वृश्चिक – समाजात प्रभाव वाढेल. नवीन व्यवसाय करारांचा लाभ होईल. तुमच्या बाजूने काही महत्त्वाच्या करारांना अंतिम रूप मिळेल, अशी अपेक्षा आहे. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना विरोधकांकडून आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मात्र आज शत्रू कमकुवत असेल.
धनु – नवीन खर्च अचानक समोर येतील, ज्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. या काळात तुमच्यावर खोटे आरोप देखील केले जाण्याची शक्यता आहे. राग नियंत्रित केला तर व्यवसायात नफा होईल. संध्याकाळ किंवा रात्री अचानक प्रवासाला जावे लागेल, म्हणून विशेष सावधगिरी बाळगा.
मकर – आजचा दिवस सकारात्मक असेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क निर्माण होतील. या काळात शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती होईल. समाजात आदर मिळेल. जर सिंह राशीच्या व्यक्तीकडून तुमच्यासमोर एखादा प्रस्ताव ठेवला गेला तर तो नाकारा.
कुंभ – आज थोडे सावध राहण्याची गरज आहे. चंद्र वृश्चिक राशीतून दहाव्या घरात भ्रमण करत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जास्त खर्चामुळे आज एखाद्या वेळी पैसे उधार घ्यावे लागू शकतात. तुमच्या कार्यक्षमतेने इतरांना प्रभावित कराल. संध्याकाळी एखादे विशेष काम पूर्ण केल्याने तुमचा उत्साह वाढेल.
हेही वाचा – कन्फेशन कॉल…
मीन – आज तुम्ही प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठराल. कुटुंबात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढेल. देव आणि गुरू यांच्यावरील भक्तीमुळे इच्छित कार्यांच्या यशातील अडथळे दूर होतील. रात्री तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
दिनविशेष
चित्रकार, शिल्पकार पाब्लो पिकासो
टीम अवांतर
विसाव्या शतकातील श्रेष्ठ स्पॅनिश कलावंत. चित्रकार, शिल्पकार, आरेख्यक कलावंत अशा विविध नात्यांनी ज्यांची कारकीर्द आधुनिक कलाक्षेत्रात संस्मरणीय ठरली आहे, अशा पाब्लो पिकासो यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1881 रोजी स्पेनमधील मॅलागा या गावी झाला. आधुनिक (मॉडर्न) कला म्हटली की, सामान्य रसिकाला एकदम पिकासो यांचेच नाव आठवते. इतके यश, इतकी कीर्ति तसेच वैयक्तिक जीवनातील इतक्या घडामोडींसह इतके समृद्ध जीवन क्वचितच कोणा कलावंताच्या वाट्याला आले असेल. झपाटलेपणाने विलक्षण मेहनत करून अनेकविध माध्यमांमध्ये पिकासो यांनी कलाकृती आणि कलावस्तू यांची इतकी प्रचंड निर्मिती करून ठेवली आहे की, तिचा एकंदर व्याप पाहून कोणीही चकित होईल. 1907 साली त्यांनी Les Demoiselles d’ Avignon हे चित्र रंगविले आणि त्यानंतर त्यांच्या यशाची चढती कमान सुरू झाली, ती अखेरपर्यत चढतीच राहिली. स्पेनमधील यादवीमध्ये नाझींनी विमान हल्ला करून उद्ध्वस्त केलेल्या शहराचा विषय घेऊन त्यांनी गेर्नीका हे भव्य चित्र रंगविले. युद्धावर प्रखर भाष्य करणारे हे चित्र स्पॅनिश सरकारने 1937 सालच्या पॅरिसमधील जागतिक महोत्सवात प्रदर्शित केले. तेथून त्यांची कीर्ति जगभर सामान्य रसिकांपर्यंत पसरली. यानंतरचे त्यांचे चित्रभाष्य म्हणजे 1951 साली कोरियातील हत्याकांडावर त्यांनी रंगविलेले मॅसॅकर इन कोरिया हे चित्र. 1952 मध्ये त्यांनी व्हॅलोरीस येथील चॅपलवर वॉर ॲण्ड पीस हे भव्य भित्तिचित्र दोन भागांत रंगवले तेव्हापासून ते शांतिमंदिर म्हणून संबोधले जाऊ लागले. यानंतर मात्र पिकासो यांनी चित्रांतून कधीही सामाजिक भाष्य केले नाही. आयुष्याच्या अखेरीस त्यांचा कलाविष्कार आदिमानवी गुणवत्तेने बहरून आला. पशू, पक्षी, घुबडे, विदूषक अशा विषयांमध्ये ते बुडून गेले. मिनोटॉर (नृवृषभ), सेंटॉर (हयग्रीव) या ग्रीक अलौकिक पौराणिक प्राण्यांमधील पाशवी शक्तीचा ठाव त्यांनी आपल्या रेखनांतून आणि शिल्पांतून घेतला. वयाच्या 92व्या वर्षी पिकासो यांचे फ्रान्समधील मॉगीन्स या गावी 8 एप्रिल 1973 रोजी हृदयविकाराने निधन झाले.


