दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 25 डिसेंबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 04 पौष शके 1947; तिथि : पंचमी 13:42; नक्षत्र : धनिष्ठा 08:17
- योग : वज्र 15:12; करण : कौलव 25:46
- सूर्य : धनु; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 07:07; सूर्यास्त : 18:06
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करताना काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील एखाद्याला आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. खर्च वाढतील आणि कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण येईल. त्यामुळे शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करा.
वृषभ – आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला असेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली जाईल, जी यशस्वी होऊ शकते. कामामुळे परदेशात जावे लागू शकते. जोडीदार आणि संततीसोबत घालवलेला कौटुंबिक वेळ चांगला जाईल.
मिथुन – आजचा दिवस आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असेल. एखादी नवीन नोकरीची संधी तुमच्याकडे चालून येईल. एखादा मित्र तुम्हाला मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी देऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. जोडीदार आणि संततीसह बाहेर फिरायला जाऊ शकता.
कर्क – आयुष्यात काही बदल करावे लागतील. कामाच्या वातावरणात बदल करणे तुमच्या हिताचे असेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी संपर्क साधल्याने रखडलेला प्रकल्प पुन्हा सुरू होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. मात्र कुटुंबातील एखाद्याला आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात.
सिंह – आज सावधानपूर्वक वागण्याचा दिवस आहे. प्रवासात असाल तर सामान आणि पैसे जपा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. एखादी मोठी ऑफर मिळाली तर त्याचा काळजीपूर्वक विचार करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांबद्दल जागरूक रहा. कौटुंबिक वादांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो.
कन्या – व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. यामुळे नफा होईल. आज मोठी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदार आणि संततीच्या हितासाठी एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.
तुळ – आज एखादा नवीन आणि मोठा प्रकल्प सुरू करण्याची योजना आखू शकता. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. कामातही मोठे यश मिळेल. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वाद टाळा, अन्यथा तुमचे काम वाया जाऊ शकते. घरातील एखाद्या सदस्याच्या आजारपणामुळे तुमचे आर्थिक बजेट प्रभावित होऊ शकते.
हेही वाचा – Japanese story : मला ‘शांती’ हवी!
वृश्चिक – आज मन अस्वस्थ असेल. आर्थिक स्तरावर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून फारशी साथ मिळणार नाही. व्यवसायात आर्थिक अडचणी येऊ शकतात. मालमत्तेबाबतचा कौटुंबिक वाद न्यायालयात जाऊ शकतो.
धनु – आज लांब प्रवासाला निघालात तर वाहन काळजीपूर्वक वापरा, कारण त्यामुळे एखादा लहानसा अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन उपक्रम सुरू केलात तर तुमच्या सहकाऱ्यांबद्दल आधी पूर्ण माहिती गोळा करा. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे शक्यतो टाळा. आज नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार होईल.
मकर – आज संततीच्या शिक्षणाची चिंता वाटू शकते. जोडीदार आणि संततीबाबत एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. स्वतःची काळजी घ्या. महत्त्वाच्या आर्थिक करारांसंदर्भात शांतपणे विचार करून निर्णय घ्या. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा.
कुंभ – तुम्ही जोडीदार आणि मुलांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. बऱ्याच काळानंतर आज कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. यामुळे सुरू असलेल्या कौटुंबिक वादांना आळा बसेल. कामाच्या ठिकाणी जोडीदाराकडूनही पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येईल. कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.
मीन – तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी मित्र आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. प्रवास करताना महत्त्वाचा ऐवज आणि पैसे जपून ठेवा. व्यवसायात नफा होऊ शकतो. पालकांचे आरोग्य बिघडू शकते. जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात. त्यामुळे शांत रहा.
दिनविशेष
हसवणाऱ्या चेहऱ्यामागचे कारुण्य चार्ली चॅप्लिन
टीम अवांतर
एकही शब्द न उच्चारता केवळ आपल्या अभिनयाने जगाला खळखळून हसायला लावणाऱ्या चार्ली चॅप्लिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडन येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन होतं. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारच हालाखीची होती. पोट भरण्यासाठी त्यांना वयाच्या नवव्या वर्षीच काम करावं लागलं. चार्ली यांच्या बालपणीच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. यानंतर त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली. परिणामी, वयाच्या 13 वर्षी चार्ली यांचं शिक्षणही सुटलं. लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केलेल्या चार्ली यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी एका अमेरिकन कंपनीसोबत करार केला आणि ते अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकेत त्यांची चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. 1918 पर्यंत ते जगातील अत्यंत लोकप्रिय चेहरा बनले होते.
हेही वाचा – शिक्षण सेवक वळला आपल्या मूळ व्यवसायाकडे अन्…
1914 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेकिंग अ लिव्हिंग’ हा मूकपट त्यांचा पहिला चित्रपट, तर 1921 मध्ये आलेली ‘द किड’ ही त्यांची पहिली फीचर फिल्म ठरली. चार्ली चॅपलिन यांनी आपल्या आयुष्यात दोन महायुद्ध पाहिली. ज्यावेळी जग युद्धाची झळ सोसत होत, त्यावेळी चार्ली चॅपलिन लोकांना हसवत होते. म्हणूनच “माझं दु:ख एखाद्याच्या हसण्याचं कारण असू शकतं. पण माझं हास्य कोणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये,” असे ते कायम म्हणत असतं. त्यानंतर चार्ली यांनी ‘अ वुमन ऑफ पॅरिस’, ‘द गोल्ड रश’, ‘द सर्कस’, ‘सिटी लाईट्स’, ‘मॉर्डन टाइम्स’ यासारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. हे चित्रपट आजही रसिकप्रिय आहेत. मात्र 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ या त्यांच्या चित्रपटाने फारच वाद निर्माण झाला. या सिनेमात चार्ली चॅप्लिन यांनी जर्मनीचा हुकुबमशाह ॲडॉल्फ हिटलर याची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोप झाला. इतकंच नाही तर एफबीआयकडून त्यांची चौकशीही झाली. या सगळ्या प्रकाराला कंटाळून चार्ली यांनी अमेरिकेला कायमचा रामराम केला आणि स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ब्रिटनची महाराणी यासारखे दिग्गजही चार्ली चॅपलिन यांचे चाहते होते. मात्र, स्वत: चार्ली महात्मा गांधी यांच्या कार्यामुळे अतिशय प्रभावित झाले होते. ते महात्मा गांधी यांचा नितांत आदर करत होते. 25 डिसेंबर 1977 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी चार्ली चॅपलिन यांचे झोपेतच निधन झाले. दोन महिन्यांनी त्यांची शवपेटी चोरीला गेल्याचे उघड झाले. चार्ली यांच्या कुटुंबीयांकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने ही चोरी करण्यात आली होती. नंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. भविष्यात अशी घटना परत घडू नये, यासाठी 6 फूट खोल कॉंक्रिटचे बांधकाम करून त्यांची शवपेटी दफन करण्यात आले.


