दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 24 डिसेंबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 03 पौष अग्रहायण शके 1947; तिथि : चतुर्थी 13:10; नक्षत्र : धनिष्ठा अहोरात्र
- योग : हर्षण 16:01; करण : बव 25:30
- सूर्य : धनु; चंद्र : मकर 19:45; सूर्योदय : 07:07; सूर्यास्त : 18:06
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवसाची सुरुवात थोडीशी दडपणाखाली झाली, असे वाटू शकते. एकाच वेळी मनात अनेक गोष्टी येतील, ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. कामात घाई करणे हानिकारक ठरेल, म्हणून काहीही करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, परंतु वाद जास्त वाढवू नका. संध्याकाळी गोष्टी शांत होतील आणि हलके वाटेल.
वृषभ – आजचा दिवस शांत आणि संतुलित असेल. दैनंदिन कामे तणावाविना पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्याशी संवाद साधल्याने सकारात्मक मूड येईल. क्षमतेनुसार खर्च करा आणि दिखाऊपणा टाळा. आरोग्य चांगले राहील, फक्त आळसाला वर्चस्व गाजवू देऊ नका.
मिथुन – संभाषण करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण समोरच्या व्यक्तीकडून तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. तसेच फोनद्वारे वाद घालणे टाळा. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी व्यग्र राहाल. एखादे जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते.
कर्क – दिवस मनासारखा जाणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीही तुमच्या भावना दुखवू शकतात. कामावर तुमचे कष्ट स्पष्ट दिसतील, परंतु प्रशंसा थोडी कमीच होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. विश्वासू व्यक्तीशी बोलल्याने तुम्हाला बरे वाटेल.
सिंह – आजचा दिवस अतिशय व्यग्र असू शकतो. कामात विविध अडथळे येऊ शकतात आणि त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा. इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका. संयमाने मोठी हानी टाळता येईल. संध्याकाळनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल.
कन्या – आज काम आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाढतील. कामात दिरंगाई केल्याने दबाव वाढू शकतो. कुटुंबात तुमच्या मतांची कदर केली जाईल. थोडासा थकवा किंवा जडपणा जाणवू शकतो, म्हणून आराम करा. दिवस तुलनेत कठीण असेल पण योग्य व्यवस्थापन केले तर काम सुरळीतपणे पूर्ण करता येईल.
तुळ – आजचा दिवस अनुकूल असेल. प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल, त्यामुळे मन आनंदी असेल. थोडाफार आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. फक्त कामावरच लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल. आरोग्य सामान्य राहील, परंतु जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर विश्रांती घेणे आवश्यक आहे. एकंदरीत, दिवस समाधानकारक राहील.
हेही वाचा – सखूबाई अन् आंब्याची कलमं…
वृश्चिक – आजचा दिवस चित्त विचलित होणारा आहे. काम करताना तुमचे मन भरकटेल. एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एखाद्या मित्राची किंवा ओळखीच्या व्यक्तीची मदत घ्यायला लागू शकते. आर्थिक जोखीम टाळा. संध्याकाळी ताण कमी होईल आणि तुमचा मूड सुधारेल.
धनु – आज मन द्विधा मन:स्थितीत असू शकते. एखाद्या निर्णयाबद्दल वारंवार विचार कराल. नातेसंबंधांमध्ये भावना दाबून ठेवण्यापेक्षा स्पष्टपणे बोलणे चांगले. आज काम करण्याची फारशी इच्छा वाटणार नाही. खर्च वाढण्याची शक्यता आहे, म्हणून सावधगिरी बाळगा. संध्याकाळी अनेक गोष्टींबद्दल स्पष्टता मिळेल.
मकर – आज, कठोर परिश्रम आणि जबाबदारी दोन्ही जास्त असतील. कामाचा ताण जाणवू शकतो, परंतु तुम्ही तो उत्तम प्रकारे हाताळाल. जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. रागात उच्चारलेले शब्द हानिकारक ठरू शकतात, म्हणून संयम बाळगा.
कुंभ – एखाद्या गोष्टीचा नव्याने विचार कराल, काहीतरी बदल करावासा वाटेल. जुन्या कामाचा किंवा रुटीनचा कंटाळा येऊ शकतो. एखादा मित्र किंवा ओळखीची व्यक्ती मदत करू शकेल. एखादी ट्रीप किंवा छोटी सहल आयोजित करू शकता. खर्च थोडा वाढेल, परंतु तो महत्त्वाच्या कामासाठी असेल.
मीन – आज मन शांत आणि स्थिर असेल. जास्त विचार करावासा वाटणार नाही. काम हळूहळू होईल, परंतु ते तणावमुक्त असेल. आनंदाचा एक छोटासा क्षण किंवा चांगली बातमी तुमचा दिवस सकारात्मक बनवेल. कौटुंबिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी व्हाल.
दिनविशेष
सदाबहार गायक मोहम्मद रफी
टीम अवांतर
भारतीय संगीताच्या सुवर्ण काळात आपल्या आवाजाने अवीट छाप सोडणारे सदाबहार गायक मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी अमृतसरच्या कोटला सुलतान सिंग येथे झाला. शेतीची किंवा शिक्षणाची आवड नाही, असे पाहून त्यांना त्यांच्या थोरल्या भावाकडे लाहोरला धाडण्यात आले. थोरल्या भावाने रफी यांचे गाण्याचे अंग लगेच हेरले आणि छोटे गुलाम अली खाँसाहेब, अब्दुल वहीद खाँसाहेब अशा उस्तादांकडून त्यांना गाणे शिकवण्याची व्यवस्था केली. पुढे रफी यांनी फिरोझ निझामी यांच्याकडे दोन वर्षे शागिर्दी केली. निझामी जेव्हा लाहोर नभोवाणी केंद्राचे संगीत-दिग्दर्शक झाले, तेव्हा त्यांनी रफी यांना नभोवाणीवर गायनाची संधी दिली. तर, एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायक के. एल. सेहगल यांनी वीज गेल्याने स्टेजवर गाणे म्हणण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिथे उपस्थित 13 वर्षीय मोहम्मद रफी यांना गाणे गाण्याची संधी मिळाली होती. त्यांचे गाणे ऐकून हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदर यांनी गुलबलोच या पंजाबी चित्रपटात त्यांना दोन गीते गाण्याची संधी दिली.
हेही वाचा – Education : शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक हवा
दिग्दर्शक नाझीर यांच्या आग्रहामुळे रफी मुंबईच्या चित्रपटासृष्टीत आले आणि त्यांनी नाझीर यांच्या लैला मजनू या चित्रपटात छोटी भूमिकाही केली. तथापि रफी यांच्या गळ्याची तसेच गायकीची ओळख असणारे संगीतकार त्यावेळी मुंबईत नव्हते. योगायोगाने लाहोरचे संगीतकार श्यामसुंदर त्याचवेळी मुंबईत आले आणि त्यांनी रफी यांना गाँव की गोरी या पहिल्याच हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. तरीही त्यांचे मुंबईत नीट बस्तान बसले नाही. सुदैवाने त्यांचे गुरू फिरोझ निझामी हे त्याच वेळेस जुगनू या चित्रपटाचे संगीतकार म्हणून मुंबईत आले आणि साहजिकच रफी यांनी त्या चित्रपटात पार्श्वगायक म्हणून संधी मिळाली. त्या चित्रपटातील ‘यहाँ बदला वफा का’ या नूरजहाँबरोबर गायलेल्या द्वंद्वगीतामुळे रफी यांची खास पंजाबी ढंगाची गायकी एकदम लोकप्रिय झाली. तर, प्यार की जीत या चित्रपटातील ‘इस दिल के टुकडे हजार हुए’ या हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यामुळे रफी यांना अधिक प्रसिद्धी मिळाली आणि ती पुढे सतत वाढतच गेली. 36 वर्षांच्या कालावधीत मोहम्मद रफी यांनी पाच हजार हिंदी गाण्यांसह भजन, रागदारी, गजल, कवाली अशा निरनिराळ्या गीतप्रकारांमध्ये सुमारे 25 हजारांवर गाणी आपल्या दर्दभऱ्या, मुलायम आवाजात गाऊन प्रथम श्रेणीचा पार्श्वगायक म्हणून कीर्ती मिळविली. विशेष म्हणजे, त्यांनी गायलेली सगळी मराठी गाणी त्यांनी संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडे गायली.
1948 मध्ये त्यांनी गायलेले ‘सुनो ऐ दुनिया वालों बापूजी की अमर कहानी’ हे गाणे प्रचंड गाजले. हे गाणे ऐकून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या निवासस्थानी रफी यांना गाण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. 1960 चे दशक हे रफी यांच्यासाठी खास होते, त्याच वर्षी त्यांना ‘चौदहवी का चाँद’ च्या शीर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये रफी यांना 23 वेळा फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. त्यापैकी 6 वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. 1967 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. अशा या महान गायकाचे 31 जुलै 1980 रोजी निधन झाले.


