दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 21 सप्टेंबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 30 भाद्रपद शके 1947; तिथि : अमावास्या 25:23; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 09:31
- योग : शुभ 19:52; करण : चतुष्पाद 12:46
- सूर्य : कन्या; चंद्र : सिंह 15:57; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:36
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
सर्वपित्री दर्श अमावास्या
अमावास्या श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – दांडूमारम्मा मंदिर… वर्षातून फक्त नवरात्रीतच होते देवीची पूजा!
दिनविशेष
चतुरस्त्र गायक, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी
टीम अवांतर
चतुरस्त्र गायक, संगीतकार आणि संगीतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1929 रोजी गोव्यातील मंगेशी येथे झाला. त्यांचे मूळ नाव गणेश तर आडनाव नवाथे. मात्र मंगेशी देवस्थानातील पूजा आणि अभिषेक सांगणारे भिकाजी तथा बाळूबुवा यांचे पुत्र म्हणून त्यांचे आडनाव अभिषेकी झाले. लहानपणी वडिलांना कीर्तनात साथ केल्याने स्वर, ताल, लय आणि उच्चार यांची त्यांना चांगली जाण आली. संगीताचे सुरुवातीचे धडे वडिलांनीच जितेंद्र यांना दिले. शालेय शिक्षणासाठी 1943 साली ते पुण्यात आले. पुण्यात नरहरबुवा पाटणकर आणि यशवंतराव मराठे यांच्याकडे ते गाणे शिकले. तेथून ते बेळगावला गेले. तिथे पेटीवादक विठ्ठलराव कोरगावकर यांच्याकडून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. 1952 साली मुंबई आकाशवाणी केंद्रात कोंकणी विभागात संगीत संयोजक म्हणून ते रूजू झाले. नोकरी करीत असतानाच उस्ताद अझमत हुसेन खाँसाहेब यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन घेण्याची संधी त्यांना मिळाली. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी 1959 साली भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ज्येष्ठ गायक जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्याकडून त्यांना दीर्घकाळ तालीम मिळाली. याबरोबरच अभिषेकी यांनी निवृ्त्तीबुवा सरनाईक, रत्नाकर पै, अझिझुद्दीन खाँ, मास्टर नवरंग, केसरबाई बांदोडकर इत्यादींकडून मार्गदर्शन घेऊन आपली गायकी अधिक समृद्ध केली. त्यानंतर त्यांनी गुलुभाई जसदनवालांकडून जयपूर घराण्याच्या गायकीची काही वैशिष्ट्ये आत्मसात केली. विविधांगी व्यासंगामुळे आपली स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. गायनासोबतच नाट्यसंगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी मोलाची असून त्यामुळे मराठी नाट्यसंगीताला एक वेगळेच वळण मिळाले. त्यांनी मत्स्यगंधा, ययाती, देवयानी, कट्यार काळजात घुसली, हे बंध रेशमाचे, धाडिला राम तिने का वनी, लेकुरे उदंड जाहली अशा सतरा नाटकांतील पदांना सुरेल चाली लावल्या. होमी भाभा संशोधन केंद्राकडून ‘लोकनाट्यातील संगीत’ या विषयावरील संशोधनासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याद्वारे त्यांनी प्रदेशपरत्वे कुडियाट्टम, मोहिनीआट्टम्, कथकळी, माच, नौटंकी, दशावतार इत्यादी लोकनाट्यातील संगीताचा अभ्यास केला. त्यांचे पुत्र शौनक अभिषेकी यांच्यासह प्रभाकर कारेकर, राजा काळे, अजित कडकडे, शुभा मुद्गल, आशा खाडीलकर, सुधाकर देवळे, देवकी पंडित, अरुण आपटे, विनोद डिग्रजकर, हेमंत पेंडसे, मोहन दरेकर, रघुनाथ फडके, विजय कोपरकर, समीर दुबळे, महेश काळे यासारखे शिष्य त्यांची गानपरंपरा पुढे नेत आहेत. चिपळूण येथे 1995 साली झालेल्या 76 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. याशिवाय अनेक मानसन्मान त्यांना लाभले. त्यामध्ये होमी भाभा पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, पद्मश्री सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गोमंतक मराठी अकादमी पुरस्कार, सूरश्री केसरबाई केरकर पुरस्कार, मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार इत्यादींचा समावेश होतो. 7 नोव्हेंबर 1998 रोजी पुण्यात अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – ‘त्या’ राजस्थानी महिलांची ‘पॉवर बँक’!