दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 31 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 21 जून 2025, वार : शनिवार, तिथि : दशमी 07:18, नक्षत्र : अश्विनी 19:50
योग : अतिगंड 20:28, करण : बव 17:55
सूर्य : मिथुन, चंद्र : मेष, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
दक्षिणायन प्रारंभ, योगिनी स्मार्त एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – वाढत्या खर्चावर लक्ष केंद्रित करा. हातात उपलब्ध असणारा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन काम करा. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने गोंधळ वाढेल.
वृषभ – बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. मात्र संततीच्या मनमानी वर्तनामुळे थोडे अस्वस्थ वाटेल. दैनंदिन दिनचर्या सुधारण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत काही विशेष खरेदीसाठी जाण्याची योजना आखली जाईल.
मिथुन – कल्याणकारी उपक्रमांमधला सहभाग वाढेल, मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळा. अचानक धनलाभाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी मोठ्या मनाने सहकाऱ्यांच्या छोट्या चुका माफ करा.
कर्क – कोणत्याही कामाला सुरूवात करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस. त्यात हमखास यशप्राप्ती होईल. नोकरदार वर्गाने कंपनीचे धोरण आणि नियमांकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक. एखाद्या नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते.
सिंह – भागीदारीत एखादे काम केल्यास त्याचा फायदा नक्कीच होईल. नोकरदार मंडळींना मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल, ज्यामुळे आत्मविश्वास आणखी वाढेल. मालमत्तेशी संबंधित कराराला अंतिम रूप मिळेल, ज्याचा भविष्यात मोठा लाभ होईल.
कन्या – सन्मान मिळवून देणारा दिवस असेल. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. काही कौटुंबिक प्रश्न शांतपणे हाताळावा लागेल. परिस्थिती प्रतिकूल असली तरी धीर सोडू नका. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
तुळ – मेहनतीचा दिवस असेल. अनोळखी व्यक्तीकडून कोणताही सल्ला घेऊ नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात, मात्र ते मनाजोगे नसल्याने मन अस्वस्थ होईल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
वृश्चिक – आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. एखाद्या कामाला होत असलेल्या विलंबामुळे नाराज असाल तर, ते आज पूर्ण होऊ शकते. मात्र मनात स्पर्धेची भावना उफाळून येईल. एखाद्या सरकारी योजनेचा व्यावसायिकांना लाभ मिळेल. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.
धनु – मान-सन्मानात वाढ होईल. मात्र कोणतीही महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नका. राजकारणात चांगली पकड असेल. सहकारी देखील तुमच्या कामात पाठिंबा देतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.
मकर – आवश्यक कामांवर पूर्ण लक्ष द्या. घाईगडबडीत एखादे काम बिघडू शकते. व्यवसायिकांनी आपल्या भागीदाराचे विचारही लक्षात घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. जवळच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता. आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम दिवस.
कुंभ – एखाद्या शुभ कार्यासाठीची तयारी सुरू होऊ शकते. मात्र आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. जबाबदाऱ्या टाळू नका. कामात पालकांचा पाठिंबा मिळेल. पदोन्नतीची संधी मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
मीन – अत्यंत हुशारीने निर्णय घ्या. ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामे केली तरच, ती वेळेत पूर्ण करू शकाल. अनावश्यकपणे इतरांवर शेरेबाजी टाळा, अन्यथा कायदेशीर कचाट्यात सापडाल. खाणेपिणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
दिनविशेष
द्वारकानाथ माधव पितळे तथा नाथमाधव
द्वारकानाथ माधव पितळे ऊर्फ कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म 3 एप्रिल 1928 रोजी मुंबईत झाला. ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून नाथमाधव यांची ओळख आहे. प्रेमवेडा ही त्यांची पहिली कादंबरी १९०८ मध्ये प्रकाशित झाली. तर, ‘सावळ्या तांडेल’ ही कादंबरी विशेष गाजली. याच कादंबरीतील नायकावरून पी. सावळाराम या कवीला ‘सावळाराम’ हे नाव पडले आहे. प्रथम प्रणयप्रधान कादंबऱ्या लिहिणाऱ्या नाथमाधवांनी पुढे बोधपर, नीतीपर कादंबऱ्याही लिहिल्या. सामाजिक आणि ऐतिहासिक मिळून तिसांहून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. मराठ्यांच्या इतिहासावर त्यांनी सलग सात कादंबऱ्या लिहिल्या. मराठी राज्याच्या उदयापासून ते शाहू महाराजांच्या सुटकेपर्यंतचा कालखंड हा या कादंबऱ्यांचा विषय आहे. 21 जून 1928 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
श्रेष्ठ कवी, कथाकार सदानंद रेगे
श्रेष्ठ मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद शांताराम रेगे यांचा जन्म 21 जून 1923 रोजी रत्नागिरी जिल्हातील राजापूरमध्ये झाला. एम. ए.पर्यंत शिक्षण झालेले सदानंद रेगे एक वर्ष जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्येही होते. पश्चिम रेल्वेत त्यांनी दीर्घकाळ नोकरी केली. पुढे काही काळ ते मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक होते. कवी आणि कथाकार या दोन्ही नात्यांनी त्यांनी मराठी साहित्यात वैशिष्ट्य पूर्ण स्थान मिळविले. अक्षरवेल (1957), गंधर्व (1960), देवापुढचा दिवा (1965), वेड्या कविता (1980), ब्रांकुशीचा पक्षी (1980) हे त्यांचे महत्वाचे कवितासंग्रह. जीवनाची वस्त्रे (1951), काळोखाची पिसे (1954), चांदणे (1959), चंद्र सावली कोरतो (1963) आणि मासा व इतर विलक्षण कथा (1965) हे त्यांचे कथासंग्रह होत. मुंबईमध्ये 1981 साली आयोजित समांतर मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांचे 21 सप्टेंबर 1982 रोजी निधन झाले.