दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 17 सप्टेंबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 26 भाद्रपद शके 1947; तिथि : एकादशी 23:39; नक्षत्र : पुष्य अहोरात्र
- योग : परिघ 22:54; करण : बव 11:57
- सूर्य : कन्या; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:39
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
इंदिरा एकादशी
एकादशी श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायाच्या बाबतीत जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे अनेक प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तो निर्णय काळजीपूर्वक घ्या, अन्यथा तुम्हाला कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात. कुटुंबात जोडीदाराकडून उत्कृष्ट सहकार्य मिळेल.
वृषभ – कामाच्या निमित्ताने आज खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. या काळात स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी निर्णय क्षमतेचा फायदा होईल, महत्त्वाची कामे बराच काळ प्रलंबित राहिली असतील तर ती देखील पूर्ण होतील. काही कामांत बदल करण्याची आवश्यकता असू शकते, ज्यामुळे भविष्यात बरेच फायदे मिळतील.
मिथुन – अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यापूर्वी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात अचानक नफा मिळू शकतो, त्यामुळे आर्थिक ताण काहीसा कमी होईल. संततीकडून काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस सामान्य राहील.
कर्क – तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि व्यवसायात उत्तम प्रगती साधता येईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा पराभव होईल आणि तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. पालकांकडूनही तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळतील. आईकडून विशेष सहकार्य मिळू शकेल आणि संततीवरील विश्वास वाढेल.
सिंह – दिवस संमिश्र राहील. काही कारणांमुळे मन अस्वस्थ असेल, त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत भावनिकदृष्ट्या कोणताही निर्णय घेणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी गोड शब्द वापरणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा दबाव थोडा जास्त असू शकतो.
हेही वाचा – म्हातारपण… जे होतं ते चांगल्यासाठीच!
कन्या – कामाच्या ठिकाणी कठीण कामे चिकाटीने पूर्ण करू शकाल. यामुळे तुमचे सर्व महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत काही अनावश्यक खर्च समोर येऊ शकतात. अशा परिस्थितीत बजेट आखून त्यानुसार खर्च करणे चांगले राहील. त्याचबरोबर व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणही शांत असेल.
तुळ – आजचा दिवस फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. व्यवसायात गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही सुधारेल. दुसरीकडे, नवीन कामात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, भविष्यात नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजात आदर वाढेल.
वृश्चिक – एखाद्या कामाबद्दल किंवा प्रकरणाबद्दल चिंतित असाल. व्यवसायातील प्रयत्न आणखी वाढवावे लागतील. कामाच्या ठिकाणी विरोधक काही योजना आखू शकतात. परंतु संयम आणि चिकाटीमुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही बराच काळ कोणत्याही कोर्टाच्या केसचा सामना करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळू शकते.
धनु – आजचा दिवस चांगला असेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्याचबरोबर आर्थिक बाबतीतही लाभ संभवतो. व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील आणि तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल आणि त्यांचे ज्ञान वाढेल.
मकर – मौल्यवान वस्तूंचा लाभ होऊ शकतो, पण त्याच्या जोडीला अनावश्यक खर्चही होईल. व्यवसायात कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यावेळी नवीन कामात गुंतवणूक केली तर, भविष्यात नक्कीच नफा मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.
कुंभ – कामाच्या ठिकाणी एखादी नवीन योजना बनवू शकता. काही नवीन प्रकल्पांवर काम करण्याचा विचार देखील करू शकता. व्यावसायिक सहलींमधून फायदा होऊ शकेल. आर्थिक बाबींमध्ये गरजेनुसार पैसे खर्च करणे आवश्यक असेल, अन्यथा भविष्यात अडचणी वाढू शकतात. सांसारिक सुखांची साधन वाढतील. कौटुंबिक वातावरण देखील शांत असेल.
हेही वाचा – पावसाची रिपरिप अन् रिक्षावाला…
मीन – समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल आणि तुम्ही आनंदी राहाल. नोकरदार जातकांसाठी आजचा दिवस कामातील व्यग्रतेत जाईल. मात्र वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. कुटुंबात संततीशी संबंधित वाद संपतील. संध्याकाळी प्रियजनांसोबत वेळ घालवू शकाल.
दिनविशेष
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
टीम अवांतर
‘प्रबोधनकार ठाकरे’ या नावाने महाराष्ट्राला परिचित असलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि इतिहासकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (आता रायगड) पनवेल येथे झाला. इंग्रजी-मराठी भाषांवर प्रभुत्व संपादन करून त्यातील उत्तोमोत्तम ग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. काही काळ सरकारी नोकरी केल्यानंतर टंकलेखन, छायाचित्रकार, तैलचित्रकार, विमा कंपनीचे प्रचारक, नाटक कंपनीचे चालक असे अनेक उद्योगही त्यांनी केले. मात्र समाजसुधारणेच्या आणि समतेच्या तळमळीतून केलेली झुंजार पत्रकारीता, त्याचबरोबर प्रभावी वक्तृत्व आणि इतिहाससंशोधन ही त्यांच्या कर्तृत्वाची ठळक वैशिष्ट्ये होत. अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध यासारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी आणि लेखणी राबविली. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन यासारखी नियतकालिके त्यांनी काढली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी भाग घेतला, त्यासाठी तुरुंगवास भोगला. अभिनिवेशयुक्त पण अत्यंत सडेतोड, ठाशीव आणि प्रखर भाषा हे त्यांच्या वाणी-लेखणीचे वैशिष्ट्य होते. कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड हे त्यांची सामाजसुधारणाविषयक उल्लेखनीय पुस्तके. खरा ब्राह्मण, विधिनिषेध आणि टाकलेले पोर या त्यांच्या नाटकांतूनही त्यांच्यातील समाजसुधारक प्रकर्षाने व्यक्त झालेला आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांना फार मोठा अभिमान होता. साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांच्या पदच्युतीचा, इंग्रजांनी त्यांच्या केलेल्या अवहेलनेचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट लंडनपर्यंत गेलेला त्यांचा निष्ठावंत सेवक रंगो बापूजी यांच्या त्यागाचा साद्यंत इतिहास ‘प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी’ हा ग्रंथ लिहून महाराष्ट्रापुढे प्रथम त्यांनी मांडला. ग्रामण्याचा साद्यंत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोदंडाचा टणत्कार आणि रायगड ही त्यांची इतिहासविषयक अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. याशिवाय संत रामदास, संत गाडगे महाराज आणि पंडिता रमाबाई यांची चरित्रे त्यांनी लिहिली. संत रामदासांचे चरित्र तर इंग्रजीत लिहिलेले आहे. 20 नोव्हेंबर 1973 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.