दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 17 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 25 आश्विन शके 1947; तिथि : एकादशी 11:11; नक्षत्र : मघा 13:56
- योग : शुक्ल 25:47; करण : कौलव 23:41
- सूर्य : कन्या; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:16
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वसुबारस / गोवत्स द्वादशी
रमा एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस यश आणि उत्तम कामगिरीने भरलेला असेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. काही प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल, मात्र त्यामुळे अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. आज आत्मविश्वास उंचावलेला असेल.
वृषभ – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम बाळगावा लागेल; घाईघाईने निर्णय घेणे महागात पडू शकते. नोकरदार जातक आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. काही आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जास्त काळजी घ्या. आरोग्य देखील बिघडण्याची शक्यता आहे.
मिथुन – कला आणि साहित्याकडे कल वाढेल. तुमच्या कल्पनांनी इतर प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, इतरांच्या जाळ्यात अडकू नका. लांबचा प्रवास करत असाल, तर काळजीपूर्वक गाडी चालवा. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना लक्षणीय यश मिळेल.
कर्क – आज एखाद्या विषयावर कुटुंबात चर्चा होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी मदत मिळेल. आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात असे काहीतरी नवीन सापडेल ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात मोठी उंची गाठाल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नही वाढेल, परंतु खर्चही वाढतील.
सिंह – आजचा दिवस यश मिळण्याचा आणि इच्छापूर्तीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील, ज्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र, बोलणे आणि राग नियंत्रित करावा लागेल. वैवाहिक नातेसंबंधांमध्ये खूप प्रामाणिक आणि संयमी राहावे लागेल.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : मुलांची सुरक्षितता
कन्या – कामाच्या ठिकाणी खूप धावपळ असेल. मात्र आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मोठा खर्च सहन करावा लागू शकतो. बेरोजगार जातकांना आज नोकरीच्या संधी चालून येतील. विवाहोत्सुकांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही मतभेद उद्भवू शकतात, संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे संयमाने वागा. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
तुळ – दिवस आत्मविश्वास आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेण्याची आवश्यकता आहे. करिअर आणि व्यवसायात सामान्य दिवस असेल, परंतु कामाशी संबंधित धावपळ आणि दगदग कायम असेल. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून पाठिंबा मिळेल.
वृश्चिक – आर्थिक स्थिती मजबूत असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल. नवीन कामांमध्ये आवड वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात काही चांगल्या संधी येऊ शकतात, ज्यापैकी काही खूप फायदेशीर ठरतील. मात्र त्याचवेळी आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आज कुटुंबात शांती आणि आनंद कायम राहील.
धनु – दिवस अनुकूल असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते, कारण यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. अनावश्यक ताण टाळा. नोकरी करणाऱ्यांना अनेक स्रोतांकडून चांगल्या ऑफर मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करारांना आज अंतिम रूप मिळू शकेल, ज्यामुळे प्रगतीच्या संधी वाढतील.
मकर – आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. फक्त धीर धरावा लागेल. आज एखाद्या कामामुळे आदर आणि सन्मान मिळू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणाचा तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. नातेसंबंध गोड राहतील.
कुंभ – आज ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढताना दिसतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. गुंतवणुकीचे निर्णय खूप काळजीपूर्वक घ्या. बऱ्याच वर्षांनी एखादा जुना मित्र भेटू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जोडीदाराकडून एखादी भेट मिळू शकते.
हेही वाचा – हेरोडेस अटिकस येथील संगीतमय रात्र
मीन – आज जुन्या वादावर समाधानकारक तोडगा निघू शकेल. सर्जनशील कामात तुमची आवड वाढेल. कामाच्या निमित्ताने अनेक लोकांना भेटाल. मात्र आज बोलणे आणि राग नियंत्रित ठेवावा लागेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरदार जातकांना आणखी चांगल्या ऑफर मिळू शकतात. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
दिनविशेष
अव्वल मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर
टीम अवांतर
अव्वल मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबई येथे झाला. संस्कृत आणि इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी सिद्ध केले. या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही 1881 साली प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी ही गद्य टीका त्यांनी लिहिली. या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे ‘1846 पर्यंतचे आत्मचरित्र’ याचेही एक वेगळेच महत्त्व आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. याशिवाय त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. याशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक, इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म आणि शिशुबोध अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी यांच्या यमुनापर्यटन या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या ‘अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग’ या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता होती. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले. मुंबई येथे 17 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांचे निधन झाले.


