दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 16 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 24 आश्विन शके 1947; तिथि : दशमी 10:35; नक्षत्र : आश्लेषा 12:41
- योग : शुभ 26:09; करण : बव 22:49
- सूर्य : कन्या; चंद्र : कर्क 12:41; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:16
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – काम आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. दुपारपर्यंत पैसे कमावण्यात व्यग्र रहाल. पैसे मिळतील, पण अनावश्यक खर्चही होऊ शकतो. हातपाय दुखणे, थकवा जाणवणे आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कमी मेहनतीत जास्त पैसे मिळवण्याच्या प्रलोभनामुळे विश्वासघात होऊ शकतो, म्हणून लोभ टाळा.
वृषभ – काही मनोरंजक घटना घडतील, ज्यामुळे आनंदी व्हाल. दुपारपर्यंत नफा आणि नवीन संधी असा दुहेरी लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून अशी बातमी मिळू शकते जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. घरात वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन – नफ्याच्या संधी मिळतील, मात्र त्याआधी मानसिक ताणतणावांवर मात करावी लागेल. कामात प्रगती होईल. हुशारीने निर्णय घ्या. घरगुती खर्च जास्त असेल. संध्याकाळपर्यंत आर्थिक समस्या सोडवल्या जाऊ शकतात. काही कारणास्तव कुटुंबात चिंतेचे वातावरण असेल.
कर्क – दिवसाची सुरुवात गोंधळाने होईल, परंतु दुपारनंतर परिस्थिती आटोक्यात येईल. पैशाचा ओघ सामान्य राहील. एखाद्या खास व्यक्तीकडून विशिष्ट कामासाठी पाठबळ मिळेल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विद्यार्थी प्रगती करतील. मात्र, आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज असू शकते.
सिंह – संयम आणि शांतता बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे राग आणि संघर्ष टाळा. घरी तसेच कामाच्या ठिकाणी मानसिक ताण जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
कन्या – दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. कठोर परिश्रमांचा भविष्यात फायदा होईल. कामात मात्र सावधगिरी बाळगा, कारण नफ्यापेक्षा तोटा होण्याची शक्यता जास्त आहे. हे लक्षात घेऊन आर्थिक निर्णय सुज्ञपणे घ्या. कौटुंबिक स्तरावर वातावरण वरवर सामान्य राहील, मात्र जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
तुळ – दिवस उत्साहजनक असेल. नशिबाची कृपा असेल. सर्जनशीलतेमध्ये वाढ होईल. कला, फॅशन आणि सौंदर्य या क्षेत्रातील जातकांना फायदा होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि व्यावहारिकतेने वागा. दुपारी काही फायदेशीर संधी निर्माण होतील. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
वृश्चिक – दिवस लाभकारक आहे. मात्र बोलण्यावर संयम ठेवा. दुपारपूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करा. सरकारी कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. मित्र आणि सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
धनु – दुपारपर्यंत कोणतेही आर्थिक निर्णय घेणे टाळा. मनात प्रबळ नकारात्मकता राहील. त्यामुळे कामात भरपूर चुका होतील आणि निष्काळजी असल्याचा आरोप होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. कुटुंब आणि मित्र योग्य सल्ला देतील, म्हणून त्यांचे बोलणे काळजीपूर्वक ऐका. ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या.
मकर – सामाजिक स्तरावर आदर मिळेल, परंतु आर्थिक अडचणी कायम राहतील. वेळेवर कामे पूर्ण करूनही, अपेक्षित यश मिळणार नाही. वडीलधारी मंडळींचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याच्या थोड्या कुरबुरी असतील. पाहुणे येण्याची शक्यता आहे.
कुंभ – दिवस सर्वसाधारणपणे चांगला जाईल. आजारी जातकांच्या स्थितीत सुधारणा होईल. व्यवसायात पैसे अडकून राहतील, त्यामुळे व्यवहार करताना थोडीशी सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळेल. विद्यार्थी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतील.
हेही वाचा – …हलगर्जीपणा नडला!
मीन – आज दिनक्रम पूर्णपणे बदलून जाईल. सकाळी सुस्ती आणि थकवा वाटेल. प्रत्येक कामात उशीर झाल्यामुळे निराश व्हाल. दुपारनंतर मात्र कामात यश मिळेल. एखादी चांगली बातमी घरात आनंद आणेल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल.
दिनविशेष
‘कलेकरिता कला’ चे पुरस्कर्ते ऑस्कर वाइल्ड
टीम अवांतर
आयरिश विनोदकार, नाटककार, कवी आणि ‘कलेकरिता कला’ या वादाचे कट्टर पुरस्कर्ते ऑस्कर वाइल्ड यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1854 रोजी आयर्लंडमधील डब्लिन शहरी झाला. मॉड्लिन कॉलेजातील चार वर्षांच्या काळात हजरजबाबी विनोदकार आणि कवी म्हणून ऑस्कर यांचा लौकिक झाला. राव्हेना ही कविता लिहून ऑक्सफर्ड विद्यापीठात काव्यलेखनासाठी असलेले न्यूडिगेट पारितोषिक त्यांनी मिळविले. ऑस्कर यांनी व्हिअरा ऑर द निहिलिस्ट्स हे आपले पहिले नाटक 1880 साली लिहिले. त्यानंतर द डचेस ऑफ पॅड्युआ, ए फ्लॉरेंटाइन ट्रॅजिडी, सलोमे ही तीन नाटके त्यांनी लिहिली. मात्र ऑस्कर यांच्या प्रतिमेचा अत्यंत प्रभावी आविष्कार घडून आला, तो लेडी विंडरमिअर्स फॅन, ए वूमन ऑफ नो इंपॉर्टन्स, ॲन आयडिअल हजबंड आणि द इंपॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट या नाट्यकृतींमुळे ते कीर्तीच्या शिखरावर पोहोचले. एकोणिसाव्या शतकातील इंग्रजी रंगभूमीला सुखात्मकतेचा एक नवाच प्रकार त्यांनी बहाल केला. 1888 मध्ये द हॅपी प्रिन्स ॲड अदर टेल्स हा त्यांचा परीकथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर तीन वर्षांनी ए हाऊस ऑफ पॉमग्रॅनिट्स, लॉर्ड आर्थर सेव्हिल्स क्राइम, इंटेन्शन्स आणि द पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे ही पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे समग्र ग्रंथ 1911 साली 14 खंडांमध्ये, तर 1936 साली पॅरिसमध्ये 4 खंडांत प्रसिद्ध करण्यात आले. द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड ह्या नावाने 1963 साली त्यांचे साहित्य संकलित झाले आहे. वाइल्ड यांच्या साहित्याने विख्यात मराठी साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे अत्यंत प्रभावित झालेले होते. त्यांच्या विनोदावर आणि नाट्यलेखनावरही वाइल्ड यांचा ठसा दिसतो. वाइल्ड यांच्या दोन नाटकांची मराठी रूपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकर यांचे दूरचे दिवे हे वाइल्ड यांच्या ॲन आयडियल हजबंड या नाटकाचे रूपांतर आहे. तर लेडी विंडरमिअर्स फॅन ह्या नाटकाचे शोभेचा पंखा हे रूपांतर वि. ह. कुलकर्णी यांनी केले आहे. 30 नोव्हेबर 1900 रोजी पॅरिस येथे वाइल्ड निधन झाले.


