दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 16 ऑगस्ट 2025; वार : शनिवार
भारतीय सौर : 25 श्रावण शके 1947; तिथि : अष्टमी 21:34; नक्षत्र : कृत्तिका 28:38
योग : वृद्धी 07:20, ध्रुव 28:27; करण : बालव 10:41
सूर्य : सिंह; चंद्र : मेष 11:43; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
- अश्वत्थमारुती पूजन
- गोपाळकाला
- कालाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. कामाचा जास्त ताण घेऊ नका. व्यावसायिकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. आनंदी रहा, सकारात्मक विचार करा.
वृषभ – आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत दिवस चांगला जाईल. मात्र मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. जंक फूड आणि बाहेरील खाणे टाळा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
मिथुन – या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. कामावर लक्ष केंद्रित करा. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा वायफळ खर्च वाढू शकतात.
कर्क – कौटुंबिक जीवन सामान्य राहील. आवश्यक तेवढे पाणी प्यायले जाते आहे का, याकडे लक्ष द्या. कामाच्या संदर्भात आजचा दिवस खूप सकारात्मक असेल. मेहनतीचे फळ मिळेल. काही जातकांना पदोन्नती देखील मिळू शकते. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.
सिंह – अनावश्यक वादात अडकणे टाळा. त्यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. अनेक स्रोतांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही जातक नोकरीच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या राजकारणाचे बळी देखील बनू शकतात. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका.
कन्या – कन्या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस व्यग्र असेल. कामाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदाराबाबत सतर्क राहावे. इतरांना मदत करण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्च करा, पण काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका.
हेही वाचा – शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी
तुळ – आजचा दिवस अतिशय शुभ असेल आणि अनेक संधी देऊ शकतो, ज्यामुळे वैयक्तिक विकास होण्यास मदत होईल. ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक विचारसरणीमुळे प्रेम जीवन, करिअर, पैसा आणि आरोग्यामध्ये बदल स्वीकारण्यास मदत होईल.
वृश्चिक – या राशीच्या जातकांनी कुटुंबासोबत थोडा वेळ घालवावा. जास्त ताण घेतल्याने शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. ध्यानधारणा किंवा मेडिटेशन केल्याने बरे वाटेल.
धनु – आजचा दिवस सामान्य राहील. मोकळ्या मनाने जीवनात होणारे मोठे बदल स्वीकारण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी, प्रेम, करिअर, पैसा आणि आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन राखण्यासाठी चांगला ठरेल. ताण कमी घेतला तर त्याचाही फायदा होईल.
मकर – मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. ऑफिसमधील वातावरण सकारात्मक बनेल. जोडीदारासोबत सुरू असलेल्या समस्यांकडे थोडेसा कानाडोळा करावा लागेल. मात्र आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ – या राशीच्या जातकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. काही लोक नको इतका ताण घेतील ज्याचा त्यांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमचे आवडते काम अवश्य करा, ज्यामुळे मनावरील ताण कमी होईल.
मीन – वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगती साधण्यासाठी उत्तम दिवस आहे. मात्र जोडीदाराच्या भावनांकडेही लक्ष द्या. पैशांच्या बाबतीत नियोजनाला प्राधान्य दिले पाहिजे. आरोग्य सुधारण्यास प्राधान्य द्या. योग्य आहार आणि व्यायाम यांचा दैनंदिन जीवनात समावेश करा.
हेही वाचा – Mission Admission : पूर्व-प्राथमिक शालेय प्रवेशाची पूर्व-तयारी
दिनविशेष
कवी नारायण सुर्वे
टीम अवांतर
श्रेष्ठ मराठी कवी नारायण सुर्वे यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926 रोजी झाला. गिरणी कामगार असणाऱ्या गंगाराम सुर्वे यांनी नारायण यांचे संगोपन केले. सुर्वे यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. हॉटेलमध्ये पोऱ्या, कापड गिरणीत बिगारी, अक्षरओळख झाल्यानंतर प्राथमिक शाळेत शिपाई अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. पुढे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण ते घेऊ शकले. त्यामुळे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. त्यांचे वाचन चौफेर आणि चौकस होते. हिंदी आणि उर्दू भाषाही त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत करून घेतल्या होत्या. श्रमिकांच्या दैनंदिन आयुष्याची आणि श्रमशक्तीच्या चढउतारांची स्पंदने सुर्वे यांच्या कवितेत अनोख्या ढंगाने प्रकट होतात. माणूस आणि मेहनत यांचे अतुट नाते, हा त्यांच्या कवितेचा कणा आहे. कवीची आत्मनिष्ठा त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते. संवादमय शैली हा त्यांच्या कवितेचा एक लक्षणीय विशेष. रोजच्या भाकरीसाठी तसेच आपले हक्क आणि अस्तित्व यासाठी झगडणारा माणूस सुर्वे यांच्या कवितेतील अनुभवसृष्टीच्या केंद्रस्थानी आहे. ऐसा गा मी ब्रह्म हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर माझे विद्यापीठ, जाहीरनामा आणि नव्या माणसाचे आगमन हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. सनद आणि निवडक नारायण सुर्वे या त्यांच्या निवडक कवितांचे संपादित संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. उर्दू साहित्यिक कृष्ण चंदर यांच्या उर्दू कथांचा नारायण सुर्वे यांनी केलेला अनुवाद तीन गुंड आणि सात कथा या नावाने प्रसिद्घ झाला. याशिवाय, दादर पुलाकडील मुले ही त्यांची अनुवादित कादंबरीही प्रकाशित झाली. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद ऑन द पेव्ह्मेंट्स ऑफ लाइफ या शीर्षकाने प्रसिद्घ झाला आहे. ऐसा गा मी ब्रह्म आणि माझे विद्यापीठ या त्यांच्या दोन कवितांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. याशिवाय नेहरु पारितोषिकाचेही ते दोनदा मानकरी ठरले. अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. ‘सनद’साठी भारत सरकारचा साहित्य पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हे त्यांना मिळालेले आणखी काही महत्त्वपूर्ण सन्मान आहेत. याशिवाय 1995 साली परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तसेच 1998 साली दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मराठी काव्यसृष्टीला नवे परिमाण देणाऱ्या नारायण सुर्वे यांचे 16 ऑगस्ट 2010 रोजी ठाणे येथे निधन झाले.