दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 14 जानेवारी 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 24 पौष शके 1947; तिथि : एकादशी 17:52; नक्षत्र : अनुराधा 27:03
- योग : गंड 19:54; करण : कौलव 31:06
- सूर्य : धनु; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:19
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
मकर संक्रांती
षट्तिला एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजच्या दिवशी कटुतेला गोडव्यामध्ये बदलण्याची कला शिकावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा संकटात सापडू शकता. बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनू नये, यासाठी कामाची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळपर्यंत प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज जोडीदाराकडून पाठिंबा आणि सोबत मिळेल.
वृषभ – आजचा दिवस समाधान आणि शांतीचा आहे. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. या काळात नवीन करारांमुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. काही अप्रिय व्यक्तींची भेट होईल, ज्यामुळे अनावश्यक मानसिक त्रास होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.
मिथुन – घरापासून बाहेर राहून नोकरी किंवा शिक्षण घेत असाल तर, अशा लोकांपासून दूर राहणे शिका, जे तुमचे धन आणि वेळ बरबाद करतात. आज मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण तुम्हाला मिळेल. संततीच्या शिक्षणात किंवा स्पर्धेत अनपेक्षित यशाची बातमी आनंद देईल.
कर्क – कारकिर्दीत प्रगती कराल, पत आणि प्रतिष्ठा वाढेल. प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरतील. संध्याकाळी तुम्ही प्रियजनांना भेटू शकता, त्यांच्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. संततीप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होऊ शकतात.
हेही वाचा – बायकोची साडी खरेदी अन् मी
सिंह – उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. सौम्य बोलण्यामुळे तुम्हाला समाजात आदर मिळेल. शिक्षण आणि स्पर्धेत तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. सूर्याच्या प्रभावामुळे धावपळ वाढण्याची आणि डोळ्यांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. परस्पर संघर्षातून शत्रूंचा नाश होईल.
कन्या – नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात तुमचे सुरू असलेले प्रयत्न अभूतपूर्व यश मिळवून देतील. संततीकडूनही समाधानकारक आणि आनंददायी बातम्या मिळतील. कायदेशीर वाद किंवा खटल्यात विजय मिळाल्याने आनंदात वाढ होईल. चांगल्या कामांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये वाढ होईल, पण तुमची प्रतिष्ठाही वाढेल.
तुळ – आज दिवसभर आनंददायी वातावरण असेल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आनंद वाढेल. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेली मोठी आर्थिक व्यवहाराची समस्या सोडवली जाऊ शकते. हातात भरपूर पैसे असल्याचा आनंद तुम्हाला जाणवेल. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाच्या योजना आखण्याचा विचार होईल, मात्र ते पुढे ढकलले जातील.
वृश्चिक – अनावश्यक खर्च करण्याच्या वृत्तीमुळे आज पैशांची चणचण भासू शकते. नोकरीच्या ठिकाणी राजकारणाकडे लक्ष न देता, केवळ कामावर लक्ष केंद्रीत करा, वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली जाईल. त्याचप्रमाणे बोलताना शब्द जपून वापरा, गैरसमज निर्माण होऊन पुढे त्याचे परिणाम भोगावे लागतील. कौटुंबिक आघाडीवर शांतता असेल, कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
धनु – नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. कोणत्याही संकटावर मात कराल. जोपर्यंत इच्छाशक्ती मजबूत आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. विरोधकही आज कौतुक करतील. सासरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदे मिळू शकतात. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.
मकर – मकर राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. उपजीविकेसाठी करत असलेले नवीन प्रयत्न सफल होतील. आज कनिष्ठांकडून आदर आणि पाठिंबा देखील मिळेल. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. संध्याकाळी प्रिय पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.
कुंभ – कुंभ राशीच्या जातकांना आज आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अनावश्यक संघर्ष किंवा वाद टाळा. अन्यथा प्रिय व्यक्तींशी संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. तुमच्या कामाचे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. अशावेळी अध्यात्मिक गुरू अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल.
मीन – नोकरीच्या ठिकाणी फारसे थोडेसे प्रतिकूल वातावरण असेल, पण परिस्थितीला तोंड द्या, गैरसमज दूर होतील. आधी आखलेला प्रवासाचा बेत कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावा लागेल. वैवाहिक जीवनातील दीर्घकाळापासूनचा गोंधळ संपेल. आज तुमच्या मेहुण्या किंवा वहिनींशी व्यवहार करणे टाळा; तुमचे नाते ताणले जाण्याचा धोका आहे.
दिनविशेष
बुद्धिवादी विचारप्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे
टीम अवांतर
समाज स्वास्थ्यासाठी संततीनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसंबंधी बुद्धिवादी विचारप्रवर्तन तसेच प्रत्यक्ष कार्य करणारे भारतातील एक आद्य विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म 14 जानेवारी 1882 रोजी मुरुड येथे झाला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. 1897 साली मॅट्रिक परीक्षेत (तत्कालीन) मुंबई राज्यात सर्वप्रथम आलेल्या रघुनाथ कर्वे यांनी 1903 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. ए. तर, 1906 मध्ये अध्यापनाची पदविका प्राप्त केली. पॅरिस येथील फ्रेंच अकादमीची ‘दिप्लोम् दे सुदस्युपेरिअर’ ही पदवीही त्यांनी मिळवली होती.
एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई; कर्नाटक कॉलेज, धारवाड; डेक्कन कॉलेज, पुणे; गुजरात कॉलेज, अहमदाबाद; विल्सन कॉलेज, मुंबई या महाविद्यालयांत गणिताचे प्राध्यापक होते. त्यांचे क्रांतीकारक विचार आणि बाणेदार स्वभाव यामुळे त्यांच्या नोकरीत सतत अस्थिरता राहिली. याशिवाय त्यांना इतरही काही व्यवसाय करावे लागले. 1921 पासून ते आपली पत्नी मालतीबाई यांच्या सहकार्याने संततीनियमनाचे केंद्र (राइट एजन्सी) चालवत होते. लैंगिक शिक्षण, संततीनियमन या महत्त्वाच्या विषयांबरोबर इतरही सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांकडे वैज्ञानिक तसेच चिकित्सक दृष्टीने पाहून समाजाला ती दृष्टी प्राप्त व्हावी, यांसाठी कर्वे कायम प्रयत्नशील राहिले. त्यांच्या मते संततीनियमनाचे व्यापक उद्दिष्ट सामाजिक स्वास्थ्याचे असून, ते निकोप स्त्रीपुरुषसंबंधांवर अधिष्ठित असते.
हेही वाचा – आयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…
आधुनिक दृष्टीने तसेच बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर योग्य ठरणार्या लोकशिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. या हेतूने त्यांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालविले (15 जुलै 1927 — 15 नोव्हेंबर 1953). ज्या गोष्टींची माहिती होणे समाजाच्या आणि व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, ती माहिती निर्धारपूर्वक पुढे आलीच पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. यासाठी त्यांनी संततिनियमन, विचार व आचार आणि गुप्त रोगांपासून बचाव (विचार व आचार) ही पुस्तके लिहिली. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय, आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र अशी इतरही काही शास्त्रीय विषयांचे विवरण करणारी पुस्तके लिहिली. पॅरिसच्या परी आणि तेरा गोष्टी हे त्यांचे ललित साहित्यही उपलब्ध आहे. त्यांना रंगभूमीचेही अत्यंत आकर्षण होते. गुरुबाज (तार्त्युफ नाटकाचे रुपांतर) आणि न्यायाचा शोध हे चार अंकी संगीत नाटक त्याचे निदर्शक होय. 14 ऑक्टोबर 1953 मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
आगरकरांनंतर प्रखर बुद्धिवादाचा निर्भयपणे आणि कोणतीही तडजोड न करता पुरस्कार करणारा मराठी विचारवंत म्हणून र. धों. कर्वे यांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांच्या आचरणात जी नेकी होती, ती त्यांच्या विचारातही होती आणि तिचेच प्रतिबिंब त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक, अनलंकृत शैलीत पडलेले आढळते. एक उत्कृष्ट गद्यलेखक म्हणूनही त्यांची आठवण राहील.


