दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 12 जानेवारी 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 22 पौष शके 1947; तिथि : नवमी 12:42; नक्षत्र : स्वाती 21:04
- योग : धृति 18:11; करण : वणिज 25:59
- सूर्य : धनु; चंद्र : तुळ; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:17
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज आत्मविश्वासाने भरलेले असाल. कामाच्या बाबतीत जलद निर्णय घ्याल आणि बहुतांश निर्णय बरोबर असतील. ऑफिसमध्ये तुमचे कठोर परिश्रम दिसून येतील. आर्थिक परिस्थिती चांगली असेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक पाठिंब्यामुळे मन हलके आणि मजबूत होईल.
वृषभ – आजचा दिवस स्थिरता आणि विश्रांतीचा आहे. संयमाने तुमचे काम करा. आज कौटुंबिक मार्गदर्शन मिळेल, एखाद्या कायदेशीर खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने येईल. आर्थिक निर्णय सुज्ञपणे घ्या. नातेसंबंधांवरील विश्वास वाढेल, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मिथुन – दिवस व्यग्र राहील. संभाषणे, बैठका यामुळे तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी येऊ शकतात. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, म्हणून स्वतःच्या बजेटचे भान ठेवा. मित्रांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे एखादे काम सोपे होईल.
कर्क – आज भावनाशीलता थोडी जास्त असेल. कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला संतुलन राखावे लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याने सांगितलेली गोष्ट तुम्हाला विचार करायला लावू शकते. आर्थिक बाबी सामान्य राहतील. स्वतःसाठी थोडा वेळ काढा.
सिंह – तुमचे नेतृत्व कौशल्य दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे म्हणणे ऐकले जाईल आणि तुम्हाला जबाबदारी मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. फक्त नातेसंबंधांमधील अहंकार टाळा, कारण यामुळे सुसंवाद टिकेल.
कन्या – जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या व्यवस्थित सांभाळाल. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. तुमचे कुटुंब तुम्हाला सतवणाऱ्या चिंतांकडे गांभीर्याने बघेल. स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळा.
तुळ – आज तुमचे सगळे लक्ष कामाकडेच असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीने खूश असतील. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. फक्त स्वतःच्या आरोग्याबद्दल निष्काळजीपणा टाळा. जंक फूडपासून दूर राहा.
वृश्चिक – आज नवीन कल्पना आणि योजना मनात येतील. कामावर काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत असाल तर हा अनुकूल काळ आहे. मित्र आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. खर्च नियंत्रणात ठेवा. आज मानसिकदृष्ट्या हलके वाटेल.
धनु – आज मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. आज काम आणि वैयक्तिक जीवन या दोन्हीमध्ये देखील संतुलन राखावे लागेल. भागीदाराशी वाटाघाटी केल्याने तुमच्या समस्या सोडवण्यास मदत होईल. हुशारीने खर्च करा. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राहील.
हेही वाचा – परतीचा प्रवास… डोक्यात त्याचाच विचार
मकर – आज आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास जाणवेल. करिअरबाबत मोठा निर्णय घ्यावासा वाटेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आज कुटुंबात तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल. राग मात्र नियंत्रित करा.
कुंभ – आज नशीब तुमच्या बाजूने असेल. प्रलंबित कामे पुढे सरकू शकतात. प्रवास घडण्याची किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सुरक्षित गुंतवणुकीवर भर द्या. कौटुंबिक नातेसंबंध सकारात्मक राहतील. तुमचे मन उत्साही राहील.
मीन – आज मन शांत आणि संवेदनशील असेल. तुम्हाला सर्जनशील कामांमध्ये रस वाटेल. तुमच्या कारकिर्दीत हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. पैशाच्या बाबतीत जोखीम घेण्याचे टाळा. कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल.
दिनविशेष
भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासंगी संपादक महादेवशास्त्री जोशी
टीम अवांतर
भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासंगी संपादक आणि मराठी लेखक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म 12 जानेवारी 1906 रोजी गोव्यातील सत्तरी विभागातील आंबेडे या गावी झाला. शालेय शिक्षण त्यांनी घेतले नसले तरी, पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण, काव्यशास्त्र तसेच ज्योतिष या विषयांचे अध्ययन त्यांनी आंबेडे, धावे आणि सांगली येथे केले. त्यानंतर 1926 साली ‘सत्तरी शिक्षण संस्था’ स्थापन करून त्यांनी स्वतःला शिक्षणप्रसारास वाहून घेतले.
1935 साली ते पुण्यास आले; तेथे पुराणे-प्रवचने करू लागले. 1938 पासून भक्तिज्ञान, वैराग्यादी विषयांना वाहिलेल्या चैतन्य मासिकाचे सहसंपादक म्हणून ते काम पाहू लागले. याच नियतकालिकात 1934 मध्ये ‘राण्यांचे बंड’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी सातत्याने कथालेखन केले.
वेल विस्तार त्यांचा हा पहिला कथासंग्रह 1941 मध्ये प्रकाशित झाला. 1957 पर्यंत त्यांचे एकूण दहा कथासंग्रह प्रसिद्ध झाले. खडकांतले पाझर, विराणी, घररिघी हे त्यांपैकी काही प्रसिद्ध कथासंग्रह. त्यांच्या अनेक कथा गोव्यातील जीवनाच्या पार्श्वभूमीवर आहेत. त्यांच्या काही कथांवर मराठीत चित्रपट काढण्यात आलेले आहेत; काही कथांचे हिंदी अनुवादही झाले आहेत.
विविध भारतीय भाषांमधील, तसेच परभाषांतील संस्कृतिविषयक ग्रंथांचे अवलोकन करून दशखंडात्मक भारतीय संस्कृतिकोश त्यांनी निर्माण केला. 1962 ते 1974 ह्या कालखंडांत य कोशाचे एकूण आठ खंड प्रसिद्ध झाले. भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांची उपयुक्त माहिती त्यांत संग्रहित झालेली आहे. पुढील दोन खंडांचे कार्यही त्यांनी अल्पावधीत पूर्ण केले.
भारतातील विविध प्रदेश, तीर्थक्षेत्रे, लोककथा, कर्तृत्ववान व्यक्ती यांसंबंधीचे स्वतंत्र ग्रंथही त्यांनी लिहिले. भारतदर्शन ही त्यांची प्रवासवर्णनमाला होय. त्यांची ग्रंथसंपदा मोजली तर ती संख्या चाळीसहून अधिक भरेल. 12 डिसेंबर 1992 रोजी त्यांचे निधन झाले.


