दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 08 जानेवारी 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 18 पौष शके 1947; तिथि : षष्ठी 31:05; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 12:23
- योग : सौभाग्य 17:24; करण : गरज 18:42
- सूर्य : धनु; चंद्र : सिंह 18:38; सूर्योदय : 07:13; सूर्यास्त : 18:15
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. याशिवाय, आवश्यक तिथे मोकळेपणाने संवाद साधा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु वरिष्ठ तुमचे कठोर परिश्रम लक्षात घेतील. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा.
वृषभ – नातेसंबंधांमधील प्रेम वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळू शकतात, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे; त्या दृष्टीने सध्या मोठी गुंतवणूक टाळा. आरोग्य चांगले राहील, परंतु खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करणे टाळा.
मिथुन – आजचा दिवस संमिश्र असू शकतो. कौटुंबिक जीवनात किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु योग्य संभाषणामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद मिळू शकतो. कारकिर्दीत नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. किरकोळ आर्थिक समस्या उद्भवू शकतात, परंतु दिवसाच्या अखेरीस परिस्थिती सुधारेल. स्वतःच्या आरोग्यासाठी, जंक फूड आणि रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा.
कर्क – भावनिकदृष्ट्या मजबूत असाल. कुटुंबाचा मोठा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. काम आणि व्यवसायात कौशल्य दाखवाल आणि त्याची प्रशंसा देखील होऊ शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु हुशारीने खर्च करा. आरोग्य चांगले राहील, फक्त मानसिक ताण टाळा. कौटुंबिक जीवनात आनंदी आणि आरामदायी क्षण घालवण्याची संधी मिळेल.
सिंह – आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये दोन्ही उंचावेल. जोडीदाराशी एखाद्या विषयावर स्पष्ट बोलल्याने नाते आणखी मजबूत होईल. याशिवाय, जोडीदारासोबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या मतांचे कौतुकही केले जाईल. खर्च थोडे वाढू शकतात, त्यामुळे बजेटकडे लक्ष ठेवा. आरोग्य ठीक राहील, मात्र रागावर नियंत्रणात ठेवा.
कन्या – आजचा दिवस संयम आणि शिस्त पाळण्याचा आहे. संवादामुळे कौटुंबिक जीवन सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी कठोर परिश्रम फळाला येतील आणि वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा बजेट बिघडू शकते. आरोग्य सामान्य राहील, पण त्याचबरोबर पुरेशी विश्रांती मिळेल याची खात्री करा.
तुळ – आज जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु त्या चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कौटुंबिक जीवनात संयम आवश्यक आहे; छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सुज्ञ निर्णय घ्या. आरोग्याच्या बाबतीत, पोट किंवा थकव्याशी संबंधित समस्या येऊ शकतात.
हेही वाचा – Electric Corpses : मृतदेहात जीव परत आणण्याचे प्रयत्न!
वृश्चिक – नवीन कल्पना आणि योजना तुमच्या कारकिर्दीत उपयुक्त ठरतील. आज आर्थिक परिस्थिती चांगली असेल, मात्र ज्यात जास्त जोखीम आहे अशी गुंतवणूक टाळा. मित्र आणि प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे आनंदी असाल. कौटुंबिक जीवनात सुज्ञ निर्णय घ्या आणि जोडीदाराला वेळ द्या. आरोग्याच्या कोणत्याही मोठ्या चिंता राहणार नाहीत.
धनु – टीमवर्कमुळे तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल, सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक जीवनात एक नवीन सुरुवात किंवा सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील, मन आनंदी असेल.
मकर – काम तणावपूर्ण असेल, मात्र कठोर परिश्रमांमुळे तुम्ही ते पूर्ण करू शकाल. आज भावना थोड्या तीव्र असू शकतात, म्हणून संयम ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात प्रामाणिकपणा आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, कोणालाही पैसे उधार देण्यापासून टाळा. किरकोळ आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
कुंभ – सकारात्मक विचार करणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात एखादी चांगली बातमी किंवा सकारात्मक संकेत मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक बाजू मजबूत होईल, उत्पन्न वाढू शकेल. आरोग्य चांगले राहील, परंतु प्रवास करताना सावधगिरी बाळगा.
मीन – भावनिकदृष्ट्या संतुलित राहण्याची गरज आहे. कौटुंबिक जीवनात जोडीदाराबाबतचा विश्वास आणि जवळीकता यात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी सर्जनशील प्रयत्नांमध्ये यश मिळेल आणि तुमच्या प्रतिभेचे कौतुक होईल. पैसे हुशारीने खर्च करा. आज आरोग्य चांगले राहील. ध्यान आणि योग यामुळे मन शांत असेल.
दिनविशेष
ओडिसी नृत्याचे प्रवर्तक केलुचरण महापात्रा
टीम अवांतर
ओडिसी नृत्याचे प्रवर्तक अशी ओळख असणाऱ्या केलुचरण महापात्रा यांचा जन्म रघुराजपूर या छोट्या गावात (जगन्नाथपुरी, जिल्हा ओडिशा) एका पट्ट चित्रकारांच्या घराण्यात 8 जानेवारी 1926 रोजी झाला. रघुराजपूरमधील चित्रकारांची ही कला आगळी-वेगळी असून या प्रकारच्या चित्रकारीमध्ये तलम कापडावर विविध संस्कार करून त्यावर पारंपरिक धार्मिक चित्रे नैसर्गिक रंगांनी रंगविली जातात. केलुचरण यांचे वडीलही असे चित्रकार आणि मर्दलवादक होते.
वयाच्या नवव्या वर्षी गावातील बालचंद्र साहू यांच्या ‘गोटिपुआ आखाड्यात’ केलुचरण यांनी प्रवेश केला खरा मात्र वडिलांनी त्यांना मोहन सुंदरदेव गोस्वामी यांच्या ‘रासलीलां’त घातले. हा समूह गावोगाव दौरा करून नृत्यनाट्याचे कार्यक्रम करीत असे. यातूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनय, नृत्य आणि नाट्यतंत्राची जडणघडण झाली.
हेही वाचा – पुस्तकांचा ठेवा अन् खरा वारसदार!
केलुचरण यांच्या अध्ययनाचा 1946 ते 1952 हा महत्त्वाचा काळ होता. या काळात त्यांनी कटकच्या प्रसिद्ध अन्नपूर्णा कलासमूहात पंकज चरण दास आणि दुर्लभ चंदा तसेच गुरू मोहन गोस्वामी यांच्या रासलीला समूहाबरोबर अनेक नाटकांमध्ये कामे केली. दयाल शरण यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. इथेच त्यांनी विविध मुद्रांचा अभ्यास केला. पंकज चरण दास दिग्दर्शित देवी भस्मासुर आणि दशावतार या नृत्यनाटकातील त्यांची नृत्यनाट्ये विशेष गाजली. त्यांची साथीदार नर्तिका लक्ष्मीप्रियाशी त्यांची ओळख झाली. लक्ष्मीप्रिया यांनी देवी भस्मासुरमध्ये मोहिनीची भूमिका साकारली होती. पुढे लक्ष्मीप्रिया यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर उभयतां जगन्नाथपुरीला गेले. तिथे त्यांनी महारी आणि गोटिपुआ या दोन्ही पद्धतींचा सखोल अभ्यास करून महारीतील भक्तिभाव, तर गोटिपुआतील तंत्र या दोन्हींचा समन्वय साधून एक नवी पद्धत त्यांनी निर्माण केली. त्यांच्या या नृत्यप्रकार संशोधनातून ‘उपेन्द्र भांजा’ हे पहिले ओडिसी नृत्यनाट्य त्यांनी सादर केले. इथूनच त्यांना ओडिसी नृत्यगुरू म्हणून मान्यता मिळाली.
1953 पासून केलुचरण यांनी ‘कला विकास केंद्र’ या ओडिशातील पहिल्या नृत्य संगीत विद्यालयात अध्यापनास सुरुवात केली. सुरुवातीस त्यांनी ओडिसी नृत्यप्रकाराची शास्त्रीय बैठक निश्चित केली. या संस्थेत त्यांनी साधारणपणे 15 वर्षे अध्यापन केले. तसेच, ओडिसी नृत्यशैलीतील अनेक नृत्यनटिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. याच काळात संयुक्ता पाणीग्रही, कुमकुम मोहंती, प्रियंवदा मोहंती, सोनल मानसिंग, मिनाती मिश्रा, माधवी मुद्गल यांच्यासारखे उत्तम कलाकार त्यांनी घडविले.
ओडिसी नृत्यातील 200 हून अधिक एकल नृत्यरचना त्यांच्या आहेत. केलुचरण यांनी 1980पासून भारतभर दौऱ्यास प्रारंभ करून ओडिसीचे शिक्षण दिले. देशातल्या मोठमोठ्या सांस्कृतिक केंद्रांतून त्यांनी या नृत्यप्रकाराचे शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली. ते उत्तम तबला आणि मर्दलवादक तसेच नृत्य-रचनाकार होते.
केलुचरण यांच्या नृत्यातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे सन्मान, तर मध्य प्रदेश राज्याचा कालिदास सन्मान आणि आसाम राज्याचा शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आले. 7 एप्रिल 2004 रोजी त्यांचे भुवनेश्वर येथे निधन झाले.


