दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 07 सप्टेंबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 16 भाद्रपद शके 1947; तिथि : पौर्णिमा 23:38; नक्षत्र : शततारका 21:41
- योग : सुकर्मा 09:22; करण : विष्टी 12:43
- सूर्य : सिंह; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:48
- पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
प्रौष्ठपदी पौर्णिमा
पौर्णिमा समाप्ती रात्री 11:38
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…
दिनविशेष
प्राच्यविद्या पंडित भाऊ दाजी लाड
टीम अवांतर
महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक तसेच कुशल धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रामकृष्ण विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड यांचा जन्म 7 सप्टेंबर 1822 रोजी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. भाऊ दाजींचे उच्च शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. त्यांनी खासगीरित्या संस्कृतचे देखील अध्ययन केले. भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरात विभागातील बालकन्या हत्येच्या अनिष्ट प्रथेवर इंग्रजी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंधस्पर्धेत त्याला 600 रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. 1845 मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली, तेव्हा भाऊंनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांनी फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि 1851 साली वैद्यकशास्त्रात पदवी घेतली. अचूक निदान आणि शस्त्रक्रियेतील कौशल्य यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषधही त्यांनी शोधून काढले. दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद आणि कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 1854 मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. विधवाविवाहच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठींबा दिला. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने 1864 साली त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली. मुंबईतील राणीचा बाग (जिजामाता उद्यान), ॲल्बर्ट म्युझियम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इस्टिट्यूट या संस्था स्थापन करण्यासाठी ते अग्रेसर होते. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इत्यादी वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. पुढे 1865 मध्ये त्यांच्यावर आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. त्यातच पक्षाघाताने त्यांचे मुंबईमध्ये 31 मे 1874 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठात संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.
हेही वाचा – Homeopathy : चिमुकल्यांची निरोगी वाढ झाली तर, उज्वल भविष्य घडतं…