दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 ऑक्टोबर 2025; वार : रविवार
- भारतीय सौर : 13 आश्विन शके 1947; तिथि : त्रयोदशी 15:03; नक्षत्र : शततारका 08:00, पूर्वा भाद्रपदा 30:15
- योग : गंड 16:33; करण : गरज 25:47
- सूर्य : कन्या; चंद्र : कुंभ 24:45; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:25
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – …अन् एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद!
दिनविशेष
माजी कसोटीपटू माधव आपटे
टीम अवांतर
माजी कसोटीपटू माधव लक्ष्मणराव आपटे यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1935 रोजी झाला. ते विल्सन स्कूलमध्ये शिकत असताना साधारणपणे 12 -13 व्या वर्षी पश्चिम रेल्वे ग्राऊंडवर रॉबर्ट मनी हायस्कूलसोबत झालेल्या आंतरशालेय सामन्यामध्ये त्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे दहा विकेट्स घेतल्या होत्या. शालेय क्रिकेटमध्ये सर्व विकेट घेणारे बहुदा ते पहिलेच असतील. पुढे एल्फिन्स्टन महाविद्यालयात क्रिकेट प्रशिक्षक विनू मंकड यांना त्यांनी नेटमध्ये पहिल्या चेंडूमध्ये बाद केले. सुरुवातीला लेगब्रेक गोलंदाज म्हणून ते एल्फिन्स्टन कॉलेजमधून खेळत होते. मात्र प्रशिक्षक विनू मंकड यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सलामीला येऊन उत्तम फलंदाजी केली.1951च्या सौराष्ट्रविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी 197 धावा केल्या. पुढल्याच वर्षी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पूना कंबाइन विरुद्ध बॉम्बे कंबाइन असा सामना खेळला गेला. त्यावेळी शरद देवधर पूना कंबाइनचे नेतृत्व करत होते. ब्रेबॉर्नवर खेळायला मिळणार म्हणून एक वेगळेपण त्यात होते. त्याचप्रमाणे माधव आपटे नावाच्या कुठल्यातरी मुलाने सामन्यांमध्ये 10 बळी घेतले होते आणि तो आज मुलगा खेळणार आहे, याचीही उत्सुकता अनेकांना होती. योगायोगाने त्या सामन्यामध्ये माधव आपटे यांच्या पहिल्याच चेंडूवर शरद देवधर क्लीन बोल्ड झाले. पुढे माधव आपटे हॅरिस शिल्ड खेळले. नुसते क्रिकेटच नाही तर बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा खेळांमध्येही ते पारंगत होते. त्यांच्या घरामधील वातावरण खेळाचेच होते आणि खेळाचेच संस्कार त्यांच्यावर झाले. खरंतर, त्यांचा व्यवसाय खूप मोठा होता त्यांच्या वडिलांच्या मिल्स होत्या. त्यांच्या घरी नंदू नाटेकर, विजय मर्चंट यांचे भाऊ उदय मर्चंट हे सकाळी टेनिस खेळण्यास येत असत. माधव आपटे यांना बॅडमिंटनच्या ‘ज्युनिअर चॅपियन’ स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. पण त्यांनी क्रिकेटची साथ सोडली नाही. 1953 साली माधव आपटे यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली. या दौऱ्यात पॉली उम्रीगर यांच्यानंतर जास्त धावा माधव आपटे यांनी केल्या होत्या. मात्र गुणवत्ता असूनही त्यांना जास्त कसोटी सामने खेळता आले नाहीत. कसोटी सामन्यांसाठी त्यांची निवडच झाली नाही. त्याचे कारण त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये दिले आहे. पुढे वयाच्या 34 व्या वर्षी क्रिकेटमधून ते निवृत्त झाले. तरीपण ते फर्स्ट क्लास सामने खेळत राहिले. दि. बा. देवधर ते सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर सामने खेळणारे ते एकमेव क्रिकेटपटू होते. माधवराव आपटे यांनी 7 कसोटी सामन्यांमध्ये 49.27 या सरासरीने 542 धावा केल्या, त्यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतके यांचा समावेश आहे. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 163. तर, 67 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांनी 3 हजार 336 धावा केल्या, त्यामध्ये 10 शतकांचा समावेश आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 165. माधवराव आपटे यांनी क्रिकेट संबंधित अनेक पदांवर काम केले. ‘As luck Would have it’ हे त्यांचे आत्मचरित्रही आहे. 23 सप्टेंबर 2019 रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सकाळी लवकर उठावे


