दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 ऑक्टोबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 12 आश्विन शके 1947; तिथि : द्वादशी 17.09; नक्षत्र : धनिष्ठा 09:08
- योग : शूल 19:26; करण : कौलव 28:11
- सूर्य : कन्या; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:26
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
शनिप्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दीर्घकाळाच्या त्रासानंतर आता शांती अनुभवता येणार आहे. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची संधी मिळेल. प्रयत्न सुरू ठेवा, तेच आर्थिक अडचणींपासून मुक्तता देतील. अर्धवेळ नोकरीतूनही मोठा नफा होईल. लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना देखील आखू शकता.
वृषभ – आजचा दिवस कौटुंबिक जीवनासाठी खास असेल. घरी शुभ कार्यक्रमांचे नियोजन केले जाऊ शकते. जीवन जगण्याची शैली सुधारण्यासाठी उपयुक्त वस्तूंची खरेदी करू शकता. संध्याकाळी एखादा खास पाहुणा घरी येऊ शकतो. तुमचे वैयक्तिक जीवन आनंददायी असेल आणि तुमच्याबद्दलचा आदरही वाढेल.
मिथुन – आज प्रगतीचा दिवस आहे. अनपेक्षित यश मिळू शकते, ज्यामुळे इतर आश्चर्यचकित होतील. तुमच्या प्रगतीचा अभिमान वाटेल. त्याचबरोबर, प्रगतीची ही गती कायम ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. अनावश्यक दिखावूपणा टाळावा. कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील.
कर्क – आज कौटुंबिक कामांमध्ये व्यग्र राहाण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी तुम्ही नेहमीच तयार असता, हीच भावना आज परत एकदा अधोरेखित होईल. भावंडांच्या संदर्भात काही अडचणी येऊ शकतात. स्थानबदल देखील शक्य आहे. कुटुंब सहमत असेल तर तुम्ही त्याबद्दल विचार करू शकता.
सिंह – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असेल. व्यवसायातील चिंता त्रासदायक असू शकतात. व्यवसायात सतत अस्थिरता असल्याने मानसिक त्रास होईल. आळस आणि सतत विश्रांती घेण्याची सवय सोडावी लागेल. नोकरी किंवा व्यवसायात सुधारणा करण्याच्या संधी निर्माण होतील. आजचा दिवस कठोर परिश्रम आणि मन लावून काम करण्याचा आहे.
हेही वाचा – हत्ती… सम्राटांच्या ऐश्वर्याचे प्रतीक
कन्या – आजच्या दिवशी प्रचंड धावपळ होणार आहे. प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते. मात्र त्याचे अंतिम परिणाम अत्यंत फायदेशीर ठरतील. उत्साहाने आणि समर्पणाने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळेल.
तुळ – दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. शुक्राच्या प्रभावामुळे समस्या निर्माण होतील. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा स्वतःच स्वत:साठी समस्या निर्माण कराल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात विरोधकांची संख्या वाढू शकते. मानसिक दुर्बलता आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक – आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाशी संबंधित काही तणाव निर्माण होतील पण त्यावर मात करू शकाल. नवीन योजना यशस्वी होतील. या काळात जुने वादही शमतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडूनही पाठिंबा मिळू शकेल. कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
धनु – आज नवीन संपर्काच्या माध्यमातून फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या एखाद्या कामातूनही फायदा होऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे मिळू शकतो. दैनंदिन कामांकडे दुर्लक्ष करू नका, कारण यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायात प्रगती होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल.
मकर – आजचा दिवस सामाजिक आणि धार्मिक कार्यात व्यतीत होईल. अशा कार्यात सहभागी झाल्याने तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. व्यावसायिक कार्यातही नफा अपेक्षित आहे. दिवसभर चांगल्या बातम्या मिळू शकतात. मामाकडून एखादी मदत मिळेल, जी नंतर फायदेशीर ठरेल.
कुंभ – आजचा दिवस अनेक संधींनी भरलेला असेल. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी जवळीक लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आयात-निर्यातीशी संबंधित काम सुरू करण्यासाठी हा शुभ काळ आहे. आज आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता. एखाद्या लहान सहलीचा बेत देखील बनू शकतो. वेळेचा सुज्ञपणे वापर केलात तर भाग्य उजळेल.
मीन – वाचन आणि लेखनात आजचा दिवस घालवता येईल. राशीचा स्वामी गुरू ग्रह अभ्यास आणि अध्यात्मात आवड वाढवेल. दीर्घकाळापासून सुरू असलेले वाद संपतील. छुपे शत्रू आणि मत्सरी सहकाऱ्यांपासून सावध रहा. कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते पैसे परत मिळवणे कठीण होईल.
दिनविशेष
मराठी ख्यालगायक पंडित राम मराठे
टीम अवांतर
मराठीतील प्रसिद्ध ख्यालगायक, गायकनट आणि संगीतदिग्दर्शक पंडित राम मराठे यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1914 रोजी पुणे येथे झाला. वडील पुरुषोत्तम आणि काका गजानन मराठे यांच्याकडून रामभाऊंवर गाण्याचे तसेच अभिनयाचे संस्कार झाले. ‘सागर फिल्म’ या संस्थेच्या ‘धरम की देवी’ या चित्रपटात त्यांना बालकलाकाराची भूमिका मिळाली आणि त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर ‘मेहबूब फिल्म’ या चित्रपटनिर्मिती संस्थेच्या मनमोहन, जागीरदार आणि वतन या चित्रपटांत त्यांनी काम केले. तसेच न्यू थिएटरच्या लाइफ इज अ स्टेज या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले. याशिवाय, जयंत पिक्चर्स, इम्पीरिअल फिल्म आदी चित्रपटसंस्थाच्या चित्रपटांतही त्यांनी विविध भूमिका केल्या. प्रभात फिल्मच्या माणूस, गोपाळकृष्ण या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या; पण त्यांची ओढ अभिजात शास्त्रीय संगीताकडे होती. त्यामुळे त्यांनी मास्तर कृष्णराव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. पुढे त्यांना पंडित वामनराव सडोलीकर, पंडित मनोहर बर्वे, पंडित यशवंतराव मिराशीबुवा, जगन्नाथबुवा पुरोहित, उस्ताद विलायत हुसेनखाँ तसेच बी. आर. देवधर यांची तालीम तसेच मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर त्यांनी संगीत सौभद्र या नाटकातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, केशवराव दाते, विनायकबुवा पटवर्धन, जयमाला शिलेदार, नानासाहेब फाटक इत्यादींबरोबर त्यांनी एकच प्याला, संशयकल्लोळ, स्वयंवर, मंदारमाला, सौभद्र, जय जय गौरीशंकर इत्यादी नाटकांत भूमिका केल्या. तसेच काही नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले. रामभाऊंना अनेक मानसन्मान लाभले. त्यामध्ये संगीत भूषण पुरस्कार, बालगंधर्व सुवर्णपदक, संगीत चुडामणी – जगद्गुरु शंकराचार्य (संकेश्वर करवीर यांच्या हस्ते), रामकृष्ण बुवा वझे पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, नाट्याचार्य विष्णुदास भावे पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. 4 ऑक्टोबर 1989 रोजी मुंबईत अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.


