रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर बनविताना या टिप्स वापरून पाहा.
- कडधान्याची उसळ किंवा मटण, चिकन शिजवताना त्यात नारळाच्या करंवटीचा एक तुकडा धुऊन टाकावा. उसळी किंवा तसेच पदार्थ मऊ आणि लवकर शिजतात. कडकडीत रहात नाहीत. करवंटीत एक प्रकारचे पाचक असते. त्यामुळे उसळ शिजायला मदत होते. वाढताना करवंटीचा तुकडा काढायला विसरू नका.
- सॅलेडच्या भाज्या चिरताना बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा म्हणजे भाज्या ताज्या राहतील.
- उकडलेले बटाटे सोलताना सालासकट त्याचे चार तुकडे सुरीने करा. घाईच्या वेळेस बटाटे लवकर थंड होऊन सोलले जातील.
हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…
- व्हेजिटेबल सूप उकळताना चमचाभर मिल्क पावडर सुपात घातल्यास मळी दूर होऊन, स्वच्छ नितळ सूप तयार होते.
- बऱ्याचदा भाजी नसताना काय करावे, हा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यासाठी आदल्या दिवशी अर्धी वाटी मेथ्या एक वाटी पाण्यात भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी मेथ्या पाण्यासकट फोडणीस टाकाव्यात. त्यात अर्धी वाटी खोवलेल्या ओल्या नारळाचा किस आणि कोथिंबीर घालावी. चवीप्रमाणे तिखट, मीठ घालून मऊ शिजवाव्यात. जास्त पाणी घालू नये. अतिशय वेगळ्या चवीची ही उसळ तयार होते. मेथ्या मुळातच पौष्टिक आहेत. भिजवल्यामुळे त्या अधिक पौष्टिक होतात. नारळाने पौष्टिकता वाढते आणि मधुमेहींनादेखील पथ्यकारक म्हणून देण्यास योग्य आहे.
- कोबीची भाजी करताना, चिरून झाल्यावर धुऊन मीठ लावून ठेवावे. त्यामुळे कोबी चटकन शिजतो आणि उग्र वास येत नाही.
- गाजराच्या कोशिंबिरीत दोन-तीन कुटाच्या (भरलेल्या) मिरच्या तळून चुरा करून घालाव्यात. कोशिंबिरीची लज्जत वाढते.
हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…
- अळूची पाने खाजरी असतील तर प्रथम ती पाने धुवावीत नंतर बारीक चिरून एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे. 10-15 मिनिटे ते तसेच ठेवावे. अळूची पाने चाळणीत निथळून घ्यावीत म्हणजे खाज कमी होईल.
- 50 ग्रॅम मेथ्यांचे पीठ आणून कोरडेच भाजून बाटलीत भरून ठेवावे आणि इडली, डोसे, धिरडी, थालिपीठ, उत्तप्पा, तांदळाचे वडे यांत पीठ भिजवताना अर्धा चमचा या प्रमाणात टाकावे. पदार्थ स्वादिष्ट आणि पौष्टिक होतो.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


