स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये शिळ्या भाताचे उत्तप्पे, ब्रेडचे थालिपीठ, चिवड्याच्या चुऱ्याची चटणी, कुरकुरीत चिवडा बनविण्याच्या टिप्स पाहूयात.
- ढोकळा करताना अगदी शेवटी शेवटी हळद घातली, तर सोड्याच्या रिॲक्शनमुळे ढोकळा लाल होतो. हे टाळण्यासाठी आदल्या दिवशी पीठ भिजवताना हळद घातली आणि आयत्यावेळी सोडा घालून ढोकळा केला, तर तो लाल होत नाही. ढोकळा करताना सोडा घातल्यावर एक चिमूटभर बेकिंग पावडर घालावी. सोड्यामुळे ढोकळा फुगतो आणि बेकिंग पावडरमुळे हलका होतो.
- चिवड्याच्या खालचा चुरा खारट म्हणून टाकून न देता त्यात दाणे, खोबरे, तीळ, वाळलेला कढीलिंब वगैरे घालून चटणी करावी. मीठ वेगळे घालण्याची जरूर नाही.
- शिळा भात बहुतेक वेळा राहतो. अशा वेळी तो ताकामध्ये (ताक आंबट असल्यास ताकात थोडे दूध घालावे) हाताने मऊ कुस्करावा. त्यात थोडे बेसन आणि रवा कालवावा, तसेच हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, जिरे, कांदा, साखर, मीठ हे सर्व घालून इडलीच्या पिठाप्रमाणे करावे आणि 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे. नेहमीप्रमाणे निर्लेप तव्यावर उत्तप्पा करावा. हा उत्तप्पा भाताचा आहे, हे उत्तप्पा बनविणाराही ओळखू शकत नाही.
हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे…
- ब्रेड उरला असता तो पाण्यात भिजवून त्याचे थालिपीठ लावावे. त्यात कणीक, थोडेसे (कणकेच्या निम्मे) डाळीचे पीठ आणि थोडे आले घालावे. हे थालीपीठ अतिशय खुशखुशीत आणि छान लागते; शिवाय, ब्रेडही वाया जात नाही.
- वडापुरी किंवा दुसरे पदार्थ तळायच्या अगोदर अर्धा चमचा मीठ तेलात टाकावे म्हणजे पदार्थ जास्त तेलकट होत नाहीत.
- कच्च्या पातळ पोह्यांचा चिवडा परतून करतात. असा चिवडा करण्याआधी पोहे उन्हात अर्धा-पाऊण तास ठेवावेत. ऊन नसेल तर पोह्यांना तूप पातळ करून चोळावे आणि पोहे चांगले भाजून घ्यावेत. पोहे गार झाल्यावर नेहमीप्रमाणे चिवडा फोडणीला टाकावा. खूपच कुरकुरीत होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा
- फोडणी देऊन केलेल्या पातळ पोह्यांच्या चिवड्यात आपण सर्व साहित्य टाकतो. त्याचप्रमाणे चिवड्यात मेथी दाणा भरून वाळविलेल्या चार-पाच मिरच्या तळून त्याचा थोडा चुरा करून टाकावा. भरलेल्या मेथीदाण्याच्या मिरच्यांचा स्वाद फारच चांगला लागतो. चिवड्याला नवीन स्वाद आणि चव येते.
- भाजणीची चकली करताना सर्व धान्ये धुऊन, वाळवून मंदाग्नीवर वेगवेगळी भाजावीत. धान्ये कडक भाजली नाही तर, चकली मऊ पडते. म्हणून धान्य भाजून झाल्यावर सांडशीत धरून दाबावे. पीठ (चुरा) झाला तरच धान्य भाजले गेले असे समजावे. अशा प्रकारे धान्य भाजले म्हणजे चकली मऊ पडत नाही आणि तळायला तेलही कमी लागते. धान्ये धुतल्यामुळे चकली हलकी होते. तसेच तेल-तुपाच्या मोहनापेक्षा लोण्याच्या मोहनाने चकल्या हलक्या होतात.


