गजानन देवधर
रेल्वेगाडीतून प्रवास करणं म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हे… तो एक अनुभव असतो, आपल्या जगण्यातला एक तुकडाच असतो. अनेकदा रेल्वेच्या डब्यात बसताना खिडकीबाहेर झरणार्या पाऊसधारा पाहिल्या, जवळची पोळी खाताना शेजारी बसलेल्या प्रवाशाने दिलेली राजस्थानी लोणच्याची चव घेतली, अनोळखी माणसांशी चार शब्द बोलता बोलता त्या क्षणापुरते ओळखीचे झालो.
धडधडत्या रुळांवर जाताना फक्त गाडीच नाही तर, जुन्या आठवणीही धावत असतात… लहानपणीच्या खिडकीच्या जागेसाठीची भांडणं, चाय-चाय असे ओरडणारे विक्रेते, पूर्वी गाडीत सोलापूरी चादरींचा लिलाव करणारे विक्रेते आणि एखाद्या काही मिनिटांच्या थांब्यातही मनात साठवून जाणारे काही प्रसंग… आज मी अशाच काही रेल्वे प्रवासाच्या आठवणी सांगणार आहे – अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात ताज्या असलेल्या.
एकदा मी आणि आमच्याच कॉलेजमधले माझे प्राध्यापक मित्र जोशी सर एका पेपर प्रेझेंटेशनसाठी जयपूरला चाललो होतो. अहमदाबादला गाडी बदलून पुढच्या गाडीत बसलो. रात्रीची वेळ होती, अकरा वाजून गेले होते, फर्स्ट क्लासच्या डब्यात आम्ही दोघे आणि एक एकवीस-बावीस वर्षांची परदेशी युवती असे तिघेजणच होतो.
आमचे दुसर्या दिवशीच्या पेपरबद्दल बोलणे चालले होते. मधेच आमचे लक्ष गेले, ती युवती पाय पोटाशी घेऊन घाबरल्यासारखी कोपर्यात बसली होती.
आमची झोपण्याची वेळ झाली, ती स्त्री तशीच बसून होती. जोशी सर म्हणाले, “त्या स्त्रीचे वागणे नॉर्मल वाटत नाही, आपण तिची चौकशी करूया.”
जोशी सरांनी आमची ओळख करून दिली आणि आपण कोण, कुठून आलात, तुम्हाला काही मदत हवी का… असे विचारले. त्यावर ती म्हणाली, “मी इतका वेळ तुमचे बोलणे ऐकत होते, त्यातील इंग्रजी शब्दांवरुन तुम्ही education ला related आहात, असा मी अंदाज केला होता. आता तुम्ही तुमची ओळख करून दिली आहे, तेव्हा मला तुमच्याबरोबर मोकळेपणाने बोलता येईल, असे वाटते.
ती पाय खाली सोडून, अंगावर शाल पांघरुन व्यवस्थित बसली. ती म्हणाली, “तुम्ही सज्जन दिसत आहात, तसेच या प्रवासानंतर आम्ही पुन्हा भेट होणे नाही, तेव्हा तुमच्याशी मी मोकळेपणाने बोलणार आहे.”
तिने सुरवात केली, मी नॅन्सी. मी मूळ इंग्लंडमधील मँचेस्टरची. आई, वडील, मोठा भाऊ, मी आणि माझी लहान बहीण हे आमचं कुटुंब. आमचा मोठा बंगला असून सगळे सुखात, आनंदात आहेत. मी ग्रॅजुएशन केलं, मला छानशी नोकरीही मिळाली. ग्रॅज्युएशन करता करता एका मुलाच्या प्रेमात पडले. आता आम्ही लग्न करायचे ठरवले आणि मी तसं घरी सांगितलं. घरच्यांनी थोडा वेळ दे, असं मला सांगितलं.
दोन दिवसांनी माझा भाऊ मला म्हणाला, मला तुझ्या एकटीशी बोलायचं आहे आपण लाँग ड्राईव्हला जाऊया. बाहेर पडल्यावर भावानं मला विचारलं, तू त्या मुलाला, जॉनला कशी ओळखतेस? त्याच्या घरी कधी गेली होतीस का? त्याने तुझी अन् घरच्यांची भेट घालून दिली आहे का? तो नोकरी व्यवसाय काय करतो? त्याची शहानिशा केली आहेस का?
त्यावर मी त्याला म्हणाले, तू असा क्रॉस चेक केल्यासारखे प्रश्न का विचारतो आहेस?
त्यावर तो म्हणाला, नॅन्सी, तू प्रेमात आंधळी झाली आहेस. तुझ्याशी गोड बोलणारा मुलगा तुला फसवतो आहे. त्याचे कॅरेक्टर चांगले नाही, त्याला नोकरीही नाही. तू शांतपणे विचार कर.
भावाचे हे बोलणे मला सहन झाले नाही. मी कधीही त्याला उलट न बोलणारी त्या दिवशी त्याला म्हणाले, तुझ्या आधी माझे लग्न होणार आहे म्हणून तू खो घालतो आहेस ना? तुला माझे चांगले बघवेनासे केव्हापासून झाले?
आमचा वाद झाला, आम्ही घरी आलो. आमचे काहीतरी बिनसले आहे, हे घरी लक्षात आले. मग डिनरनंतर भावाने सगळ्यांना त्याने केलेली चौकशी तसेच त्याने मत सांगितले.
घरच्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. पण मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. हळूहळू माझी पूर्ण फसवणूक झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी माझ्या घरच्यांशी संबंध तोडले होते, तिकडे मी जाऊ शकत नव्हते. माझी नोकरी चांगली चालली होती, पैशांचा प्रश्न नव्हता. मी मानसिकरित्या खचले होते, मला आधाराची गरज होती.
एके दिवशी माझे ऑफिस सुटल्यावर बाहेर आले, तो माझा भाऊ तिथे मला भेटला आणि म्हणाला, चल कॉफी प्यायला जाऊ, मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे.
आम्ही दोघे जवळच्या कॅफेमध्ये गेलो. तिथे गेल्यावर माझा बांध फुटला, मी ढसाढसा रडले. भावाला म्हणाले, मी चुकले, पण आता घरच्यांना तोंड कसे दाखवू. मी घरातून भांडून सगळ्यांशी संबंध तोडून बाहेर पडले ना!
भाऊ म्हणाला, संबंध तू तोडलेस, आम्ही नाही. माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष होते आणि घरच्यांनाही तुझी खबरबात होती. आता तुला चूक उमगली आहे ना? चल मग घरी.
घरी मला कोणी काही बोलले नाही. मी तिथेच राहू लागले पण माझे मन शांत नव्हते, मी अतिशय बेचैन होते. एका दिवशी आई मला म्हणाली, नॅन्सी, तुला जरा बदलाची गरज आहे. दोन महिने बाहेर परदेशात फिरून ये. तुला विरंगुळा मिळेल.
मी त्यावर विचार केला. एका मैत्रिणीने मला भारतात जाण्याचा सल्ला दिला.
मी तयार झाले, पण परदेशात जाण्याची ही पहिलीच वेळ. काही अनुभव नाही… दिल्लीत आले, एका चांगल्या हॉटेलमध्ये राहिले. त्या दिवशी मी लंच करत असताना मला एक व्यक्ती भेटली, तिने माझी चौकशी केली… थोड्या वेळाने मला म्हणाली, तुम्हाला भारतात जास्त दिवस रहायचे आहे ना? मग मी स्वस्तातले दुसरे चांगले हॉटेल दाखवतो, तुम्हाला तिथे कमी पैशात जास्त दिवस राहता येईल.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला. संध्याकाळी तो हॉटेलमध्ये आला, माझे सामान घेऊन पहाडगंजला जायचे आहे, असे त्याने सांगितले. पण ऑटो एका निर्जन ठिकाणी नेली आणि मला लुटले. माझ्याकडची सगळी रोख रक्कम काढून घेतली. तो आणि ड्रायव्हर यांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्नही केला, पण मी स्वतःला वाचवले. नशिबाने माझा पासपोर्ट आणि क्रेडिट कार्डे वाचली.
मी दिल्लीतून बाहेर पडण्याचा विचार केला. दोन दिवस अहमदाबादला राहिले. आता उदयपूरला जायचे आहे. खूप अनुभव घेतले मी गेल्या सहा महिन्यांत. आयुष्य सोपं नसतं, हे खरं… पण आलेल्या परिस्थितीला तोंड आपल्यालाच द्यावं लागतं!
एवढं बोलून ती शांतपणे डोळे मिटून बसून राहिली.
थोड्या वेळाने म्हणाली, आता मन हलकं झाल्यासारखं वाटतंय.
ती आडवी झाली आणि दोनच मिनिटात तिला गाढ झोप लागली सुद्धा.
पहाटे आमच्याबरोबरच ती खाली उतरली, आम्ही तिघांनी चहा घेतला. तिला हॉटेलची गाडी घेऊन जाण्यासाठी येणार होती. तिला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देऊन आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो.
आजही तिचे भेदरलेले डोळे आणि घाबरलेला चेहरा डोळ्यासमोर आला तर अंगावर काटा येतो.
हेही वाचा – बॅटन रिलेचा प्रवास : तेरा दिवसांतील काही आठवणी
1993-94 चं वर्ष असावं, जूनचा महिना. पाऊस खूप झाल्याने काही दिवस गाड्या रद्द झाल्या होत्या. आम्हाला एका लग्नाला मिरजेला जायचं होतं, त्याच्या आदल्या दिवशीचं आमचं रिझर्व्हेशन होतं आणि त्याच दिवशी गाड्या सुरू झाल्या. आम्हाला जायला मिळणार म्हणून आम्ही खूश होतो. कल्याणहून महालक्ष्मी एक्स्प्रेस वेळेवर निघाली. आम्ही दोघं, उन्मेश आणि मृणाल असे चौघेही होतो. मला साईडचा बर्थ मिळाला होता. मृणाल मधल्या बर्थवर होती आणि ती लहान असल्याने पडू नये म्हणून तिला नेहेमीप्रमाणे ओढणीने बांधले होते.
पुण्याला जाग आली तेव्हा गाडी वेळेवर होती. म्हटले मिरजेला एकदम वेळेत पोहोचू पण…
आम्ही झोपेत होतो आणि एकदम आवाज आला, आम्हाला वाटले मृणाल पडली… पण ती तर शांत झोपली होती. तेवढ्यात बाहेरुन ठोकल्याचे आवाज येऊ लागले. माझ्या पलीकडे झोपलेल्या बाईने कसला आवाज येतो आहे, असे म्हणत खिडकी उघडली मात्र… बाहेरून तिच्या गळ्यावर चाकूने घाव करण्यात आला, तिच्या गळ्यातले ओढले गेले… तोपर्यंत दरवाजा उघडून दरोडेखोर आत शिरले. चाकूचा धाक दाखवत त्यांनी बायकांचे दागिने लुटले, त्यांच्या पर्स पळवल्या, काही लोक पँट आणि शर्ट काढून नाइट ड्रेसमध्ये झोपले होते, त्यांचे कपडेही पळवले! आमचे बर्थ त्याच डब्यात… ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही इतकेच. त्यामुळे लग्नासाठी हिने घेतलेले दागिने वाचले!
आत शिरणार्या दरोडेखोरांची संख्या मोठी होती. आतल्या त्यांच्या साथीदारांनीच त्यांना सगळ्या डब्यांचे दरवाजे उघडून दिले होते. ते सराईत दिसत होते. सगळ्याच डब्यांमध्ये हलकल्लोळ माजला. लोक खाली उतरले. अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाले होते.
सगळा दरोडा सुनियोजित होता. रेल्वे ट्रॅकवर दगडांचा ढीग रचून गाडी थांबवली होती. लोको-पायलटला खूप मारले होते. त्याचा चेहरा काळानिळा झाला होता. एका सिनेमात पहावे असे सगळे प्रत्यक्ष घडत होते… लोकांनी ट्रॅकवर रचलेला दगडांचा ढीग हलवला. गाडीत असलेल्या एका डॉक्टरने लोको-पायलटवर तात्पुरते उपचार केले, गाडी निघाली. गाडीत परत बसल्यावर प्रत्येकाने कोणाचे काय काय चोरीला गेले, कुणाला किती जखमा झाल्या… याची चौकशी केली. अनेकजण रडत होते… कुणाला चाकू, दगड लागले म्हणून तर ज्या बायकांच्या पर्स किंवा दागिने अंगावरुन बळजबरीने काढून नेले म्हणून!
सातार्याला उतरून लोको-पायलट आणि इतरांनी रितसर तक्रार केली. आम्ही लग्न लावायला वेळेत पोहोचलो, पण सगळीकडे त्या दिवशी चर्चा होती ती, रात्री महालक्षी एक्स्प्रेसवर पडलेल्या दरोड्याची! ज्याचे आम्ही साक्षीदार होतो…
हेही वाचा – छायाचित्रं आणि कोकण मराठी साहित्य संमेलन…
2001 साली माझ्या वडिलांचा 80 वा वाढदिवस होता आणि सगळ्यात मोठ्या बहिणीचा 55 वा तर धाकट्यात बहिणीचा 50वा वाढदिवस होता. आम्ही डिचोलीतल्या प्रसिद्ध बेकरीत विशेष ऑर्डर देऊन एकूण पाच किलो वजनाचे तीन केक आणले होते. हे सेलिब्रेशन आम्ही गोव्याला भावाच्या घरी केलं. आम्ही सहा भावंडं आमच्या कुटुंबांसहीत दिवाळीला एकत्र होतो.
वाढदिवसांचं सेलिब्रेशन आणि दिवाळी साजरी करुन मी आणि माझ्या दोन बहिणी, आमच्या फॅमिलीसहीत सगळे एकत्र मांडवी एक्सप्रेसने ठाण्याला आलो. अकराजण होतो. दिवसभर गाणी, कला आणि नकला, अनेक किस्से, पत्ते खेळणे, सोबत आदल्या दिवशीचा स्पेशल बनवून घेतलेला केक. दिवसभर धमाल करत आम्ही रात्री ठाण्याला येऊन पोहोचलो. गाडीमधे आपल्या माणसांचं छान गेट टूगेदर झालं आणि प्रवास अविस्मरणीय झाला.
दिवसभर गाडीत किंवा स्टेशनवर कॅमेर्याने काढलेल्या फोटोमुळे आमच्या त्या स्मृती अल्बमच्या रुपातही कायम राहिल्या.
आज रेल्वेचं रूप बदललंय. आरक्षण ऑनलाइन झालंय, चहावाला ‘बॉय’ झाला आहे, आणि डब्यात AC, CCTV, मोबाइल चार्जर अशी सुखसुविधा आलीय. पण तरीही काही गोष्टी तशाच राहिल्यात – खिडकीबाहेरचं धावणारं जग, स्टेशनवरचं गडबडलेलं जीवन, आणि सहप्रवाशांमधली मानवी नाती.
कधीकधी वाटतं, रेल्वेचा प्रत्येक प्रवास म्हणजे एक छोटंसं आयुष्य असतं – सुरुवात असते, भेटी असतात, संवाद असतात, आणि शेवटी निरोप!
dscvpt@gmail.com / मोबाइल – 9820284859


