उमा काळे
श्रीमंती ही नात्याची असते. पण, खरं नातं म्हणजे केवळ रक्ताचं बंधन नसतं, तर ते दोन मनांना जोडणारा एक अदृश्य धागा असतो. पण कोणतंही नातं जपताना, समोरच्याच्या मनात आपली खरी जागा काय आहे, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. उगाचच एखाद्या नात्यात स्वतःला झोकून देऊन, विनाकारण भावूक होण्यात काहीच अर्थ नसतो. मन हळवं असणं चांगलं, पण ते दुबळं नसावं.
नात्यातली आपली जागा ओळखणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं नव्हे, तर ती एक प्रकारची वास्तववादी जाणीव आहे. जेव्हा आपल्याला कळतं की, समोरच्या व्यक्तीसाठी आपण किती महत्त्वाचे आहोत, तेव्हा आपण त्या नात्यात अधिक सजगतेने वागतो. नाहीतर, अपेक्षाभंगाचं दुःख पदरी पडतं. अनेकदा आपण एखाद्या नात्यात इतके गुंतून जातो की, समोरच्याच्या मनात आपल्याबद्दलच्या भावनांचा विचारच करत नाही. यातूनच गैरसमज आणि मनस्ताप वाढतो. म्हणूनच, नात्यात भावनिक गुंतवणूक करताना, आपण जमिनीवर आहोत का, याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.
हळवेपणा आणि दुबळेपणातील फरक
मन हळवं असावं. याचा अर्थ असा की, आपल्या मनात इतरांबद्दल सहानुभूती असावी, माया असावी आणि गरज पडल्यास इतरांच्या दुःखात आपण सहभागी व्हावं. पण मन ‘दुबळं’ नसावं… याचा अर्थ असा की, आपण इतरांच्या भावनांनी इतके प्रभावित होऊ नये की, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होईल. एखादी व्यक्ती आपल्याशी जशी वागते, तसंच प्रत्युत्तर आपण दिलं पाहिजे, अशी अजिबात गरज किंवा अपेक्षा नसते. पण स्वतःच्या भावनांना आवर घालता येणं आणि योग्य ठिकाणी योग्य प्रतिक्रिया देणं, हे महत्त्वाचं आहे.
हेही वाचा – सदाफुली… आयुष्यातील सुख
नि:स्वार्थ पुण्याई
आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, जी कोणत्याही कामाशिवाय, केवळ आपल्याशी बोलण्यासाठी फोन करतात. अशी माणसं खरंच भाग्यवंतांना मिळतात. आजच्या धावपळीच्या जगात, जिथे प्रत्येकाला आपल्या कामाची घाई आहे, तिथे तुमच्याशी केवळ गप्पा मारण्यासाठी वेळ काढणारी व्यक्ती मिळणं हे दुर्मीळच आहे. हे खरंच एक मोठं वरदान आहे.
काही पुण्य असे असते, जे आपण फक्त परमेश्वरासाठी करतो. त्याचा कोणताही गाजावाजा करत नाही, कोणाला दाखवत बसत नाही. एखाद्या गरजूला मदत करणं असो किंवा एखाद्याला संकटातून बाहेर काढणं असो, या पुण्याईचा साक्षीदार फक्त आणि फक्त परमेश्वरच असतो. अशा पुण्याईमुळे आपल्या मनाला एक वेगळाच शांत आणि समाधानाचा अनुभव मिळतो. ही खरी आत्मिक शांती असते.
म्हणून, नाती जपताना आपण भावनिक असायला हवं, पण भावनिक होऊन दुबळं होता कामा नये… आणि आयुष्यात असे काही क्षण असावेत, जिथे नि:स्वार्थपणे केलेली मदत किंवा कोणासाठी तरी काढलेला वेळ, तुम्हाला आतून समाधानी करेल. कारण, हीच खरी जगण्याची श्रीमंती आहे.
हेही वाचा – मालकी नव्हे, माणुसकी हवी…!