Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeअवांतरघरातला नवीन सदस्य... विठू

घरातला नवीन सदस्य… विठू

मंदार अनंत पाटील

तसे बघायला गेले तर, आमच्या घरात कोणालाच पाळीव प्राणी फारसे आवडत नसत. माझ्या मोठ्या भावाला तर कुत्रा अजिबात आवडत नाही. मीच एक प्राणी, पक्षीप्रेमी आहे. अगदी शाळेपासूनच मुक्या जीवांबद्दल एक वेगळीच आपुलकी होती. माझ्या प्राणीप्रेमातूनच वन-रुम किचनच्या छोटेखानी घरात पहिले दाखल झाले ते मासे… हनुमान रोडवर मराठे नावाचे एक गृहस्थ घरातूनच गोड्या पाण्यातले मासे विकत असत. त्यांच्याशी विचारविनमय करून आणि व्यवस्थित माहिती घेऊन एक फुटाचा टँक घरी आणला. नवशिका असल्यामुळे सुरुवातीला रंगेबिरंगी गप्पी जातीचे मासे आणले.

मराठे काका माशांबरोबरच पक्ष्यांचीही विक्री करत होते. म्हणून हळूहळू माझा कल पक्षी पाळण्याकडे जाऊ लागला. पण घरात फारशी जागा नसल्याने मनाला थोडा आवर घालावा लागला. पण हळुहळु बजी (Love Birds) जातीच्या पक्ष्यांबद्दल बरीच माहिती जमवली आणि एकदा बाबांचा चांगला मूड बघून एक जोडी घेऊनच घरी आलो. त्यांच्या किलबिलाटाने तर घरात एक नवचैतन्य आले…

हळूहळू का होईना, पण माझे ‘एनिमल किंगडम’ वाढायला लागले. आता माझा फावला वेळ मासे आणि पक्षी यांची देखभाल तसेच संगोपन यामध्येच जाऊ लागला. पक्ष्यांबाबतीत देखील बरीच माहिती मिळवून अगदी व्यवस्थित नियोजन करू लागलो होतो. एकदा सहजच मराठे काकांकडे गेलो असताना त्यांनी बाबांना पक्ष्यांच्या प्रजननाबाबतीत माहिती देऊन एक खोका दिला. घरी आल्यावर तो खोका पिंजऱ्यामध्ये लावला गेला आणि एका महिन्यात बघता बघता दोन पक्ष्यांचे सहा कधी झाले ते कळलेच नाही. त्यांची ती नवजात पिसे नसलेली पिल्लं बघण्यात खूप मजा यायची; पण सारखा खोका उघडून बघायचा नाही, अशी सक्त ताकीद असल्याने हळूच डोकावून बघितले जायचे.

एक दिवशी हळूच एक पिल्लू बाहेर आले अन् पाठोपाठ सगळी भावंडं हजर झाली. आता त्या लहान पिंजऱ्यामध्ये सहा पक्षी झाले. माशांच्या टँकप्रमाणे थोडा मोठा पिंजरा आणला गेला. परत एकदा पक्ष्यांनी अंडी घातली. यावेळेस तर सहा पेक्षा जास्त पिल्लं होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मग मराठे काकांशी विचारविनमय करुन पिल्लं त्यांनाच विकायला द्यायची असे ठरवलं. पण माझं मन काही मानेना! म्हणून मी हट्ट करून ती पिल्लं माझ्याच ओळखीमधील लोकांना मोफत देऊन टाकली.

दोन पक्षी घेऊन सुरू झालेला प्रवास आता तीन पिंजरे आणि जवळ-जवळ तीसएक पक्षी इतका व्यापक झाला होता. सोबतीला फिश टँकही होताच. साधारण पाच-सहा वर्षांनंतर बारीक आजाराने बरेच पक्षी एकदम दगावले आणि मग उरलेले पक्षी उतारवयामुळे मरण पावले. नंतर काही महिने फक्त मासेच माझ्याकडे होते.

एकेदिवशी सोसायटीमध्ये खेळत असताना अचानक एक पोपट खाली बसलेला दिसला. पहिल्यांदा वाटले की, दाणे टिपायला खाली आला असावा; पण हळूच जवळ जाऊन बघितले तर तो जखमी असल्याचे लक्षात आले. त्याला अलगद उचलून घरी आणले. काही दिवस काळजी घेऊन तसेच औषध-पाणी करून खडखडीत बरा केला आणि पुन्हा एकदा आकाशात भरारी घेण्यासाठी त्याला गच्चीवर नेले. पण तो जायलाच तयार होईना. आई म्हणाली की, राहू दे अजून काही दिवस… तो घरातला नवीन सदस्य झाला. यथावकाश त्याचे नामकरण विठू असे झाले.

पहाडी जातीचा हिरवागार आणि लाल चोचीचा असा राजबिंडा नर पोपट होता. पिंजऱ्यावर बसून रोज सकाळ-संध्याकाळ आरडा-ओरडा करणे आणि फळे तसेच मिरचीचा फडशा पाडणे हा त्याचा दिनक्रम होता. घरात तर अगदी स्वच्छंदपणे बागडायचा… पण कधी घाण नाही केली किंवा त्रासही दिला नाही. फार समजुतदार होता तसा. मी त्याला माझे नाव बोलायला शिकवायचा खूप प्रयत्न केला; पण त्याने काही दाद दिली नाही.

एक दिवस आम्ही सर्व कामानिमित बाहेर गेलेलो असताना विठूने कधी उड्डाण केले ते कळलेच नाही… पाठी राहिला तो विठूचा रिकामा पिंजरा अन् अनेक आठवणी. नंतर बरेच दिवस माझी नजर त्यालाच शोधायची, पण तो काही परत आलाच नाही. त्याची आठवण सारखी येतच होती, पण आता तूच त्याच्या पंखात बळ दिलेस आणि त्याच्या डोळ्यांत त्याला आकाश दिसले म्हणून तो आपल्या सोबत्यांकडे गेला, असे आईने समजाविले, तेव्हा कुठे बरेच दिवसांनी माझी समजूत पटली.

(क्रमश:)

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!