डॉ. किशोर महाबळ
शालेय जीवनात विद्यार्थी हे शिक्षकांना मार्गदर्शक आणि आदर्श मानतात. शिक्षक विद्यार्थ्यांशी वर्गात कसे वागतात? कसे शिकवतात? कसे बोलतात? कसे राहतात? कसे उभे राहतात? कसे चालतात? खुर्चीवर कसे बसतात? हजेरी कशी घेतात? प्रश्न कसे आणि कोणते विचारतात? विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद देतात? शिकवताना चेहेऱ्यावरील हावभाव कसे असतात? त्यांचा मूड कसा असतो?… या सर्व गोष्टी विद्यार्थी बारकाईने बघत असतात. शिक्षकांच्या वर्तनाचा दूरगामी परिणाम विद्यार्थ्याच्या विचारांवर, वर्तनावर तसेच मानसिक, बौद्धीक जडणघडणीवर होतो आणि तो विद्यार्थ्यांवर आयुष्यभर टिकून राहतो. म्हणूनच प्रत्येक शिक्षकाचे शाळेतील आणि वर्गातील वर्तन सकारात्मक असणे, अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असते.
सकारात्मक वर्तनाचे महत्त्व न समजणाऱ्या शिक्षकाचे वर्तन नकारात्मक असेल. विद्यार्थी आपल्याला घाबरले पाहिजेत, असे त्याला वाटते. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याबद्दल भीती निर्माण करण्यास तो प्राधान्य देईल. कारण असो किंवा नसो तो आरडाओरड, चिडचिड करेल. उत्साहाने शिकविणार नाही. विद्यार्थ्यांचे दोष दाखवेल, कौतुक करणे टाळेल आणि वेळप्रसंगी त्यांचा अपमान करेल, मारहाणही करेल. कसेही शब्द वापरेल. आपल्या वागण्या-बोलण्याबद्दल कोणतीही काळजी घेणार नाही.
आपली प्रत्येक कृती आणि वर्तन हे विद्यार्थ्यावर दूरगामी संस्कार करणारे आहे, हे समजणारा शिक्षक मात्र वर्गातील त्याचे वर्तन हे जेवढे सकारात्मक ठेवता येईल, तेवढे ठेवण्याचा प्रयत्न करेल. असा शिक्षक रोज नियमितपणे वर्ग घेईल, रोज अत्यंत उत्साहाने आणि हसतमुखाने वर्गात प्रवेश करेल. वर्गात अत्यंत उत्साहाने वागेल. चेहरा प्रसन्न ठेवेल. वर्गात तो सर्व विद्यार्थ्यांकडे सारखेच लक्ष देईल. कधीच भीती दाखविणार नाही. विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. आपला चेहरा त्रासिक दिसणार नाही, याची तो काळजी घेईल. सर्व विद्यार्थ्यांना ऐकू जाईल, अशा आवाजात बोलेल. स्वत:च्या घरी आरामखुर्चीत बसल्यासारखा वर्गातील खुर्चीत बसणार नाही!
आपला विषय सोपा करून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देईल, रागावणार नाही. त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करेल. प्रश्नांचे व्यवस्थितपणे नीट उत्तर देईल. वर्गात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, यासाठी प्रोत्साहन देईल. कोणाचे उत्तर चुकले तर, त्याला रागावणार नाही. त्याचे उत्तर का चुकले, हे त्याला शांतपणे समजावून सांगेल. त्यामुळे या शिक्षकाच्या वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थी उत्साहाने प्रश्नोत्तरात सहभागी होतील.
हेही वाचा – भाषिक बुद्धिमत्तेचा शोध
सकारात्मक वर्तनाचे महत्त्व ओळखणारा शिक्षक वर्गातील सर्व विद्यार्थ्याच्या प्रगतीचे महत्त्व लक्षात घेईल. शिकविलेले सर्वांना समजते आहे की नाही, सर्वांची प्रगती होत आहे की नाही याकडे बारकाईने लक्ष देईल. त्यांच्यात भेदभाव करणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांला समान संधी मिळेल, असा प्रयत्न करेल. फक्त दोष न दाखवता गुणांचेही कौतुक करेल. सर्वांसमोर विद्यार्थ्याला त्याचे दोष सांगणार नाही, पण विद्यार्थ्यांचे गुण मात्र सगळ्यांसमोर आवर्जून सांगेल. त्या गुणांचा विकास कसा करता येईल, याचा विचार करेल आणि त्यासाठी सुचतील ते उपक्रम घेण्यात पुढाकार घेईल. हे सगळे हा शिक्षक स्वयंप्रेरणेने करेल.
उपरोक्त सर्व गोष्टी करणे कोणाला अशक्य वाटू शकेल. पण खरे तर ते अशक्य नाही. त्यातही ज्याला, शिक्षक म्हणून आपल्याला खूप चांगले काम करता येते, याची जाणीव असेल. त्याच्या दैनंदिन जीवनात या सर्व गोष्टी आपोआपच अभिव्यक्त होताना दिसतील. मात्र, त्यासाठी आवड म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारलेला शिक्षक असावा लागेल. असे शिक्षक आता दुर्मीळ होत चालले आहेत, ही आजची खरी समस्या आहे! शाळा खूप आहेत, शिक्षकही भरपूर आहेत, पण उत्तम संस्कार करतील, असे शिक्षक मात्र दुर्मीळ का होत आहेत? शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख, प्राचार्य किंवा संस्थाचालक म्हणून शिक्षणक्षेत्रात असलेले कितीजण आपल्या कर्तव्याबद्दल, वर्तनाबद्दल जागरूक असतात? असा प्रश्न विचारणेही आता आवडेनासे झालेले आहे.
हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!
विद्यार्थ्यांशी कसे बोलू नये, कसे वागू नये, कसे शिकवू नये, याचा वस्तुपाठच अनेक शिक्षक आपल्या वर्तनातून देत असतात. त्यांनाच अध्यापनात रूची नसते, आनंद वाटत नसतो. त्यामुळे अत्यंत उत्साहाने भारलेल्या संस्कारक्षम वयातील मुलामुलींना अत्यंत निरुत्साहाने शिकविणारे, व्यसने असलेले, शिकविण्यात रस नसणारे शिक्षक खूप मोठ्या संख्येत दिसू लागले आहेत. आपले वर्तन सकारात्मकच राहील, याबद्दल जागरूक असणारे शिक्षक कमी प्रमाणात का होईना, पण आजही आहेत, म्हणूनच शिक्षणव्यवस्था टिकून आहे.


