चहा! माणसांमधील दूरावा मिटविणारा…. परक्याला आपलसं करून घेण्याची किमया या चहानेच साधू शकते. गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करणारी, सर्वांच्या खिशाला परवडणारा आबालवृद्धांच्या पसंतीस उतरणारा असा हा चहा!
अनेक वेळा समस्यांचे निराकारण करणारे पेय म्हणजे चहा! चहाचा पहिलाच घोट सैरभैर धावणारे मन शांत करते आणि समस्येतून मार्ग निघतो… सकाळच्या वेळेस कुटुंबासोबत चहाचे घोट घेत गप्पा करणे म्हणजे आपल्या सर्वांच्या घरातील आवडता ‘टी टाइम’. सकाळचा एक कप वाफाळलेला चहा तर सर्वांकरिता गरजेचाच वाटतो… अनेक घरांमध्ये त्या सकाळच्या तासाभरात दोन वेळेस चहा तर नक्कीचं होतो! सकाळी सकाळी एका बाजुला मंद आचेवर दूध तापवत ठेवून दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण ठेवताना गृहिणीचा मूड प्रसन्न असतो… त्यावेळेस नकळतपणे अभंग, भावगीत असं काहीतरी स्वमग्न होऊन गुणगुणत असते. (निदान मी तरी असं करते.) अन्यथा, बाजूला एफएमवर छानशी गाणी सुरू असतात…
गरम चहाचा घोट घेत वर्तमानपत्र वाचणे हा आपला आवडता छंद! चहाचा घोट पोटात जाताच मेंदूला तरतरी येते आणि मग हातात कप तसाच ठेवून राजकारण, समाजकारण, कुटुंब व्यवस्था, अर्थव्यवस्था अशा बहुढंगी आणि बहुआयामी विषयांवर गप्पांचे फड रंगतात. भलेही तासाभरानंतर आपण त्या सर्व गोष्टी विसरून जातो! परंतु तो सकाळचा एक चहाचा कप मात्र या सर्व गोष्टी रोज घडवून आणतं असतो. ‘चाय पे चर्चा’ म्हणजेच ‘मन की बातें’! जो कभी खत्मही नही होती… ‘It is an endless topic!’
चहामुळे काही व्यक्ती रेकॉर्डब्रेक प्रगतीपथावर असतात… जसा आमच्या नागपूरचा ‘डॉली चायवाला” त्याच्या चहा करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे असा काही प्रसिद्ध झाला की, ज्याची दखल खुद्द बिल गेट्सला घ्यावीशी वाटली. डॅाली चहावाल्यासारखे काही चहावाले करामती कलाकार असतात. यांच्यात चहा करण्याची, तो कस्टमरपर्यंत पोहचवण्याची अजब कला असते. येवले चहा, अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा अशा कितीतरी चहा विकणाऱ्या कंपन्यांचे मालक या चहाच्या भरवशावर श्रीमंत झालेले आहेत. लोकांच्या पसंतीस काय उतरेल… कोणत्या भागातील लोकांना कसं खायला प्यायला आवडेल, हे या लोकांनी बरोबर हेरलेलं असतं! त्याशिवाय का ही माणसं इतकी मोठी झालीत?
अन्नू मलिकसारख्या संगीतकाराने, ‘एक गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलानेवाली हो…’, या अगदी सामान्य गाण्याच्या ओळी संगीतबद्ध करून अजरामर केल्या आहेत.
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
लेखन करताना किंवा पुस्तक वाचताना मला स्वतःला चहा प्यायला खूप आवडतं. त्यात जर लेखन अमृता प्रितम, गुलजार, महाश्वेता देवी, पु. ल., व. पु. रणजित देसाई, वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, ग्रेस, शांताबाई शेळके. ना.धों. महानोर, एस. एल. भैरप्पा… यासारखे दिग्गज आणि अतिउच्च पातळीवरचे लेखक असतील तर, त्यांचे लेखन समजुन घ्यायला चहा हवाच, नाही का? त्याशिवाय, मेंदूला चैतन्य आणल्याशिवाय ती भाषा, तो विषय कशी कळणार?
हिंदी साहित्यातील गुलजार हा माझा आवडता लेखक, कवी. गुलजारसारखी मनस्वी आणि प्रतिभावान व्यक्ती देखील या चहाच्या प्रेमातून सुटलेली नाही… चहा आणि प्रेम यावर बोलताना ते म्हणतात…
किसी ने हमसे पूछा, चाय या मोहब्बत?
तो हमने कहा, मोहब्बत के हाथ की चाय!
जरूरत से ज्यादा तुम बेमिसाल हो
थोडी सांवली जरूर हो पर बवाल हो
उनके हाथ की एक कप चाय मानो
सांवले रंगसे दुबारा प्रेम हो गया हो!
हम यूं ही नहीं खो गए उनमें
चायसी खुशबू थी, डूबते चले गए!
एक हल्की ठंडी रात, बेहिसाब बात!
बिना रुके चाय और बस सिर्फ मैं और तुम…
मुझे हमेशा गहरे रंगने ही लुभाया है
वह चाय हो या फिर तुम!
मेरी रूह तरसती हैं तुम्हारी खुशबू के लिए
तुम कहीं और महको तो बुरा लगता हैं!
गुलजार सारख्यांच्या लेखणीतून चहा हा विषय समृद्धतेने आणि गहराईने व्यक्त झाला आहे. चहा आणि प्रेमाचा अतूट संबंध त्यांनी आपल्या लेखनातुन मांडलेला आहे,
पुराने अखबार को संभालकर नहीं रखता मैं
ट्रेन की खिडकी, चाय का कप और कुछ यादें
सफर में आगे बढता हुआ मैं, काफी पीछे हो गया
अपने जज्बात लिखे तो मालूम हुआ
असा हा सर्वांचा आवडता विषय चहा! हा कोणी लिंबू पिळून पोट कमी करण्याकरिता घेतात तर, कोणी खवखवणाऱ्या घशासाठी अद्रकवाली चाय घेतात! लिंबाच्या पानांचा चहा मायग्रेन पळवतो तर कोणाला पेरूच्या पानाच्या चहाने ताजेतवाने वाटतं! गिलोयच्या चहाने प्रतिकारशक्ती वाढते तर, पारिजातकाच्या पानांचा चहा प्यायल्याने हाडं मजबूत होतात! लेमनग्रासच्या चहाने स्फूर्ती येते तर, मसाला चहाने शरीरातील ऊर्जा वाढते!
हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी!
सकाळचा चहा ताजंतवानं करतो तर, संध्याकाळचा चहा थकवा पळवतो! दुकानतला चहा प्यायला मजा येते तर एक कप चहा शेजाऱ्यांशी स्नेह वाढवतो! मित्रांसोबतचा चहा म्हणजे आपुलकीच्या गोष्टी, सुख-दुःखाचे शेअरिंग आणि केअरिंग, विविध विषयांवर चर्चा करून एकमेकांच्या सोबतीमधील रंगत वाढवणारी मत मतांतरे! तर, तो टपरीवरचा एक कप चहा म्हणजे गप्पा आणि हसणे खिदळणे! एक चहाचा कप तुमचे अडलेले काम पूर्ण करू शकतो. नात्यांमध्ये मिठास आणतो.
चहा म्हणजे आदरातिथ्य… चहा म्हणजे मैत्रभाव… चहा म्हणजे अगत्य आणि प्रेम… चहा म्हणजे अदब आणि शिस्त… चहा हा विषयच असा आहे की, त्यासाठी काय विशेषण वापरायचं, हेच समजत नाही! चहा जर स्वतः बोलायला लागला तर, काय म्हणेल हे मला तरी गुलजार यांच्याच शब्दांत सांगावंसं वाटतं….
चाय हूं मैं! किसी की हूं रात, तो किसी का सवेरा हूं मैं
किसी के इश्क की तारीख, तो किसी का मयखाना हूं मैं
किसी का जिक्र-ए-इश्क हूं मैं, तो किसी का जिक्र-ए-दोस्ती भी हूं मैं
कभी खुली किताबों के साथ तो, कभी चलती कलमों के साथ भी हूं मैं
सर्दीयों में हूं मसीहा, तो बारिशों में गालीब-ए-शेर हूं मैं
शराबी हूं मैं अगर तो पंडितों और मौलवियों में भी हूं मैं
अमिरी की सजावट तो गरीबी की शान हूं मैं…
किसी नुक्कड की पहचान तो, किसी महफिल की आवाज भी हूं मैं
यहां हर दिल-ए-महफिल से गुजरी हुई चाय हूं मैं…


