गजानन देवधर
जपानी संस्कृतीबद्दल थोडंफार वाचलेलं होतं, त्यानुसार तिथली संस्कृती म्हणजे एखादं तलम रेशमी वस्त्रच जणू! प्रत्येक धाग्यात परंपरेचा स्पर्श, हळुवार सौंदर्य आणि शिस्तीचं वैभव… त्या वस्त्रातला एक मोहक आणि गूढ धागा म्हणजे गेशा… गेशा म्हणजे फक्त नृत्य-गायन करणारी स्त्री नव्हे. कला, संवादकौशल्य, वागण्यातील नाजूकपणा आणि व्यक्तिमत्वातील तेज, या सगळ्याच्या संगमातून घडलेली एक सजीव मूर्ती…
लहानपणापासून या मार्गावर येणारी मुलगी आधी मायको म्हणून ओळखली जाते. शुभ्र चेहरा, लालसर ओठ, झगमगणारे केसांतील अलंकार, रंगीत किमोनो हे तिचं बाह्यरूप. पण त्यामागे असते कठोर शिस्त. चालण्यापासून पाहुण्यांशी गप्पा मारण्यापर्यंत प्रत्येक हालचालीत शिस्त रुजवली जाते. कविता, नृत्य, संगीत, चित्रकला, साहित्य या असंख्य कलांमध्ये वर्षानुवर्षे पारंगत झाल्यावर ती गेशा होते. तेव्हा तिच्या बोलण्यात चातुर्य, हालचालीत आत्मविश्वास आणि हास्यात मोहक नजाकत प्रकट होते.
2018 साली आम्ही जपानला गेलो असता काही दिवस क्योटोमध्ये मुक्काम होता. तिथला निसर्ग ऑटमचा ऋतू साजरा करत होता… झाडांची पानं लाल-पिवळ्या छटांनी उजळून निघाली होती. मंद वाऱ्यात शरद ऋतूचा गंध दरवळत होता. त्या रंगीबेरंगी पार्श्वभूमीवर आम्हाला एक आगळा अनुभव मिळाला, गेशेच्या सहवासात माचा (जपानी हिरवा चहा) तयार करण्याचा आणि तिचं नृत्य पाहण्याचा! त्या संध्याकाळी आम्ही एका शांत कक्षात गेलो. मंद प्रकाशात तिचं आगमन झालं. हळुवार पावलांचा ताल, रंगीत किमोनो, वैशिष्ट्यपूर्ण मेकअप आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. तिच्या आत्मविश्वासपूर्ण नजरेत मिश्किल आकर्षण दडलेलं होतं.
हेही वाचा – ग्वाल्हेर आणि जैसलमेरला भेटलेले असाधारण गाईड!
तिच्या सखीने तिची ओळख करुन दिली आणि मग ती बोलू लागली. आवाजातला गोडवा, शब्दांतील सौजन्य आणि वावरातील सहजता यांनी क्षणातच सगळ्यांना भुरळ घातली. वज्रासनात बसून तिनं माचा विषयी सांगायला सुरुवात केली. आमच्यासमोरही साहित्य ठेवलं होतं. बांबूच्या फेट्याने मिश्रण फेटताना तिच्या हालचालींमध्येही एक गती आणि लय होती. आम्हीही प्रयत्न केला, थोडे अवघडलो, पण तिच्या प्रसन्न मार्गदर्शनामुळे तो क्षण आनंददायी झाला.
यानंतर काही पारंपरिक जपानी खेळ, हलक्या फुलक्या गप्पा आणि विनोदाने वातावरण रंगत गेलं. तिच्या सहज वागण्यातली मैत्रीभावना मनात घर करून गेली. मग संथ जपानी सुरावटींवर तिचं नृत्य सुरू झालं. मंद पावलं, हातांच्या मोहक हालचाली, चेहऱ्यावर उमटणारे भाव, हे सर्वच मंत्रमुग्ध करणारं होतं!
कार्यक्रमाच्या अखेरीस किमोनोविषयी माहिती मिळाली. पट्ट्यांतील गुंतागुंतीचा अर्थ, रंगांच्या छटांमधील प्रतीकं, वस्त्र परिधान करण्याची संपूर्ण प्रक्रिया, हे ऐकताना जाणवलं की, वस्त्रही कवितेसारखं असू शकतं…
हेही वाचा – असाधारण गाईड… इतिहासकार अन् वनस्पतिशास्त्रज्ञ!
ती संध्याकाळ आजही स्मरणात ताजी आहे. क्योटोतील मंदिरे आणि शरदातील रंगांनी सुखावलेले नेत्र एका बाजूला, तर गेशेच्या सहवासात उमटलेली सांस्कृतिक ओळख दुसऱ्या बाजूला. ऑटमच्या त्या नयनरम्य ऋतूत तिच्या सहवासात घालवलेले क्षण आमच्या जपानच्या भेटीमधील आगळीच आठवण ठरली.
dscvpt@gmail.com / मोबाइल – 9820284859


