शशी सामंत
फार फार वर्षांपूर्वी एका नवीनच ओळख झालेला मित्राच्या गिरगावातल्या घरी गेलो होतो. थोड़ी ओळख झाल्यावर त्याच्या आईने विचारले,
“काय रे, चहा घेतोस ना?”
मी चटकन ‘नाही’ म्हणालो. तर ती म्हणाली, “घरी तरी नेहमी घेतोस ना! आमच्याकडे का नको?… घे आता, मी आणते…”
या आग्रहाला माझ्याकडे काही उत्तर नव्हते. आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांकडे वेगळे द्यायला आणखी काय असणार?
चहाच!
घरी दिवसाला दोन वेळा चहा पिणे, हे आमच्या घरातले आद्य कर्तव्य होते. सकाळच्या चहाबरोबर खारी-बिस्कीट, लोणी लावलेला बुरूनपाव चहात बुडवून खाल्ला तर, तो नाश्ता म्हणून ओळखायला हरकत नव्हता. दुपारच्या चहामध्ये पण काही तरी बुडवायला असायचे, निदान पुढील दोन तास तरी पोटात काही नाही गेले तरी चालायचे. एरवी त्या वयात हॉटेलात जाऊन चहा प्यावासा कधी वाटले नाही… गरजही नसायची. पण कॉलेजात गेल्यावर मात्र चकाट्या पिटायला कॅन्टीनचा चहा लागायचा, म्हणून चहा पिण्याचे प्रमाण वाढले… चहा आमचा मित्रच झाला.
एरवीही मित्रांसह इराण्याकडे चहा ढोसणे चालूच असायचे. बोरीबंदरच्या एम्पायर हॉटेलमध्ये आमच्या मित्रांचा अड्डा असायचा. कधी एकटाच चहासाठी गेल्यास तो चहा आणून देत नसे, विचारल्यावर म्हणायचा, “तेरा दोस्त लोग आता होगा, तब लाता हू चा… साथ में पीना…”
त्या आधी पाचवी-सहावीत असताना, दिवाळी किवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही वडिलांबरोबर मस्जीद बंदरच्या मार्केटात खरेदीसाठी जात असू. त्या खरेदीत आम्हाला काही गम्य नसे, तरी पण वडिलांबरोबर फरफटत जायचो. आजूबाजूच्या पुष्कळशा गल्ल्यांतील घाऊक दुकानांतून माल खरेदी झाल्यावर आम्ही पोरं थकायचो. वडीलही उन्हाने त्रासलेले असायचे. मग आम्हाला एका हॉटेलात बसवून बटाटावडा खिलवायचे. आम्हाला चहात गम्य नसायचे म्हणून स्वतःच एक कप चहा मागवायचे. अर्धाकप आपण प्यायचे आणि उरलेला बशीत ओतून आम्हाला द्यायचे. तेव्हा सगळीकडे चहा कपबशीत यायचा! ‘वन बाय टू’ करत दोघेजण तो चहा पीत… चहा मागवणारा मात्र कपातूनच प्यायचा…
हेही वाचा – घासबाजारचे ‘काली टोपी सामंत’
घरी, दारी, हॉटेलात सगळीकडे चहा कपबशीतूनच प्यावा लागायचा. काही काही दक्षिण भारतीय हॉटेलातून मात्र आवर्जून काचेच्या लहान मोठ्या ग्लासातून चहा मिळायचा किंवा एक पेला आणि एक चपटी वाटीतून सीलबंद करून द्यायचे. काय तर म्हणे खूप वेळ गरम रहातो!
कालांतराने कपबशीवाल्या चहात पण बदलाव आला. उडप्याच्या हॉटेलाप्रमाणे रस्त्यावरच्या टपरीतल्या चायवाल्याकडे काचेची ग्लासे आली. सुटसुटीत असल्याने धुण्यास सोपी. तोपर्यंत चहात सुद्धा महत्त्वाचे रेव्होल्युशन आले. कटींग चहा म्हणजे अर्धा कप चहा! चहाच्या किमती वाढत होत्या म्हणून, तसेच एकावेळी एकाच माणसास पिण्याजोग्या चहाची सोईस्कर किंमत पण अर्ध्या चहाची!
मध्यंतरी काही काळापुरती मला नोकरी करावी लागली… ‘जसरा ग्राफिक्स’मध्ये. थोड्याशा प्रशिक्षणाने आर्टिस्ट म्हणून जम बसवला असता, पण रवी जसरांचा आग्रह की, तुला फील्डमधले खूप लोक ओळखतात. तू सेल्समध्ये काम कर, आपला धंदा वाढव… ‘मरता क्या न करता’… अजिबात आवड नसणाऱ्या सेल्समधे कार्यरत झालो.
दिवसभर या ना त्या एजन्सीमध्ये आर्टवर्क प्रोसेसिंगसाठी चपला झिजवायचो. त्यापूर्वी मुंबईत नसल्याने सात-आठ वर्षे भटकायचे बंद झाले होते. सवय मोडली त्यामुळे दमायला व्हायचे. माझा पार्टनर मात्र ‘चायबाज’ होता. तो चहासाठी मला थांबवायचा, पण टपरीवर उभे राहून प्यायला, हॉटेलात नाही! मला चहाची आस नसायची, पण थोडे बसायचे असायचे. आराम हवा असायचा. पण टपरीवरचा तो पुळकट चहा, गिळावा लागायचा. कंटाळून नंतर काही वर्षे मी चहाच सोडला!
त्याच्याही पूर्वी ‘शंकरविलास’ नावाची चहाची चेन हॉटेल्स आली. तिथे फक्त चहाच मिळायचा. छोटेखानी जागेत असायची… मोजून चार-पाच टेबले असत. पण कोणत्याही शंकरविलासमध्ये चहाची चव मात्र सारखीच! राजस्थानी की, गुजराती मालक असल्याने पंधरा-वीस प्रकारचा चहा उकळत असायचा… मसाले, वेलची, आले वगैरे असायचे. तेही लोक काही वर्षात नाहीसे झाले!
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
आता हॉटेलातच कटींग चहा ग्लासातून मिळतो. थोडा महाग असतो पण बसायच्या खुर्चीचा आणि पंख्याच्या गारव्याची किंमत लावत असावेत. एकदा प्रवासात, कुठल्याशा आडगावात टपरी हॉटलात पाच-सहा कटिंग मागवले. बोलता बोलता मालक म्हणाले, “कपभर चहाचा कटिंग चहा झाला खरा, पण आमच्या गावात कटिंगचेही दोन भाग करून पितात. चहा तर घोटभर हवा असतो.”
…पण खरा आवडीचा चहा घरचाच… कोणाच्याही! चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीसारखा चहा आता राहिला नाही. मुळात चहा पावडरचा आणि दुधाचा दर्जा पूर्वीसारखा राहिला नाही. दुधाचा
दर्जा खालावला. पन्नास कंपन्याचे दूध मुंबईत विकायला येते, पण तबेल्याच्या दुधाने आणलेली चव बाकी या दुधाला नसते. मुळात सायच काढून घेतली असल्याने घरी सुद्धा दुसऱ्यांदा चहा गरम केला तर पावडरचीच चव जिभेवर रेंगाळते.
चहाने शरीराची तरतरी वाढते असा समज असल्याने, कितीही बदलला असला तरी चहा टिकलाय. भले कप-बशी नाहीशी झाली तरी, त्याची लोकप्रियता कायम राहिलीय.