स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स –
- कढीपत्ता अनेक दिवस हिरवागार आणि ताजा ठेवायचा सोपा उपाय आहे. कढीपत्ता बाजारातून आणल्यावर पाने देठापासून खुडून घ्या. पानावर पाच-सहा थेंब लिंबाचा रस चोळा. कढीपत्ता प्लास्टिकच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. अनेक दिवस ताजा-हिरवागार कढीपत्ता मिळेल.
- स्वयंपाक करताना बऱ्याच वेळा आयत्या वेळेस वेलची आणि लवंगांची पूड करण्याची वेळ येते. अशा वेळेस वेलची किंवा लवंग दमट असल्यास त्यांची पूड पटकन करणे अशक्य होते. यासाठी वेलची किंवा लवंगा एखाद्या बाटलीत अगर स्टीलच्या छोट्या डब्यात भरून फ्रीजच्या दरवाजाच्या कप्प्यात ‘तो डबा ठेवावा. त्यामुळे केव्हाही पूड हवी असल्यास पटकन तयार करता येते.
- कणीक भिजवण्यापूर्वी अंदाजे पाणी घेऊन हवे तेवढे मोहन आणि मीठ त्या पाण्यात टाकून पाणी फेटावे. त्यानंतर त्यात कणीक घालून मळावी. पोळ्या खूप अलवार होतात. मोहन कमी लागते आणि कणीक हाताला चिकटत नाही.
- कढीलिंबाची पाने वाळल्यावर त्यांचा स्वाद टिकत नाही. म्हणून कढीलिंब तेलावर परतून मिक्सरमधून पूड काढून ठेवावी. ती ऐनवेळी कुठल्याही पदार्थात वापरता येते.
हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही
- नारळ खराब निघाला, तर त्याचे खोबरे किसून कडक उन्हात वाळवावे. खडखडीत वाळले की, कढईत चांगले काळे होईपर्यंत भाजावे. मिक्सरमधून बारीक पूड करून ठेवावी. भरली वांगी, बटाटा, शेवग्याच्या शेंगा अशा भाज्यांत हे, खोबरे वापरा, छान चव येईल.
- लसूण जास्त प्रमाणात हवा असल्यास गड्डा दोन्ही बाजूंनी किंचित कापून टाकावा आणि मग त्याच्या चकत्या चिरून हातावर चोळून साले फुंकून टाकली की लसूण सोलून चिरून मिनिटात तयार!
- कांदा-लसूण सोलल्यावर हाताचा, विळी-सुरीचा वास लवकर जाण्यासाठी मीठ चोळावे, नंतर धुवावे.
- भिजून फुगलेल्या बदामांची साले चटकन निघत नाहीत, यासाठी बदाम उकळत्या पाण्यात टाकावे व दोन-तीन मिनिटांनी बिरड्या सोलतो तसे सोलावे. साले फार चटकन निघतात आणि नंतर बदाम पाण्यात तसेच भिजत ठेवता येतात.
हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांना दाटपणा आणणारे कूट, लसूण पावडर…
- टोमॅटो, आले आणि लसूण मिक्सरमधून काढून ती पेस्ट शिजवावी आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यावी. भाजीत आयत्या वेळेस घातल्यास भाजी चवदार होते आणि वेळही वाचतो.
- लसूण सोलण्यास वेळ नसेल तर, लसणीचा कांदा हातात धरून किसणीवर किसावा. खाली लसणीचा कीस पडेल आणि साले तशीच राहतील.


