आराधना जोशी
पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी
तयारीस लागणारा वेळ :
- विड्याची पाने धुवून पूर्णपणे वाळायला – 45 मिनिटे
- प्रत्यक्ष कृतीसाठी – 10 मिनिटे
- एकूण वेळ : 55 मिनिटे
साहित्य
- मध्यम आकाराची विड्याची पाने – साधारणपणे 35
(पाने आकाराने लहान असतील तर, 40 घेतली तरी चालतील)
- चुना – पाव टीस्पून
- काथ पावडर – पाव टीस्पून
- कच्ची बडीशेप – 4 टेबलस्पून
- कातरलेली सुपारी – 2 टेबलस्पून
(इथे मसाला सुपारी वापरली तरी चालेल)
- खोबऱ्याचा किस – अर्धी वाटी
- लवंग – 5 ते 7
- हिरवी वेलची – 5 ते 7
- ओवा – अर्धा टेबलस्पून
- ज्येष्ठमध पावडर – 1 टेबलस्पून
- खडीसाखर – दीड टेबलस्पून
- गुलकंद – 3 टेबलस्पून
- कंकोळ – 5
(आयुर्वेदिक दुकानात मिळेल. पण नाही मिळाले तर 1 टेबलस्पून धनाडाळ वापरावी)
- केशर – 10 ते 12 काड्या
- भीमसेनी कापूर किंवा जायफळ पावडर किंवा आल्मान तारा – पाव टीस्पून (ऐच्छिक)
कृती
- विड्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत.
- एकेक पान वेगळे पुसून पूर्णपणे वाळण्यासाठी पंख्याखाली एका चादरीवर पसरवून ठेवा.
- पाने पूर्णपणे वाळली की, त्यांची देठे आणि खालचा भाग काढून टाका. नंतर सगळी पाने बारीक चिरून घ्या.
- आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ही चिरलेली विड्याची पाने आणि चुना, काथ पावडर, कच्ची बडीशेप, कातरलेली सुपारी, खोबऱ्याचा किस, लवंग, हिरवी वेलची, ओवा, ज्येष्ठमध पावडर, खडीसाखर, गुलकंद, कंकोळ, केशर, भीमसेनी कापूर हे सर्व जिन्नस घाला.
- पल्स मोडवर एकदा सगळे एकत्र करा.
- नंतर हे सगळे छान बारीक होईल, अशाप्रकारे मिक्सरमधून फिरवून घ्या.
- हे सगळे मिश्रण एका ताटामध्ये काढून पंख्याखाली दोन ते तीन तास वाळवून घ्या. म्हणजे त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल.
- दोन ते तीन तासांनी हा तांबूल घट्ट झाकणाच्या कोरड्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. महिनाभर टिकेल.
- जेवणानंतर रोज एखादा चमचा हा तांबूल खावा. पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, औषधी
टीप
- त्रयोदशी म्हणजे एकंदर 13 वस्तू यात वापरल्या जातात. अर्थात, एखाद-दुसरी वस्तू कमी जास्त असेल तरी चालते.
- पारंपरिक पद्धतीत हा विडा कुटून केला जायचा. पण आता मिक्सरमध्ये केला जातो.
- विड्याची पाने थोडीजरी ओली राहिली तरी, नंतर तांबूल खराब होऊ शकतो. त्यामुळे पाने कोरडी असणे अत्यंत आवश्यक आहे.
- माहूरगडावर देवीचा तांबूल विडा कुटून प्रसाद म्हणून दिला जातो.
- सप्तशृंग गडावरही देवीचा बहुगुणी विडा (तांबूल) प्रसाद म्हणून भाविक स्वीकारतात.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


